अध्यात्मात पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना केल्यास गुरुकृपा लवकर होईल ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जयपूर (राजस्थान) येथे ‘सिद्धेश्वर ब्रह्मर्षि आश्रमा’तील साधकांना मार्गदर्शन
जयपूर (राजस्थान) – ज्याप्रमाणे आपण शाळा शिकत असतांना पुढच्या पुढच्या वर्गात जातो, त्याप्रमाणे अध्यात्मातही पुढच्या पुढच्या टप्प्यात जायला पाहिजे. आपण भजन करत असू, तर तेही पुढच्या पुढच्या स्तराचे असू शकते. प्रारंभी भजन म्हणणे, त्याचा अर्थ समजून म्हणणे, भजनाच्या वेळी उत्कट भक्ती अनुभवास येणे, भजनामध्ये सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आचरणात आणणे, अशा प्रकारे पुढच्या पुढच्या स्तरावर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपल्यावर निश्चितपणे गुरुकृपा होऊ शकते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. मानसरोवर येथील ‘सिद्धेश्वर ब्रह्मर्षि आश्रमा’च्या साधकांना संबोधित करतांना ते बोलत होते. या वेळी आश्रमाचे सचिव श्री. प्रमोद पालीवाल आणि इतर भक्तगण उपस्थित होते.
श्री. जाखोटिया पुढे म्हणाले, ‘‘मनुष्यजन्म दुर्लभ आहे आणि त्यात गुरु जीवनात येणे, हे त्याहून दुर्लभ आहे. या दोन्ही गोष्टींचा आपल्या जीवनात संगम झाला असेल, तर आपण आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे.’’ या वेळी श्री. प्रमोद पालीवाल म्हणाले, ‘‘आज श्री गुरूंनी सांगितलेल्या गोष्टींचे पुन्हा स्मरण झाले.’’ या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी श्री. राकेश गर्ग यांनी प्रयत्न केले.
क्षणचित्र
या वेळी श्री. जाखोटिया यांनी ‘टिळा का लावावा ? मंदिरात दर्शन कसे करावे ? भ्रमणभाषवर ‘हॅलो’ न म्हणता देवतांची नावे घेण्याची पद्धत’ आदी धर्माचरणाच्या कृतींविषयी माहिती सांगितली, तसेच त्याविषयी प्रात्यक्षिकही करून दाखवले.