‘सोहम्’ चित्रपट समाजातील सर्व थरापर्यंत पोचवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रीय व्हावे ! – उज्ज्वल नागेशकर
कोल्हापूर – ‘सोहम्’ चित्रपटामधून सिद्धगिरी कणेरी मठाच्या १ सहस्र ५०० वर्षांची परंपरा सक्षमपणे दाखवण्यात आली आहे. यात आध्यात्मिक परंपरेसह समाज उपयोगी सेंद्रीय शेती, शिक्षण, वैद्यकीय अशा पैलूंच्या योगदानाची ही यथायोग्य योग्यपणे नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे समाजातील सकारात्मकता वाढवण्यासाठी ‘सोहम्’ चित्रपट समाजातील सर्व थरापर्यंत पोचवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रीय व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते उज्ज्वल नागेशकर यांनी केले. ‘ॲक्रॉस इंटरटेनमेंट’ची निर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या संदर्भाने आयोजित पूर्वसिद्धतेच्या बैठकीत ते बोलत होते. चैताली सभागृहात ही बैठक संपन्न झाली.
प्रांरभी या चित्रपटाची पार्श्वभूमी सांगतांना निर्माते संजय बहिरे म्हणाले, ‘‘आध्यात्मिक परंपरा आणि त्यानिमित्ताने संकलित मनुष्यबळाचा सकारात्मकरित्या विविध पैलूंनी कशा प्रकारे प्रभावीपणे उपयोग करता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिद्धीगिरी मठ अन् परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज होय.’’ या प्रसंगी समन्वयक डॉ. संदीप पाटील, उदय गायकवाड, माणिक पाटील चुयेकर, आरोग्यमित्र राजेंद्र मकोटे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
‘रोटरी क्लब’ करवीरचे उदय पाटील यांनी आभार मानले. या वेळी संभाजी पाटील, राजेश डाके, नारायण देसाई, परशुराम जाधव, मंगेश जागेदार, विक्रम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित होते.