सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि गुरुपादुका यांच्याप्रती ओढ असलेला ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा, गोवा येथील चि. अनंत देशमाने (वय ३ वर्षे) !

१. अनंतने पहिल्यांदाच साईबाबांचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांना नमस्कार करणे

चि. अनंत देशमाने

‘एकदा मी चि. अनंतला घेऊन एका सरकारी कार्यालयात गेले होते. माझ्या कडेवर बसलेला अनंत मागच्या बाजूला पाहून हात जोडून पुष्कळ वेळ ‘जय, जय’ असे म्हणत होता. मी त्याला विचारले, ‘‘तू कोणाला ‘जय’ करत आहेस ?’’ त्या वेळी त्याने भिंतीवर लावलेल्या दिनदर्शिकेवरील साईबाबांच्या छायाचित्राकडे बोट दाखवले. खरेतर त्याने साईबाबांचे छायाचित्र प्रथमच पाहिले होते.

२. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील छायाचित्रे आनंदाने पहाणारा अनंत !

(सौ.) अमृता राकेश देशमाने

२ अ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र हवे’, असा अनंतने हट्ट करणे, त्याला ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथ दिल्यावर तो गुरुपादुका मागू लागणे,तेव्हा  ‘त्याला सूक्ष्मातील कळते’, हे पाहून साधिकेचा भाव जागृत होणे : एकदा अनंतला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र हवे होते; परंतु तो छायाचित्र खराब करेल; म्हणून त्याची मावशी सौ. अश्विनी सावंत (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) हिने त्याला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दिला. हा ग्रंथ पुष्कळ जड आहे, तरीही अनंत ग्रंथ हातात धरून त्याची पाने उलटून पहात होता. ग्रंथाच्या पहिल्या पृष्ठावर ‘गुरुपादुका आणि गुरुचरणांवर मस्तक ठेवतांना शिष्य’, असे चित्र आहे. अनंतने प्रथमच गुरुपादुकांचे चित्र पाहिले आणि गुरुपादुका पहाताच तो त्या मागू लागल्या.

या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र आहे, तरीही अनंत गुरुपादुका मागत होता. हे पाहून ‘अनंतला सूक्ष्मातील कळते आणि ‘सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ असून गुरुपादुका चैतन्याने भारित असतात’, याची अनंतला जाणीव आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला.

२ आ. ग्रंथातील संतांची छायाचित्रे पहातांना अनंतला पुष्कळ आनंद होणे : ग्रंथ पहातांना अनंतला एका पृष्ठावर सनातनच्या सर्व संतांची छायाचित्रे दिसली. ते पृष्ठ पहातांना त्याला पुष्कळ आनंद झाला. प्रत्यक्षात अनंतची कोणत्याच संतांशी भेट झालेली नाही.

३. आश्रमात गेल्यावर अनंतने ‘रामबाप्पा, रामबाप्पा जय’, असे म्हणणे

एकदा मी अनंतला घेऊन रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा अनंत ‘रामबाप्पा, रामबाप्पा जय जय’, असे म्हणू लागला. अनंत केवळ दुसर्‍यांदाच रामनाथी आश्रमात आला होता.

४. एका संतांच्या सत्संगानंतर तहान-भूक हरपून गेलेल्या अनंतची भावविभोर स्थिती !

एकदा अनंतला एका संतांचा सत्संग लाभला. सत्संगानंतर आम्ही घरी गेल्यावर अनंत तहान-भूक विसरून आनंदाने आणि उत्साहाने घरभर फिरत होता. तो एका वेगळ्याच भावस्थितीत होता. घरातील कपाटात ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हे ग्रंथ ठेवले आहेत. अनंतने ते ग्रंथ मागितले. ग्रंथावरील परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून तो आनंद व्यक्त करत होता. परात्पर गुरु डॉक्टरांची ‘श्रीराम’ आणि ‘श्रीकृष्ण’ या रूपांतील छायाचित्रे पाहून तो ‘जय’ करत होता.

सत्संगानंतर अनंत पूर्णपणे भावसागरात डुंबला होता. तो एका वेगळ्याच आनंदाच्या स्थितीत होता. आम्हाला त्याच्याकडे पाहून पुष्कळ आनंद आणि चैतन्य मिळत होते. त्याची भावस्थिती पाहून माझाही भाव जागृत झाला. खरेतर दुपारी ४ वाजल्यापासून रात्री १०.३० वाजेपर्यंत अनंतने काही खाल्ले नव्हते. तो केवळ पेलाभर दूध प्यायला होता. रात्री १०.३० वाजता त्याच्या समोर जेवणाचे ताट आणल्यावर तो भावस्थितीतून बाहेर आला.

कृतज्ञता

अनंतमुळे आम्हा कुटुंबियांना सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाता येते. त्याबद्दल आम्ही सर्व कुटुंबीय गुरुचरणी कृतज्ञ आहोत.’

– आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने (चि. अनंतची आई), फोंडा, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक