मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा कधी ?
आज १ मे या दिवशी ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘मराठी राजभाषा दिन’ आहे. त्या निमित्ताने…
(अभिजात भाषा म्हणजे ज्या भाषेची नोंद आणि इतिहास हा दीड-दोन सहस्र वर्षांपूर्वीचा असेल, तसेच ज्या भाषेतील साहित्य आणि परंपरा ही प्राचीन अन् अस्सल असेल, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो.)
प्रतिवर्षीप्रमाणे १ मे या दिवशी ‘मराठी राजभाषा दिन’ हा महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने साजरा केला जातो. मराठी भाषा प्राचीन समृद्ध आणि गौरवशाली परंपरा असलेली भाषा आहे. महानुभवांनी मराठी भाषेला ‘धर्म भाषा’ मानली, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ‘अमृताने ही पैजा जिंके’, असे मानून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात आवडेल, अशी रचना करून मराठी भाषेचा मोठेपणा सांगितला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी तर मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले.
१. जगात सर्वाधिक बोलली जाणारी १५ वी भाषा
मराठी भाषेची समृद्धता आणि तिच्या वैभवाने या राज्याला मिळालेली एक सांस्कृतिक ऐतिहासिक देणगी ही मोठ्या अभिमानाने जपण्याची संधी प्राप्त होत असते. मराठी भाषेच्या संस्कारामुळे अनेक मराठी पिढ्यांनी आज आपापल्या क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आणि करत आहेत. मराठी भाषा सर्वांग सुंदर भाषा असून हिंदुस्थानातील अधिकृत २२ भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी १५ वी भाषा आहे, तर हिंदुस्थानात तिसरी भाषा आहे. अशा या मराठी भाषेचा आज गोवा, बडोदा (गुजरात), गुलबर्गा (कर्नाटक), इंदूर (मध्यप्रदेश) या ठिकाणी मराठी उच्च शिक्षण विभाग आहे. महाराष्ट्राबाहेर १५ विद्यापिठांत मराठी भाषा शिकवली जाते. जगातील ५२ देशांत मराठी भाषिक प्रामुख्याने आहेत. अशा या मराठी भाषेची साहित्यसंपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभलेली आहे.
२. मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न
वर्ष १९६५ ला मराठी भाषेला ‘राजभाषे’चा दर्जा मिळाला आणि मान्यतेची राजभाषाही झाली. आपले हिंदुस्थान सरकार हिंदुस्थानी भाषा आणि संस्कृतीला सर्वोच्च प्राधान्य देते. आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम् आणि उडिया अशा ६ भाषांना ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाला आहे. आपली मराठी भाषा ही प्राचीन आहे. ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’, यासाठी विचारविनिमय चालू झाला. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो, त्या भाषांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या त्या राज्याला भरीव अनुदान दिले जाते. महाराष्ट्र सरकारने १० जानेवारी २०१२ या दिवशी प्रा. रंगनाथ पाठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. ‘समितीने मराठी भाषेवर संशोधन करून तिच्याविषयीचा अभ्यास करावा’, असे ठरले. त्याप्रमाणे समितीने मराठी भाषेचे प्राचीनत्व २ सहस्र वर्षांपूर्वीचे असल्याचे सिद्ध करत समृद्ध मराठी साहित्याचाही मागोवा घेतला गेला. मराठी भाषेतील शिलालेख, ताम्रपट, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू, संतांचे अभंग आणि साहित्य हे मराठी भाषेचे अमूल्य रत्नभंडार असल्याचे समितीने अहवालात नमूद केले. हा अहवाल वर्ष २०१५ मध्ये केंद्र सरकारकडे पाठवला. तेव्हापासून केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडे पाठपुरावा चालू आहे.
३. मराठीला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न होणे आवश्यक !
नुकतेच मराठी साहित्य संमेलन अंमळनेर (जिल्हा जळगाव) येथे पार पडले. तिथे सुद्धा दरवर्षीप्रमाणे मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर केला गेला. ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’, अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी अनेक विचावंतांनी सुद्धा पुरावे दिले आहेत. अनेक साहित्य संस्थांनी लोक चळवळ उभारून हा विषय ऐरणीवर आणला. तरीही राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, तसेच मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक यांच्याकडून मराठीला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळवण्याकरता आवश्यक ते प्रयत्न होतांना दिसत नाहीत. जे प्रयत्न केले त्याला केंद्रीय स्तरावर योग्य तो मान दिला जात नाही. मराठीच्या अभिजात दर्जावरून ‘सकारात्मक’ प्रतिसाद देत चालढकलपणा केला जात आहे का ? असे कुणालाही वाटू शकते.
४. मराठी भाषेची होत असलेली दुर्दशा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा; म्हणून प्रयत्न होणे आवश्यक असतांना दुसरीकडे या भाषेची दुर्दशा रोखणे, हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव हवी. मराठी शाळांची संख्या हळूहळू न्यून होत आहे. ‘मराठी व्यावसायिक आणि ज्ञानभाषा नाही’, असे अलीकडच्या युवा पिढीचे मत आहे. ‘मराठी भाषेपेक्षा इतर भाषांमध्ये अधिक रस वाटतो, मराठी भाषा शिकणे सोपे आहे’, असे अनेक जण स्वतःचे मत व्यक्त करतात; परंतु प्रतिदिनच्या व्यवहारात मराठी भाषा बोलण्याचा आग्रह आपण किती धरतो ? प्रतिदिनच्या व्यवहारात आपण किती हिंदी आणि इंग्रजी शब्द वापरतो ? मराठी भाषेने संवर्धन करायचे असेल, तर तिचा व्यावसायिक वापर वाढायला हवा. मराठी भाषेची दुरवस्था रोखण्यासाठी ती नुसती शिकणे पुरेशी नाही, तर तिच्याविषयी प्रेम आणि आपुलकी वाटायला हवी. मराठी माणसाला मराठी भाषा लिहिता-वाचता आली पाहिजे. मराठीत साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा उपयोग करून आपल्या ज्ञानात भर घालून मराठी भाषा समृद्ध करायला हवी; परंतु इंग्रजीत शिक्षण हे इथल्या उच्च आणि मध्यम वर्गाचेच काय, सामान्य वर्गाचे अन् पालकांचे सुद्धा स्वप्न होऊ लागले आहे. मध्यम वर्गातील आर्थिक दुर्बल घटकाला ‘इंग्रजी ही आर्थिक प्रगतीची भाषा आहे’, असे वाटू लागले आहे, तसेच मराठी असूनही ‘चांगली मराठी भाषा येत नाही’, हे सांगतांना अनेक लोकांना अजिबात लाज वाटत नाही, हे वास्तव लक्षात घ्यायला पाहिजे.
५. मराठी भाषेचा आदर वाढण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे !
‘मराठी भाषा अभिजात आहे’, हे आता तज्ञांनी मान्य केले आहे. तेव्हा मराठी भाषेचा अभिमान बाळगतांना त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवतांना त्याच वेळी ‘ती ज्ञानभाषा व्हावी’, असा आग्रह धरायला हवा. याचसमवेत प्रत्येक मराठी माणसाच्या मनात मराठी भाषेविषयी आदर निर्माण होण्याची नितांत आवश्यकता आहे. इतर राज्यातील लोक आपापल्या राज्यातील प्रादेशिक भाषेचा जसा आदर करतात, तेवढाच आदर आपण आपल्या मराठी भाषेचा करावा, याकरता प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
– श्री. सुनील कुवरे, शिवडी, मुंबई आणि श्री. रवींद्र मालुसरे, अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई.