साधनेची तीव्र तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे नांदेड (महाराष्ट्र) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शांताराम बेदरकर (वय ४३ वर्षे) !
‘नांदेड (महाराष्ट्र) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शांताराम बेदरकर (वय ४३ वर्षे) यांच्याशी बोलतांना त्यांच्यातील सेवेची तळमळ आणि भाव माझ्या लक्षात आला. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वितरण करतांना त्यांनी समाजातील लोकांना साधना सांगितल्यावर समाजातील लोकांना आलेल्या अनुभूती आणि मला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्री. शांताराम बेदरकर यांचा सनातन संस्थेशी परिचय झाल्यावर ‘जीवनात केवळ साधनाच करायची आहे’, असा निश्चय करणे
वर्ष २००७ मध्ये शांतारामदादांनी नांदेडमधील शनि मंदिरात प्रथमच सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन पाहिले. तिथे त्यांना श्री. उत्तम मॅनमवार आणि सौ. लिना शहा या साधकांना साधनेविषयी सांगून त्या वर्षीच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाचे निमंत्रण दिले. तेव्हापासून ते सनातन संस्थेशी जोडले जाऊन त्यांची साधना चालू झाली. त्या वेळी ते त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगाचा सामना करत होते. साधनेचे महत्त्व समजल्यावर त्यांनी ‘मला आता केवळ साधनाच करायची आहे’, असा निश्चय केला. जीवनात येणार्या आर्थिक अडचणी आणि अन्य कौटुंबिक समस्या यांमध्ये न अडकता त्यांनी त्यांची साधना आणि सेवा चालू ठेवली.
२. नांदेडमधील सनातन संस्थेच्या नियतकालिकांच्या वितरणाची सेवा सायकलवरून करणे
वर्ष २००८ पासून ते ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वितरणाची सेवा करत आहेत. सध्या ते नियमितपणे ५१ दैनिक आणि ८ साप्ताहिक यांचे वितरण करतात. हे सर्व वर्गणीदार पूर्ण नांदेडमध्ये दूरवर रहातात, तरी शांतारामदादा ही सेवा सायकलवरून करतात.
३. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वितरण करत असतांना संपर्कात येणार्या अन्य वृत्तपत्र वितरक मुलांना साधना सांगणे
३ अ. अन्य वृत्तपत्रांचे वितरण करणार्या एका मुलाला साधना सांगणे, त्याने साधना चालू केल्यावर त्याला प्रसन्न आणि शांत वाटू लागून त्याच्या जीवनात पालट होणे : एकदा शांतारामदादांचा अन्य वृत्तपत्राचे वितरण करणार्या एका मुलाशी परिचय झाला. त्यांनी २ – ३ वेळा त्याला कुलदेवता आणि दत्तगुरु यांचा नामजप करण्याचे महत्त्व सांगितले. त्या मुलाने ते नामजप केल्यावर १५ दिवसांतच त्याला चांगल्या अनुभूती आल्या. त्याला आतून प्रसन्न आणि शांत वाटू लागले. हळूहळू त्याच्या वैयक्तिक जीवनात पालट होऊ लागला. आता त्याने स्वतःचे लहानसे उपाहारगृह चालू केले आहे. शांतारामदादा भेटल्यावर तो त्याच्या जीवनात झालेल्या या पालटांसाठी त्यांना धन्यवाद देतो. तेव्हा शांतारामदादा कृतज्ञतेच्या भावात राहून त्याला ‘‘नामजपाचा मिळालेला मार्ग सोडू नको’’, असे सांगतात.
३ आ. व्यसन करणार्या आणि पुष्कळ शिव्या देणार्या एका वितरकात नामजप केल्याने थोडा पालट होणे : दुसर्या एका वृत्तपत्राचा वितरक व्यसन करायचा आणि पुष्कळ शिव्या द्यायचा. तो कुणालाही काहीही बोलायचा; परंतु शांतारामदादांनी त्याला वितरण करतांना नापजप करायला सांगितला. आता त्याच्यातही थोडा पालट होत आहे.
