Gujarat ATS Operation : गुजरातच्या समुद्रात नौकेतून ६० कोटी रुपयांचे १७३ किलो अमली पदार्थ जप्त

गेल्या ३ दिवसांत गुजरातमधून ८९० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

कर्णावती (गुजरात) – भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमधील पोरबंदरजवळील समुद्रात भारतीय नौकेतून ६० कोटी रुपयांचे १७३ किलो ‘हशीश’ हे अमली पदार्थ जप्त केले. पाकिस्तानमधील पसनी बंदरातून हे अमली पदार्थ आणण्यात आले होते. याप्रकरणी तुकाराम आरोटे उपाख्य साहू आणि हरिदास कुलाल उपाख्य पुरी या दोघांना तटरक्षक दलाने कह्यात घेऊन गुजरात आतंकवादविरोधी पथकाकडे सोपवले. हे दोघेही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. गेल्या ३ दिवसांत गुजरातमध्ये ८९० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

१. गुजरात आतंकवादविरोधी पथकाने २८ एप्रिलला महाराष्ट्रातील कैलास सानप आणि दत्ता आंधळे यांना द्वारका शहरातून अटक केली होती, तर अली असगर उपाख्य आरिफ बिदाना याला मांडवी येथून अटक केली होती. हे पाचही जण पाकिस्तानस्थित अमली पदार्थ माफिया फिदा याच्या संपर्कात होते.

२. अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एन्.सी.बी.) आणि गुजरात आतंकवादविरोधी पथक यांनी आंतरराज्य अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात आणखी ६ जणांना राजस्थानमधून अटक केली. तसेच सिरोही जिल्ह्यात ४५ कोटी रुपयांचे अमली पदार्थही जप्त केले.