मुख्यमंत्री वैद्यकीय आवेदनावरील तालुका अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा मार्ग मोकळा !
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाठपुराव्याला यश
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर ) – राज्यशासनाच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षकांना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षा’च्या आवेदनाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी अधिकार दिले होते. या संदर्भात योग्य मार्गदर्शन तत्त्वे नसल्यामुळे आवेदनाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी होत नव्हती. त्यामुळे तालुका स्तरावरील रुग्णांना ते साहाय्य देता येत नव्हते. हे लक्षात घेऊन ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’ने २९ एप्रिलला गडहिंग्लज येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात भेट घेऊन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्याशी भ्रमणभाषवरून समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लावला. यामुळे आता चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्यांमधून येणार्या रुग्णांना हे साहाय्य मिळून त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहेत. आवेदनावर स्वाक्षरीचे अधिकार तालुका अधीक्षकांना देण्यात आले आहे. या प्रसंगी कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, आरोग्यदूत फाऊंडेशनचे बाबा देशमाने, भगीरथ तोडकरी, गडहिंग्लज तालुकाप्रमुख नीलेश पाटील उपस्थित होते. या वेळी विभागप्रमुख धनश्री देसाई यांनी रुग्णाच्या संदर्भात येणार्या अडचणी मांडल्या.