३ इ. वारकरी संप्रदायानुसार साधना करणार्या एका वितरकाला नामजप, सेवा आणि अर्पण यांचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी सेवा करणे, अर्पण देणे अन् आता स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी जाणून घेणे : दुसर्या एका वृत्तपत्राचे एक वितरक वारकरी संप्रदायानुसार साधना करतात. शांतारामदादांचा त्यांच्याशी परिचय झाल्यावर शांतारामदादांनी त्यांना नामजप, सत्सेवा, अर्पण यांचे महत्त्व सांगितले. तेव्हापासून मागील २ वर्षे ते गुरुपौर्णिमेच्या सेवेला येतात. मागील ६ मासांपासून ते मासिक अर्पण देत आहेत. आता ते स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी (टीप) जाणून घेत आहेत.
(टीप – स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या चुका सारणीत (वहीत केलेल्या कोष्टकात) लिहून ‘त्या कुठल्या स्वभावदोषांमुळे झाल्या ?’, ते लिहिणे, त्यापुढे योग्य दृष्टीकोनाच्या सूचना लिहून ‘स्वतःकडून तशा चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी दिवसभरात १० – १२ वेळा स्वतःच्या मनाला योग्य दृष्टीकोनाच्या सूचना (स्वयंसूचना) देणे)
४. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वितरण करतांना वर्गणीदार आणि भेटणार्या सर्वांना साधना सांगणे
४ अ. मंदिरात आलेल्या काही विद्यार्थ्यांना साधना सांगितल्यावर त्यांना तो विषय पुष्कळ आवडून ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक होणे : एकदा दैनिक ‘सनातन प्रभात’ देण्यासाठी एका मंदिरात गेल्यावर शांतारामदादांची काही विद्यार्थ्यांशी भेट झाली. त्यांनी त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेतील साधनेचे महत्त्व सांगून त्यांच्याशी संवाद साधला, उदा. ‘शिक्षण घेतांना कुलदेवता आणि दत्तगुरु यांचा नामजप करण्याचे महत्त्व काय ?’, ‘अभ्यास करतांना ‘श्री सरस्वतीदेवीला प्रार्थना का करावी ?’, ‘श्री गणेशाचा नामजप का करावा ?’, इत्यादी. त्यातील काही विद्यार्थी शिक्षण घेत नोकरी करणारे होते. त्या मुलांना त्यांनी ‘ईश्वराची सेवा म्हणून नोकरी कशी करावी ?’, हे सूत्र सांगितले. ते सर्व त्या मुलांना पुष्कळ आवडले. शांतारामदादांनी त्यांना ‘प्रत्येकात देव कसा पहायचा ?’, हे शिकवले आहे. ‘त्याचाही त्या मुलांना लाभ होत आहे’, असे त्या विद्यार्थ्यांनी शांतारामदादांना सांगितले. आता त्या मुलांची शांतारामदादांशी भेट होते, तेव्हा त्यांच्यात साधनेविषयीच संवाद होतो. ती मुले दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतात.
४ आ. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाच्या वर्गणीदारांना साधनेला प्रवृत्त करणे : शांतारामदादांनी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाच्या वर्गणीदारांशी चांगली जवळीक करून त्यांना साधनेला प्रवृत्त केले आहे. त्यातील श्री. हिबारे यांनी साधनेला आरंभ केला आहे. त्यांची पत्नी आणि मुलगा यांनीही नामजप करायला आरंभ केला आहे. श्री. भगवान जीवन कुलकर्णी आणि त्यांची पत्नी दैनिक ‘सनातन प्रभात’चे पूर्ण वाचन करतात. त्यांची बहीण नामजप करू लागली आहे.
५. शांतारामदादांनी रामनाथी आश्रमात जाणार्या साधकाला आश्रमाच्या चैतन्यात डुंबायला आणि स्वभावदोष दूर करायचे प्रयत्न करायला सुचवणे
जुलै २०२३ मध्ये नांदेडहून एक साधक रामनाथी आश्रमात जाणार होते. शांतारामदादांनी त्यांना सांगितले, ‘‘आश्रमात जात आहात, तर तिथल्या चैतन्याच्या समुद्रात चिंब होऊन, डुंबून घ्या. तिथे गेल्यावर इथे लक्षातही न येणारे स्वभावदोष लक्षात येतील. ते स्वभावदोष घालवण्याचे प्रयत्न केल्यावर त्यातून तुम्हाला मुक्तही होता येणार आहे. त्यामुळे आश्रमाचा जितका लाभ करून घेता येईल, तितका घ्या.’’ खरे पहाता ते साधक शिकलेले असून काही दायित्व सांभाळणारे आणि पुष्कळ जुने साधक आहेत. ते पुष्कळ वेळा रामनाथी आश्रमात गेले आहेत. त्यांच्या तुलनेत शांतारामदादांचे शिक्षण अल्प आहे आणि ते ४ वर्षांपूर्वी एकदाच रामनाथी आश्रमात गेले होते; पण त्यांच्या या बोलण्यातून त्यांचा आश्रमाप्रतीचा भाव दिसून आला.
६. शांतारामदादांमधील जाणवलेला भाव आणि तळमळ !
६ अ. कुणी साधकांनी आर्थिक साहाय्य केल्यास, ‘ते सर्व सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आहे’, या भावाने गुरुचरणी अर्पण करणे : शांतारामदादांची आर्थिक स्थिति पाहून काही जण त्यांना आर्थिक साहाय्य करतात; परंतु शांतारामदादा म्हणतात, ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव माझे सर्वस्व आहेत आणि माझी आवश्यकता त्यांना ठाऊक आहे. देवाला आत्ता मला आनंदाची अनुभूती द्यायची आहे. त्यामुळे माझी आर्थिक आवश्यकता असतांना कुणी मला आर्थिक साहाय्य केले, तरी मी मिळालेली सर्व रक्कम अर्पण करतो. मला साहाय्य करणारे साधक असल्याने ते जे देतात, ते देवाचे असते. त्यामुळे देव माझ्याकडून ते अर्पण करून घेतो.’
६ आ. ‘प्रत्येक साधकाचीच साधनेत प्रगती व्हायला हवी’, असा विचार करणारे श्री. शांताराम बेदरकर ! : त्यांच्याशी साधनेविषयी बोलतांना ते म्हणाले, ‘‘आता माझ्या मनात गुरुकृपेने ‘माझ्या समवेत प्रत्येक साधकाचीच साधनेत प्रगती व्हायला हवी. त्यासाठी मी काय करू ?’, असे विचार येतात.’’ ते हे सूत्र सांगतांना त्यांचा श्री गुरूंप्रती असलेला भाव आणि त्यांच्या मनात सहसाधकांविषयी वाटत असलेली कृतज्ञता जाणवून माझी भावजागृती झाली.
६ इ. शांतारामदादांमधील भाव आणि तळमळ यांमुळे ऐकणार्यांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करावीशी वाटणे : खरे तर शांतारामदादांचे व्यावहारिक दृष्ट्या शिक्षण अल्प झाले आहे. तरीही केवळ त्यांच्यातील भाव आणि तळमळ यांमुळे ते सांगत असलेला विषय सर्वांना आकलन होतो अन् ऐकणार्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करावीशी वाटते.
६ ई. शांतारामदादा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरणागतभावाने करत असलेली प्रार्थना : मी शांतारामदादांना विचारले, ‘‘तुम्हाला जिज्ञासूला काय सांगायचे ?’, ते कसे सुचते ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांना प्रार्थना करतो, ‘आज ज्यांना साधना सांगायला हवी, त्यांच्याशी तुम्हीच माझी भेट करून द्या. अशा सात्त्विक व्यक्तींकडे तुम्हीच मला घेऊन चला. तुम्ही या आणि माझ्या माध्यमातून तुम्हीच बोला. माझ्याकडून त्यांना आणि मलाही आवश्यक असलेली माहिती तुम्हीच सांगून घ्या.’’ शांतारामदादा करत असलेली ही प्रार्थना ऐकतांना माझी भावजागृती झाली.
ही प्रार्थना टंकलेखन करतांना प्रार्थनेच्या शेवटच्या वाक्यातून ‘ते देवाचरणी सतत शरणागतभावात आणि शिकण्याच्या स्थितीत असतात’, हे माझ्या लक्षात आले.
७. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘शांतारामदादांचे बोलणे ऐकतांना ‘ते त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अडचणींचा सामना करत पुष्कळ कठीण स्थितीत श्रद्धेने साधना करत आहेत’, असे माझ्या लक्षात आले. त्यांचा गुरुदेवांती असलेला भाव आणि त्याग ऐकतांना पुष्कळ कृतज्ञता वाटली अन् माझ्याकडून गुरुचरणी शरणागतभावाने प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेवा, आपणच आम्हा साधकांकडूनही असे प्रयत्न करून घ्या.’
– श्री. वैभव आफळे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५४ वर्षे), फोंडा, गोवा. (३०.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |