नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी आणि शिक्षककेंद्री स्वरूपाचे आहे ! – प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर

चिपळूण – नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा, या उदात्त हेतूने तयार करण्यात आले आहे. या नवीन धोरणानुसार शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षण सुलभ करून देणार्‍याची भूमिका राबवायची आहे. त्यासाठी शिक्षकांनी स्वतःचे ई-अभ्यासक्रम साहित्य सिद्ध करावे. तसेच शिक्षणाच्या प्रवाहात रहाण्यासाठी विद्यार्थ्यांना कायम प्रवृत्त करत राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची निवड केली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी आणि शिक्षककेंद्री स्वरूपाचे आहे, असे मार्गदर्शन ‘आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालया’चे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले.

डॉ. तेंडोलकर डी.बी.जे. महाविद्यालयात आयोजित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावरील परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अतुल चितळे, प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. एम्.एस्. चांदा, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. तेंडोलकर पुढे म्हणाले, ‘‘नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये विविध उदाहरणांच्या रूपाने स्पष्ट केले. ‘स्वयम’(संकेतस्थळ) सारख्या माध्यमाचा वापर करून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वत:चे ‘क्रेडिट पॉईंट्स’ वाढवावेत.’’