ईरोड (तमिळनाडू) येथे कावेरी नदीच्या काठी असलेल्या मंदिर परिसरात अतिरुद्र महायाग !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती ! |
ईरोड (तमिळनाडू), २९ एप्रिल (वार्ता.) – तमिळनाडू राज्यातील कावेरी नदीच्या काठी असलेल्या ईरोड शहरात २१ एप्रिलपासून अतिरुद्र महायागाला प्रारंभ झाला असून हा याग १ मे पर्यंत चालणार आहे. कावेरी नदीच्या काठी श्रीसुंदरांबिका आणि त्याच्या बाजूला श्री चोळीश्वर मंदिर आहे. या मंदिर परिसरात अतिरुद्र महायाग चालू आहे. अतिरुद्र महायागाचे आयोजक शिवश्री गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे पुत्र शिवागमविद्यानिधी श्री. अरुणकुमार शिवम् यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ २८ एप्रिलपासून यागात सहभागी झाल्या. या वेळी शिवागमविद्यानिधी श्री. राजकुमार शिवम् यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते संकल्प करवून घेतला. या वेळी मूळ ईरोडचे रहिवासी आणि सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचीही वंदनीय उपस्थिती होती.
महायाग १ मे २०२४ पर्यंत असून त्या दिवशी मकर राशी आणि श्रवण नक्षत्राच्या वेळी महापूर्णाहुती होणार आहे. महापूर्णाहुतीपर्यंत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती असणार आहे.
अतिरुद्र महायागाला विविध राज्ये आणि नेपाळ येथील १७० ब्रह्मवृंद उपस्थित !
या अतिरुद्र महायागाला तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, तसेच नेपाळ येथून एकूण १७० ब्रह्मवृंद उपस्थित होते. सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० आणि संध्याकाळी ५.३० ते रात्री ९.३० या वेळेत रुद्रपठण करण्यात येत होते. तमिळनाडू सरकारच्या हिंदु मंदिर व्यवस्थापन मंत्रालयाने अतिरुद्र महायागासाठी जागा उपलब्ध करून दिली, तर राज्य पोलीस आयुक्तांनी यागाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्था पुरवली आहे. या ठिकाणी अग्नीशमनदलाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
यागाच्या संकल्पाच्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेली प्रार्थना !श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, तसेच साधकांना होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास यांचे निवारण व्हावे, यासाठी यागाच्या संकल्पाच्या वेळी प्रार्थना केली. |
यागाच्या ठिकाणी विश्वशांतीसाठी संकल्प !यागाच्या ठिकाणी ‘विश्वशांतीसाठी, तसेच उष्णतेचा त्रास अल्प होऊन पाऊस येऊन भूमी शांत व्हावी’, यासाठी संकल्प करण्यात आला. |