योगऋषी रामदेवबाबा, आयुर्वेद आणि आयुर्वेदाचे महत्त्व !
एका जर्मन लेखिकेला आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात येते, ते भारतातील आयुर्वेदाचा द्वेष करणार्यांना लक्षात येत नाही, याहून दुर्दैव ते काय ? प्राचीन आणि प्रत्यक्ष श्री धन्वन्तरिदेवतेचे अुनष्ठान असलेली आयुर्वेदपद्धत ही ‘हिंदु राष्ट्रात राष्ट्रीय चिकित्सापद्धत’ असेल. – संपादक |
वर्ष १९९० मध्ये एका जर्मन मासिकासाठी मी हा लेख लिहिला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि कोईम्बतूर येथील चिकित्सालयाला आयुर्वेदाचा अभ्यास अन् उपचार करण्याविषयी जर्मन नागरिकांकडून विनंती करणारी पत्रे आली. याखेरीज जर्मनीमधील कसेल भागातील एका रुग्णालयाच्या मालकाने रुग्णालयात ‘आयुर्वेद विभाग’ चालू करण्यास सांगितला. सध्या आयुर्वेद आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मला या लेखाचे भाषांतर करावे, अशी कल्पना सुचली. रामदेवबाबा यांच्यामुळे अनेक लोकांना लाभ झाला आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांनी बरेच काही साध्य केले आहे. खरे म्हणजे त्यांच्यावर टीका न करता त्यांची प्रशंसा केली पाहिजे. (हा लेख ३४ वर्षांपूर्वी डिसेंबर १९९० मध्ये प्रकाशित केला गेला होता, हे लक्षात ठेवावे.)
१. बहुतांश रुग्णांचा आयुर्वेदाला महत्त्व देण्याचा विचार केंद्रित नसणे
लंडनमधील मूळ भारतीय असलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थांना आधुनिक वैद्यांनी त्यांना संधीवाताचा त्रास आहे, असे निदान केले. त्यावर नेहमीच्या प्रवाहाच्या विरोधात तीव्र कृती केली. त्यांनी आपली पिशवी भरली आणि आपल्या कुटुंबियांसह भारतात जाण्यासाठी विमानाच्या तिकिटांचे आरक्षण केले. ‘पाश्चिमात्य औषधे माझ्या आजारावर उपयोगी पडणार नाहीत. केवळ आयुर्वेद मला वाचवू शकतो’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यांनी त्वरित घेतलेल्या निर्णयाविषयी त्यांनी मला स्पष्टीकरण दिले. त्यांना खात्री होती, ‘आयुर्वेदाचे उपचार घेऊन बरे होण्याची शक्यता अधिक आहे आणि ५ आठवड्यांच्या उपचारानंतर आपण बरे होऊन घरी येऊ.’ दक्षिण भारतातील कोईम्बतूर येथील आयुर्वेदाच्या चिकित्सालयातील इतर रुग्णांनी तशी त्वरित कृती केली नव्हती; कारण त्यांनी आयुर्वेदाला महत्त्व देण्याविषयी स्वतःला केंद्रीत केले नव्हते. उदाहरणार्थ देहली येथील महिलेला १० वर्षांपासून संधीवाताचा त्रास असूनही ती त्या दुखण्यावर ॲलोपॅथीतील औषधे घेत होती. ‘तुम्ही इथे आधीपासून का नाही आला ?’, असे तिला विचारल्यावर ‘आयुर्वेद चिकित्सेविषयी मी विचार केला नाही’, असे उत्तर तिने दिले. जेव्हा तिच्या एका तरुण वयातील नातेवाईकाने आयुर्वेदाचे उपचार घेतले अणि त्याचे आश्चर्यकारक परिणाम तिला दिसले, तेव्हा तिने तिच्या पतीसह आयुर्वेदाच्या चिकित्सालयात जाण्याचे नियोजन केले. कोईम्बतूरमध्ये आयुर्वेद उपचार घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाला ज्यांना आयुर्वेदाचे उपचार घेऊन लाभ झाला, त्यांच्याकडून हे ठाऊक झाले होते.
२. ब्रिटिशांनी भारतियांना प्राचीन उपचारपद्धतीपासून दूर नेण्यासाठी केलेला प्रयत्न
अनेक वर्षे ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आणि स्वातंत्र्यानंतरही भारतात आयुर्वेदाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर आता या प्राचीन शास्त्राविषयी पुन्हा एकदा विश्वास निर्माण होऊन त्याला विशेषतः असाध्य रोगांच्या उपचारांमध्ये महत्त्व दिले जात आहे. भारतीय प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार गेल्या २ वर्षांत आयुर्वेदाचे उपचार घेणार्या रुग्णांचे प्रमाण ६० टक्के झाले आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या १५० वर्षांच्या राजवटीत भारतियांना स्थानिक प्राचीन उपचारपद्धतीपासून दूर नेऊन आधुनिक विज्ञानानुसार उपचार पद्धतीकडे वळवले.
