Loksabha Election 2024 : तमिळनाडूत आतापर्यंत १ सहस्र ३०९ कोटी रुपयांची रोकड आणि सोने जप्त !

चेन्नई – तमिळनाडूमध्ये निवडणूक आयोग आणि आयकर विभाग यांच्या अधिकार्‍यांनी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १ सहस्र ३०९ कोटी ५२ लाख रुपयांची रोख रक्कम, मद्य, सोने आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाली. तामिळनाडूचे मुख्य निवडणूक अधिकारी सत्यब्रत साहू यांनी सांगितले की, एकूण रकमेपैकी १७९ कोटी ९१ लाख कोटी रुपयांची रोकड आणि १ सहस्र ८३ कोटी ७८ लाख रुपयांचे सोने आणि इतर मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहेत. यासह ८ कोटी ६५ लाख रुपयांची दारू, १ कोटी ३६ लाख रुपयांचे अमली पदार्थ आणि ३५ कोटी ८ लाख रुपये किमतीचे इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

तेलंगाणात २०२ कोटी रुपयांचा माल जप्त

तेलंगाणामध्ये आतापर्यंत २०२ कोटी ५२ लाख रुपयांची रोकड, दारू, सोने आणि इतर माल जप्त करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले की, जप्त केलेल्या एकूण रकमेपैकी ७६ कोटी ६५ लाख रुपयांची रोकड, २९ कोटी ६२ लाख  रुपयांचे सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातू आहेत. यासह ४३ कोटी ५७ लाख रुपयांची दारू, २६ कोटी १२ लाख रुपयांचे अमली पदार्थ आणि २६ कोटी ५४ लाख रुपयांचे इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.