दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप
मोदीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक मतदान महत्त्वाचे ! – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
डोंबिवली – पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचे ‘अबकी बार ४०० पार’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात मतदान होणे आवश्यक आहे, असे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले असून त्यासाठी पुढील २० दिवस महायुतीच्या सर्व घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून काम करावे, असेही ते म्हणाले. डोंबिवली जिमखाना येथे महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी येथील युतीच्या मतात वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर एम्.आय.डी.सी. भागातील रस्त्यांसह सर्वच रस्ते डांबरमुक्त, खड्डेमुक्त होणार आहेत, असे त्यांनी या वेळी सांगितले.
मुंबईत लोकल रेल्वेचा डबा रुळावरून घसरला !
मुंबई – पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही लोकलगाडी सकाळी ११.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये प्रवेश करत असतांना रेल्वेचा डबा रूळावरून खाली घसरला. हार्बर रेल्वेमार्गाच्या क्रमांक २ स्थानकावरील रुळावर ही दुर्घटना घडली. यामुळे स्थानक क्रमांक २ वरील रेल्वेवाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.
तूरडाळ महागली !
पुणे – तूरडाळीच्या दरात आठवडाभरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १८० ते १८५ रुपयांवर गेले आहेत. अपुर्या पुरवठ्यामुळे मागील वर्षभरापासून तूरडाळीचे दर चढेच आहेत. अपुरा पाऊस, काढणीला झालेला अवेळी पाऊस यांमुळे उत्पादन घटले आहे.
बीडीडी चाळकर्यांची मतदानावर बहिष्कार टाकण्याची चेतावणी !
मुंबई – वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाप्रमाणे ना.म. जोशी मार्ग चाळ पुनर्विकास प्रकल्पातही एका घरामागे एक वाहनतळ द्यावा, अशी मागणी मागील कित्येक महिन्यांपासून ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनी केली आहे; मात्र या मागणीविषयी राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याने ‘आश्वासन मिळाले नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू’, अशी चेतावणी येथील रहिवाशांनी दिली आहे.
दूधगंगा नदीचे पात्र कोरडे ; नागरिकांची पाण्यासाठी वणवण !
कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. पाणी नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नदीपात्र कोरडे असल्याने आजूबाजूच्या शेतीसाठीही पाणी नाही, अशी स्थिती आहे. शेतीला पाणी नसल्याने पिके वाळण्याचा गंभीर धोका आहे. पाटबंधारे विभागाने नदीवरील दत्तवाड एकसंबा आणि पुढील बंधार्याच्या मध्ये बर्गे (पाणी अडवून ठेवणार्या विशिष्ट फळ्या) बसवल्या, तर काळम्मावाडी धरणातून जेव्हा पाणी सोडले जाते, तेव्हा ते नदीपात्रात टिकून राहील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दूधगंगा नदीचे पात्र वारंवार कोरडे पडत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी विहिरी, कूपनलिका यांचे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.