मानवासाठी आयुर्वेद ही अत्यंत प्राचीन उपचारपद्धत आहे. एका ऋषींच्या विनंतीवरून धन्वन्तरि देवतेने त्यांना ही उपचारपद्धत सांगितली. या पद्धतीच्या उगमाविषयीचे कारण ब्रिटिशांना ही पद्धत काढून टाकणे किंवा बाजूला ठेवणे यांसाठी पुरेसे आहे. त्यामुळे त्यांनी आयुर्वेदाच्या संस्थांना मिळणारा आश्रय, आर्थिक आणि इतर साहाय्य काढून घेतले अन् ॲलोपॅथीचे उपचार करणार्या संस्थांना आश्रय दिला. कदाचित् आधुनिक औषधांचे परिणाम त्वरित आणि आश्चर्यकारक वाटल्याने तसे झाले असावे. त्यामुळे उच्चभ्रू वर्गातील लोकांनी पाश्चिमात्य पद्धतीने प्रभावित होऊन त्यांनी ॲलोपॅथी उपचारांना आश्रय दिला. त्यानंतर आयुर्वेद वैद्यांनी गावातील गरीबांना उपचार देणे चालू ठेवले आणि या प्राचीन पद्धतीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने विचार केला नाही.
३. शरीर आणि मन यांचा समतोल सांगणार्या आयुर्वेदाचे सखोल चिंतन करणारे महर्षि चरक !
सर्वांत प्रथम सर्वसमावेशक आणि मानवाच्या दृष्टीने भौतिक दृष्टीकोन नसणे. ‘माणूस आणि जग एक आहेत’, असा दावा महर्षि चरक यांनी २ सहस्र वर्षांपूर्वी केला. चरक संहितेचे पहिले प्रकरण वाचतांना चुकून ‘आपण एखादे वैद्यकीय ज्ञानाऐवजी तत्त्वज्ञानाचे पुस्तक वाचत नाही ना ?’, अशी माझी समजूत झाली. ‘मनुष्य हा शुद्ध जाणिवेचे सार आहे, जे अनंत आणि न पालटणारे सत्य आहे. या शुद्ध जाणिवेतून शरीर आणि विचार अन् भावना यांसह बुद्धी प्रकट होते. जरी जाणीव (आत्मा) ही शुद्ध आणि अनंत असली, तरी ती शरीर अन् मन यांमध्ये असल्याने मर्यादित आणि नाश पावणारी आहे. आत्म्याला आरोग्य किंवा आजार असे काही नाही, ती आनंदाविषयीची जाणीव आहे. तरीही मन आणि शरीर हे निरोगी किंवा आजारी असू शकतात. शरिरापेक्षा मन अधिक महत्त्वाचे असून ते सूक्ष्म स्तरावर संपूर्ण शरिरावर परिणाम करते आणि आपल्या प्रतिकार शक्तीचा स्रोत आहे; परंतु प्रत्येकाला निरोगी रहाण्याची इच्छा असतांना आजार का होतो ? (स्वस्थ किंवा निरोगी म्हणजे स्वतः आनंदीत रहाणे) याचे उत्तर, म्हणजे शरिर आणि मन यांना अयोग्य अशा गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम होतो अन् मग त्यांचा कार्यासाठी आवश्यक असणारा त्यांच्यामधील समन्वय बिघडतो. शरीर आणि मन यांच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट ? याविषयी आयुर्वेद सांगतो. आरोग्य त्याचे महत्त्व आणि आनंद कसा राखून ठेवू शकतो किंवा त्याचा समतोल कसा साधावा ? हा प्रश्न आहे. हा प्रतिबंधात्मक दृष्टीकोन अतिशय महत्त्वाचा आहे. आजार झाल्यानंतर त्यातून बरे कसे होऊ शकतो ? यापेक्षा एखादा आजारी कसा पडणार नाही ? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे; परंतु प्रत्येक वेळी आजार रोखता येत नसल्याने तो त्या आजाराशी संबंधित गोष्टींवर मात करून पुन्हा आरोग्याचा समतोल साधणे, यासाठी आयुर्वेदामध्ये उपाय सांगितले आहेत,’ असे महर्षि चरक यांनी सांगितले आहे. आश्चर्य म्हणजे २ सहस्र वर्षांपूर्वी महर्षि चरक यांनी ‘उपचारपद्धतीचे वेगळे दुष्परिणाम होऊ नयेत’, असे मत व्यक्त केले.
४. आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकाची जोड दिल्यास लाभदायी
‘ऋषींना शरिरातील गुंतागुंतीच्या कार्याविषयीचे ज्ञान होते का ?’, अशी शंका घेतली जाऊ शकते. त्यांच्याकडे शरिराचे खोलवर विश्लेषण करून शरिरात काय चालले आहे ? हे जाणून घेण्याविषयीचे तंत्रज्ञान नसेल; परंतु आधुनिक विज्ञानातील सिद्धांतापेक्षा आयुर्वेदाचे सिद्धांत हे तेवढे योग्य नव्हते, हे शोधून काढणे, हे आधुनिक संशोधन करणार्यांचे काम आहे. आयुर्वेदाला या लेखाद्वारे म्हणावा तसा न्याय देता येणार नाही; कारण संस्कृत भाषेत असलेल्या आयुर्वेदातील सूक्ष्म तत्त्वांविषयीच्या शब्दांचे भाषांतर करता येत नाही किंवा ते सांगण्यासाठी पुष्कळ स्पष्टीकरण द्यावे लागेल. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाच्या मूलभूत तत्त्वांवर सखोल चिंतन केले पाहिजे; कारण अंतर्ज्ञानाने त्यांना शरिरातील भागांची स्थिती सूक्ष्मदर्शकापेक्षाही अधिक पटींनी दिसू शकते. ऋषींना हे सूक्ष्म स्तरावरचे ज्ञान होते. ते शरिराचे भाग आणि त्यांचे कार्य याच्या कार्यासह मनाच्या स्थितीमुळे झालेले आजार अन् त्यांचा पर्यावरणातील वस्तूंशी असलेला संबंध यांविषयी सांगू शकायचे. आयुर्वेदातील विद्वान लोकांना आयुर्वेदाच्या सिद्धांताविषयी कोणतीही शंका नाही. शास्त्रज्ञांनी जर आयुर्वेदावर खोलवर संशोधन केले, तर आधुनिक वैद्यकशास्त्राला त्याचा लाभ होईल. काही जण हे करत असून वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याचा प्रसार करत आहेत. उदा. बोस्टनमध्ये रहाणारे ‘अँडोक्रिनोलॉजी’ विषयातील विशेषज्ञ म्हणतात, ‘शरीर आणि मन यांचा अगदी जवळचा संबंध आहे, हे आयुर्वेदातील तत्त्वज्ञान आधुनिक ‘न्यूरोलॉजिकल’ (मेंदूशी संबंधित) संशोधन करणार्या ‘न्यूरोमीटर’ या उपकरणाद्वारे सिद्ध होऊ शकते.
अशा प्रकारे ‘आयुर्वेद एक परिपूर्ण शास्त्र आहे’, याविषयीचा दृष्टीकोन मिळू शकतो. याप्रकारे भारतातील वेदांमधील ज्ञान हे तत्त्वज्ञानाचा नुमना असून त्यातून ‘न्यूक्लिअर फिजिक्स’ (अणूविषयक भौतिकशास्त्र)विषयी नवीन दृष्टीकोन प्राप्त होत आहेत. आयुर्वेद मानतो की, विचारांसारखे बुद्धीच्या स्तरावरील आवेगांचा शरिरातील रासायनिक रेणूंवर परिणाम होतो. ‘भविष्यात आयुर्वेद आणि ॲलोपॅथी हे एकमेकांना पूरक आहेत’, असे होणे शक्य आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील अधिकाधिक आधुनिक वैद्य हे आता आयुर्वेदात रस घेत असल्याने त्याविषयी आशा आहे. आता भारतात आयुर्वेदाची अधिकाधिक प्रमाणात घेतली जाणारी नोंद आणि संशोधन यांचे स्वागत होत आहे; परंतु विदेशात ज्या पद्धतीने त्याचा व्यापार केला जात आहे, त्यावर टीका होत आहे.
५. आयुर्वेदातील उपचारपद्धत ही केवळ रोगाच्या लक्षणांवरून नव्हे, तर रुग्णाची मनाची स्थिती समजून घेऊन केली जाणारी !
‘पवित्र आणि चांगले जीवन जगणे’, ही तरुण अन् निरोगी रहाण्याची निश्चित पद्धत आहे. आपण काही काळ कोईम्बतूर येथील रुग्णालयात राहून तेथील उपचारपद्धत पाहू शकतो. प्रारंभी अगदी सविस्तर प्रमाणात रोगनिदान केले जाते आणि हेच आयुर्वेदाचे महत्त्वाचे सूत्र आहे. महर्षि चरक म्हणतात, ‘वैद्याने केवळ कोणता आजार आहे ? हे निदान न करता रोग्याच्या मनाच्या पातळीला जाऊन त्याची स्थिती समजून घेतली पाहिजे. त्याच्या शरिरातील रचना कशी आहे ? आणि त्याचे व्यक्तीमत्त्व समजून घेतले पाहिजे. वात, पित्त आणि कफ या शरिरातील मूलभूत गोष्टींपैकी कोणत्या गोष्टींमुळे समतोल बिघडला आहे ? आणि त्याचे प्रकटीकरण कुठे होते ? हे समजून घेतले पाहिजे.’
आयुर्वेदातील उपचारपद्धत ही केवळ रोगाच्या लक्षणांवरून नसून रुग्णाची आतील स्थिती समजून घेऊन केली जाणारी आहे. त्यामुळे एकाच प्रकारची लक्षणे असणार्या ५ रुग्णांना वेगवेगळी औषधे दिली जाऊ शकतात. मुख्य उपचार करण्याआधी पहिल्या प्रथम तेलाने नियमित मालीश करून शरीर मऊ केले जाते आणि ‘एनिमा’ (बस्ती) देऊन शरिरातील आतड्याचा भाग स्वच्छ केला जातो. त्यानंतर २ आठवड्यांनंतर मुख्य उपचार चालू केला जातो. यामध्ये औषधी वनस्पती वापरून सिद्ध केलेले तेल वापरले जाते. या काळात ताजे शाकाहारी अन्न आणि पूर्णपणे विश्रांती दिली जाते. लिखाण किंवा वाचन नाही किंवा आगशीच्या बाहेर जावू देत नाहीत. त्यानंतर पुढे २ आठवडे रुग्णाला तेलाने मालीश केले जाते. ही उपचारपद्धत मज्जासंस्थेशी संबंधित असल्याने संधीवात, हाडांचे जोड दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, झोप न लागणे इत्यादी आजारांवर यशस्वी ठरते. त्याच वेळी यामुळे शरीर बळकट होऊन ताजेतवाने होते.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये प्रतिबंधात्मक उपचारांवर अधिक प्रमाणात भर देण्यात आला आहे, ज्यामुळे आरोग्य चांगले राहून शरिरात जोम रहातो आणि जीवनातील आनंद मिळतो. आयुर्वेदामधील वेळ लागणारी तेलाची उपचार करण्याची पद्धत सोडल्यास त्यामध्ये आरोग्याला अमृताप्रमाणे असणारी च्यवनप्राशसारखी औषधे आहेत. जर्मनीमध्ये च्यवनप्राश लोकप्रिय आहे; परंतु आयुर्वेदानुसार सर्वांत प्रतिबंधात्मक पद्धत, म्हणजे चांगले आणि उदात्त असे जीवन जगणे. प्रत्येकाच्या शरिराची विशिष्ट जडणघडण असली, तरी हा सल्ला प्रत्येकासाठी आहे.
६. चांगले उदात्त जीवन आरोग्यावर कसा परिणाम करते ?
आयुर्वेद सांगतो की, सत्त्व (शुद्ध), रज (क्रियाशीलता) आणि तम (आळशी, निष्काळजीपणा) या ३ गोष्टींचा मनावर परिणाम होत असतो. रज-तम पुष्कळ अधिक प्रमाणात असेल, तर मनामध्ये द्वेष, राग, शत्रुत्व, मत्सर इत्यादी सिद्ध होतात, ज्याचा आपल्या शरिरावर नकारात्मक परिणाम होतो; परंतु सत्त्व गुणासाठी हे लागू नाही. सत्त्व गुण जेवढा अधिक तेवढा तो चांगला. आयुर्वेद सांगतो की, ‘शिस्तबद्ध आणि सत्याच्या मार्गाने असणारे जीवन ज्यामध्ये आपण आत्मा आहोत’, याची जाणीव झालेली असते, असे जीवन की, ज्यामध्ये चांगल्या मार्गाने धन मिळवले जाते आणि सत्य जाणून घेण्याची इच्छा असते, त्या जीवनामध्ये माणसाचा सत्त्वगुण वाढतो.
अशा प्रकारची आरोग्याची काळजी घेणारी आयुर्वेदपद्धत आता पश्चिमी देशांमध्ये आमच्यासाठी उपलब्ध आहे. केवळ म्हणणे इतकेच आहे की, आयुर्वेद चिकित्सालयाचा खर्च परवडेल, अशा प्रमाणात असावा.
– लेखिका : मारिया वर्थ, जर्मनी.