सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील निकृष्ट भोजनाच्या विरोधात मनविसे आक्रमक !
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील निकृष्ट भोजनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आक्रमक झाली. २६ एप्रिल या दिवशी आंदोलन करत मनविसेने ‘रिफ्रॅक्टरी’मधील जेवण प्रशासनातील अधिकार्यांना खायला दिले; तसेच कुलगुरु कार्यालयात निकृष्ट जेवणाचे ताट नेत आंदोलन केले. (विद्यापिठामध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असते, असे वारंवार लक्षात येऊनही त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना का केली गेली नाही ? त्यासाठी आंदोलन का करावे लागते ? – संपादक) विद्यार्थ्यांच्या आरोग्याला त्रासदायक, तसेच बेचव जेवण प्रतिदिन दिले जाते, असा आरोप मनविसेचे उपशहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी केला. ‘रिफ्रॅक्टरी’शेजारी असलेल्या शंकर महाराज मठातील मोफत अन्नछत्राची खिचडी विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार असल्याचेही दळवी यांनी सांगितले. या आंदोलनात राज्य कार्यकारणी सदस्य, विभाग अध्यक्ष, विभाग सचिव, विभाग उपाध्यक्ष आदी सहभागी झाले होते.