विविध प्रसंगांमध्ये प्रार्थना करतांना श्री. रवींद्र बनसोड यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
‘साधना करतांना आणि व्यावहारिक जीवन जगतांना असंख्य अडचणी येतात. त्या अडचणीतील प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी देवाने आपल्याला एक अनमोल आणि प्रभावी शस्त्र दिले आहे. ते म्हणजे आपली उपास्यदेवता, संत किंवा श्री गुरु यांना ‘प्रार्थना करणे.’ प्रार्थना केल्यावर मला पुढील अनुभूती आल्या.
१. प्रार्थना केल्यावर न सापडणारी कुंकवाची डबी सापडणे
वर्षे २००८ मध्ये मी घरी होतो. तेव्हा सकाळी आवरून झाल्यावर मी कुंकवाची डबी पांढर्या रंगाच्या दुसर्या एका डबीवर ठेवली. थोड्या वेळाने कपाळावर टिळा लावायचा; म्हणून कुंकवाची डबी घ्यायला गेलो, तर ती शोधाशोध करूनही सापडली नाही. शेवटी देवाला शरण जाऊन प्रार्थना केली की, ‘माझ्यावर आणि कुंकवाच्या डबीवर वाईट शक्तीने आवरण आणले असेल, तर ते दूर होऊ दे.’ नंतर मी डोळे उघडले, तर समोर डबी दिसली.
२. आध्यात्मिक त्रासामुळे पत्नीची चिडचिड होणे आणि प्रार्थना केल्यावर मनःस्थिती सामान्य होणे
साधारण १५ दिवसांपूर्वी माझी पत्नी सौ. राधाची चिडचिड होत होती. त्या वेळी ‘आध्यात्मिक त्रासामुळे तिची चिडचिड होत आहे’, हे माझ्या लक्षात आले नाही. त्यामुळे मी तिच्यावर रागावलो. काही वेळाने ती चूक माझ्या लक्षात आली आणि मी श्रीकृष्णाच्या छायाचित्रासमोर उभे राहून क्षमायाचना करून प्रार्थना केली. त्यानंतर घरातील वातावरणात पालट झाला आणि राधाची मनःस्थिती सामान्य झाली.
३. भ्रमणभाषवर मतभेद असलेल्या साधकांशी बोलतांना अडथळे येणे; परंतु प्रार्थना करून बोलल्यावर अडथळे दूर होणे
वर्ष २०१० मध्ये माझे काही साधकांशी मतभेद होत होते. त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना त्यांचे पूर्ण बोलणे मला ऐकायला येत नसे किंवा ऐकले, तरी चुकीचे शब्द ऐकायला येत असत. (त्या वेळी काही प्रसंग घडल्यावर त्याचे चिंतन केले.) तेव्हा ‘सूक्ष्मातील वाईट शक्ती आमच्यातील मतभेद वाढवण्यासाठी असे घडवून आणत आहेत’, असे देवानेच सुचवले. संबंधित साधकाशी भ्रमणभाषवर बोलायचे असेल, तेव्हा प्रार्थना करून बोलायला आरंभ केला आणि असे प्रसंग घडण्याचे प्रमाण अल्प झाले.
४. प्रार्थना करतांना वाईट शक्तींनी अडथळे आणणे
४ अ. चुकीची प्रार्थना होत असतांना श्री गुरूंनी चूक लक्षात आणून देणे आणि योग्य प्रार्थना होणे : ‘हे श्रीकृष्णा, माझे शरीर, मन आणि बुद्धी यांवर आलेले त्रासदायक (काळे) आवरण दूर होऊ दे’, अशी प्रार्थना मी नियमित करत होतो. प्रार्थना करतांना २ – ३ वेळा असे झाले की, ‘त्रासदायक आवरण दूर होऊ दे’ असे न म्हणता ‘चैतन्याचे आवरण दूर होऊ दे’, अशी प्रार्थना होत असतांना श्री गुरूंनी चूक लक्षात आणून दिली. त्यामुळे त्यात सुधारणा करून योग्य प्रार्थना करता आली.
४ आ. साधकाने समष्टीच्या प्रार्थना चांगल्या केल्यावर घरी भांडण होणे : गेल्या काही वर्षांपासून माझे स्वतःसाठी प्रार्थना करण्याचे प्रमाण अल्प झाले आहे आणि समष्टीसाठी प्रार्थना अधिक होऊ लागल्या आहेत. त्यामुळे मी आणि पत्नीमध्ये कुठल्यातरी कारणाने भांडण होते. माझ्यातील नकारात्मकता वाढते अन् समष्टीसाठी प्रार्थना करणे थांबते. तेव्हा मला स्वतःसाठी प्रार्थना आणि नामजप करावा लागतो. पुन्हा स्थिती सामान्य झाली की, समष्टीसाठीच्या प्रार्थना व्हायला लागतात. स्थिती सामान्य होण्यासाठी कधी कधी दोन चार दिवसांचा कालावधी लागतो.
५. नामजप करतांना प्रार्थना केल्याने रज-तमाचे आवरण अल्प होणे
वर्तमानकाळात रहातांना किंवा दैनंदिन जीवन जगत असतांना मन आणि बुद्धी यांवर सतत रज-तमाचे आवरण येते. आपली साधना नसेल किंवा आपण साधनेत अल्प पडलो, तरी आवरणाचे प्रमाण वाढत जाते. या स्थितीतून बाहेर पडायचे असेल, तर नामजपाच्या समवेत प्रार्थना करणे आवश्यक आहे.
६. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने प्रार्थनेचे महत्त्व समजले. त्यांनीच वेगवेगळ्या प्रसंगांत प्रार्थना सुचवल्या आणि करवून घेतल्या. त्यामुळे माझ्या साधनेतील आणि व्यवहारातील संघर्ष पुष्कळ अल्प झाले. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. रवींद्र प्रभाकर बनसोड, फोंडा, गोवा
|