सांगली येथे प्रकाश शेंडगे यांच्या वाहनावर शाईफेक अन् चपलांचा हार घालत चिटकवले धमकीचे पत्र !
मराठा समाजाच्या तरुणांनी दमदाटी केल्याचा आरोप !
सांगली, २९ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यातील ओबीसी बहुजन पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या वाहनावर अज्ञातांकडून चपलांचा हार घालण्यात आला, तसेच त्यांच्या गाडीवर शाई फेकण्यात आली आहे, तसेच वाहनाच्या समोरच्या काचेवर एक धमकीचे पत्रही चिकटवण्यात आले आहे. सांगली येथील उपाहारगृह ‘ग्रेट मराठा’समोर शेंडगे यांचे चारचाकी वाहन उभे असतांना रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला, तसेच दुसरीकडे ‘जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग गावात मराठा समाजाच्या तरुणांनीही दमदाटी आणि शिवीगाळ केली आहे’, असा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.
चौकशी करण्याची शेंडगे यांची मागणी !
वाहनाच्या काचेवर धमकी वजा चेतावणीही देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा प्रकाश शेंडगे यांनी निषेध केला असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. शेंडगे यांच्या काचेवर एक धमकीचे पत्र लावण्यात आले आहे. यामध्ये ‘‘प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याविना गप्प बसणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जशी नाशिकमध्ये माघार घेतली तशी तू घे वेड्या. धनगर आणि मराठा यांच्या नादी लागू नको, नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्याला विरोध केला, तर पुढील वेळी चपलेचा हार गळ्यात घालू. – ‘एक मराठा लाख मराठा’’, अशी धमकी देण्यात आली आहे.