सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता असणारे आणि आजाराचे अचूक निदान करून त्यावर नामजपादी उपाय सांगणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९० वर्षे) यांना खोकल्याचा तीव्र त्रास होत होता. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांनी पू. दातेआजींना लाभ होऊन त्यांचा खोकला न्यून झाला. याविषयी पू. दातेआजींची ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची मोठी सून सौ. ज्योती दाते यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. निर्मला दातेआजी (वय ९० वर्षे) यांना खोकला होणे, आधुनिक वैद्यांनी त्यांना प्रतिजैविके दिल्यावर खोकला काही प्रमाणात न्यून होणे
‘पू. आजींना २ – ३ मासांपासून खोकल्याचा त्रास होत होता. त्यासाठी नियमित औषधोपचार चालू होते; पण खोकला थांबत नसल्यामुळे फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘खोकला का येत आहे ?’, हे पहाण्यासाठी त्यांची क्ष-किरण (एक्स-रे) तपासणी केली. तेव्हा ‘त्यांच्या फुप्फुसात काही प्रमाणात जंतूसंसर्ग झाला आहे’, असे निदान झाले; म्हणून आधुनिक वैद्यांनी प्रतिजैविक (अँटीबायोटिक) देऊन औषधोपचार चालू केले. १० दिवसांनी पुन्हा त्यांची क्ष-किरण पडताळणी केल्यावर ‘जंतूसंसर्ग काही प्रमाणात न्यून झाला आहे’, असे लक्षात आले.
२. नामजपादी उपायांनी खोकला न्यून होणे; पण पुन्हा तीव्र खोकला येऊ लागणे, तेव्हा हृदयविकारतज्ञांनी ‘छातीचे ‘सी.टी. स्कॅन’ करावे लागेल’, असे सांगणे
पू. आजींचा खोकला न्यून होण्यासाठी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. ते उपाय केल्यावर खोकला न्यून झाला; पण काही दिवसांनी पुन्हा खोकल्याची तीव्रता वाढली. तेव्हा रामनाथी आश्रमातील आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे म्हणाले, ‘‘आता आपण हृदयविकारतज्ञांना विचारू.’’ हृदयविकारतज्ञांना विचारल्यावर त्यांनी ‘छातीचे ‘सी. टी. स्कॅन’ (टीप) करावे लागेल’, असे आम्हाला सांगितले.
(टीप – ‘सी.टी. स्कॅन’ (Computed tomography) हे रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान आहे.)
३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘पू. दातेआजींना पोटाचा त्रास आहे, छातीचा नाही’, असे सांगणे
मी सद्गुरु गाडगीळकाकांना ‘हृदयविकारतज्ञांनी पू. आजींच्या छातीचे ‘सी.टी. स्कॅन’, करायला सांगितले आहे’, असे सांगून त्यासाठी त्यांना नामजपादी उपाय विचारले. तेव्हा त्यांनी सूक्ष्मातून अभ्यास करून सांगितले, ‘‘पू. आजींना छातीचा काहीच त्रास नाही, तर पोटाचा त्रास आहे’, असे वाटते. त्यामुळे त्यांचे ‘सी.टी. स्कॅन’ करायची आवश्यकता नाही. पू. आजींना उगाच ‘रेडिएशन’ला सामोरे जायला नको.’’
४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांनी एका आठवड्यात खोकल्याचे प्रमाण पुष्कळ न्यून झाल्याने त्यांची सर्वज्ञता लक्षात येणे
पू. आजींना प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वतः नामजप करायला जमत नव्हते; म्हणून सद्गुरु गाडगीळकाकांनी त्यांच्यासाठी नामजप करायला इतर साधकांचे नियोजन केले. त्यानंतर एका आठवड्यात पू. आजींचे खोकल्याचे प्रमाण आश्चर्यकारकरित्या ९० टक्के एवढे न्यून झाले. त्यामुळे ‘सी.टी. स्कॅन’ करण्याची आवश्यकताच राहिली नाही. यातून मला सद्गुरु गाडगीळकाकांची सर्वज्ञता लक्षात आली.
५. शारीरिक लक्षणांवरून उपचार केले जात असल्यामुळे ते प्रत्येक वेळी लाभदायक न होणे; पण सूक्ष्मातून जाणून घेऊन उपचार केल्यामुळे त्याचा लगेच लाभ होणे
या प्रसंगातून मला जाणीव झाली, ‘एरवी शारीरिक लक्षणांवरून उपचार केला जातो; पण ‘मूळ आजार कुठला आहे ?’, हे कळायला स्थुलातून मर्यादा असल्याने काही वेळा परिणामकारक उपचार होत नाहीत. बर्याचदा शारीरिक लक्षणांवरून प्रयोगात्मक (ट्रायल) औषधोपचार केले जातात.
६. ‘समाजात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याप्रमाणे सूक्ष्मातून जाणून निदान करणारे आणि त्यावर उपाय सांगणारे कुणी असेल का ?’, असे वाटणे
यातून ‘सद्गुरु गाडगीळकाकांचा साधकांना किती लाभ होत आहे’, याची मला जाणीव झाली. ‘सर्व साधकांना त्यांचा मोठा आधार आहे’, या विचाराने मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली. ‘त्यांच्याप्रमाणे सूक्ष्मातून जाणून आजाराचे अचूक निदान करून उपाय करणारे समाजात कुणी असेल का ?’, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला.
७. कृतज्ञता
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अपार कृपाशीर्वादानेच आम्हा अज्ञानी जिवांना सद्गुरु गाडगीळकाकांचा सत्संग आणि नामजपादी उपाय यांचा लाभ होत आहे’, यासाठी गुरुरायांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५९ वर्षे)(पू. दातेआजींची मोठी सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.३.२०२४)
|