सांगली येथील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस !
लोकसभा निवडणूक खर्चात फरक !
सांगली, २९ एप्रिल (वार्ता.) – लोकसभा निवडणुकीतील येथील महायुतीचे उमेदवार तथा खासदार संजयकाका पाटील यांना निवडणूक खर्चातील फरकाविषयी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी २९ एप्रिल या दिवशी नोटीस बजावली आहे.
या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, खर्चाच्या नोंदवहीतील नोंदी आणि निवडणूक प्रशासनाला सादर केलेल्या खर्चाच्या माहितीत २ लाख रुपयांचा फरक आहे. खर्च नियंत्रण कक्षात सादर केल्यानुसार ९ लाख २ सहस्र ५०८ रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष नोंदवहीतील नोंदीनुसार हा खर्च ६ लाख ९४ सहस्र ९३३ रुपये आहे. या दोन्हीतील फरक २ लाख ७ सहस्र ५७५ रुपये आहे. याविषयी ४८ घंट्यांत खुलासा सादर करावा. खुलासा न केल्यास २ लाख ७ सहस्र ५७५ रुपयांचा फरक आपण स्वीकारल्याचे समजले जाईल. ही रक्कम निवडणूक खर्चात समाविष्ट केली जाईल. हा फरक मान्य नसेल, तर त्याविषयाची कारणे सादर करावीत. या कारणांसह जिल्हा खर्च सनियंत्रण समितीकडे विहित मुदतीत अपील प्रविष्ट करावे.