भ्रष्टाचार कसा थांबवता येईल ?
सजिवांची वाढ होते. मग ते झाड असो, जलचर असो, पक्षी असो, प्राणी असो किंवा आपण मानव सर्व सजिवांची वाढ होते, हे नैसर्गिक आहे; परंतु निर्जीव वस्तूंची वाढ होत नाही. केवळ पैसा ही एक गोष्ट आहे की, ती निर्जीव असूनही वाढते. १०० रुपये जर आपण बँकेत ठेवले, तर १ वर्षानंतर त्याचे आपल्याला १०६ रुपये मिळतात. येथे पैशाची ही वाढ अनैसर्गिक आहे.
पैशांच्या या अनैसर्गिक गुणामुळे भ्रष्टाचार होतो. पैशाचे हे अनैसर्गिक गुण नष्ट केले की, भ्रष्टाचार होणार नाही. आपण ज्याला ‘व्हाईट मनी’ म्हणतो ते धनादेशने (‘चेक’ने) दिलेले पैसे आणि आपण ज्याला ‘ब्लॅक मनी’ म्हणतो ते ‘कॅश’ म्हणजे नोटांद्वारा दिलेले पैसे ! जर आपल्याला भ्रष्टाचार थांबवायचा असेल, तर पैशांचे सर्व व्यवहार केवळ धनादेशाद्वारेच केले पाहिजेत म्हणजे त्या रकमेवर कायद्यानुसार ‘इन्कम टॅक्स’ (आयकर) द्यावा लागेल आणि प्रत्येक रक्कम धनादेशद्वारे दिलेली असल्याने ती रक्कम कुणाकडून मिळाली हे उघड होत असल्याने लाचलुचपतीला आळा बसेल अन् भ्रष्टाचार होणार नाही.
पैशांची वाढ अनैसर्गिक
जगात कुठलीही वस्तू एकदा वापरली की, ती संपते. उदाहरणार्थ आंबा खाल्ला की संपतो. साबण वापरला की संपतो. इंग्रजीत म्हणतात की, ‘You can’t eat the cake and have it too’ पण पैसा ही अशी गोष्ट आहे की, तो कितीही वापरली तरी संपत नाही. हे अनैसर्गिक आहे. समजा आपण एकादी वस्तू चोरी होऊ नये; म्हणून कुणाला सांभाळायला दिली, तर तो ती वस्तू फुकट सांभाळत नाही. त्याला त्याबद्दल त्याचा मेहनताना द्यावा लागतो; पण पैसा याला अपवाद आहे. आपण आपले पैसे चोरी होऊ नये; म्हणून बँकेकडे सांभाळायला देतो, तर ती बँक आपल्याकडून त्याचा मेहनताना घेत नाही, उलट आपल्यालाच त्याबद्दल पैसे देते. हे अनैसर्गिक आहे.
पैशांचा व्यवहार धनादेशाद्वारेच करा
‘ब्लॅक मनी’ म्हणजे कॅशद्वारे म्हणजे नोटांद्वारे व्यवहार होऊ नये; म्हणून सर्व नोटा बंद केल्या जाणे आवश्यक आहे. छोटे छोटे व्यवहार करण्यासाठी १ ते ५० रुपयांची नाणी वापरली जातील. कुठल्याही व्यवहारात कुणालाही काही रक्कम द्यायची असेल उदाहरणार्थ पगार तर ती रक्कम धनादेशद्वारे देण्यात आली तरच ग्राह्य राहील.
कुठलीही बँक त्यांच्या खातेदारांच्या पैशांच्या जमा-खर्चाचे, देण्या-घेण्याचे सर्व व्यवहार सांभाळण्याचे काम करत असते. तेव्हा बँकेने खातेदारांचे सर्व व्यवहार सांभाळण्याचा ठराविक मोबदला घ्यायला पाहिजे. त्यामुळे खातेदारांचे पैसे अल्प होतील आणि निर्जीव वस्तू वापरल्याने त्यात घसारा होतो, हे नैसर्गिक आहे. त्याचा उपयोग बँक कर्मचार्यांचा पगार वगैरेंसाठी होईल. धनादेशाद्वारे व्यवहार झाल्यावर तो धनादेश पास होईल आणि खातेदाराच्या खात्यात तेवढे पैसे जमा होतील अन् उपयोगात आणलेला तो धनादेश साठ्यामध्ये ठेवला जाईल, तो धनादेश पुन्हा वापरता येणार नाही. म्हणजे निर्जीव वस्तू धनादेश एकदा वापरला की संपतो. हे नैसर्गिक आहे. सर्व व्यवहार धनादेशाद्वारे होत असल्यामुळे चोर्या करून अधिक लाभ मिळणार नसल्याने आणि प्रत्येकाला कामधंदा व्यवसाय असल्याने कुणी चोर्या करणार नाही. गुन्हेगारी न्यून होईल. हत्यार बनवणे न्यून होईल आणि राष्ट्राराष्ट्रांत युद्ध होणार नाही. यासाठी ‘एक राष्ट्र एक बँक’ आणि ‘एक व्यक्ती एकच खाते’ असणे आवश्यक आहे.
– श्री. अरुण गडकरी, कांदिवली