मतदान : हिंदु समाजाचे एक राष्ट्रीय कर्तव्य !
आपला देश प्रजासत्ताक लोकशाहीचा आहे. ही प्रजासत्ताक राज्यपद्धत आधुनिक काळात अस्तित्वात आली, असे आपल्याला म्हणता येत नाही. आपण कोणतीही पूजा केल्यानंतर आरती करतो. आरती नंतर मंत्रपुष्पांजली म्हणून भगवंताच्या चरणी पुष्प अर्पण करतो. ही मंत्रपुष्पांजली भगवंतासाठी नसून राष्ट्रासाठी आहे. ‘पूजा हे जरी धार्मिक कार्य असले, तरी त्यामागे राष्ट्रीय भावना मनात ठेवून ती करावी’, असा संकेत आहे. याचे कारण असे की, आपण भूमीलाही माता मानले आहे. वास्तू उभी करतांना भूमीपूजन केल्याविना आपण वास्तू उभी करत नाही, तसेच आपली संस्कृती आपल्याला भूमीनिष्ठा शिकवते. याचाच अर्थ हिंदु समाजाचे राष्ट्रीय आणि धार्मिक जीवन भिन्न नाही. हिंदु समाजाच्या जीवनपद्धतीची राष्ट्रीय आणि धार्मिक जीवन अशी दोन अंगे आहेत. ही गोष्ट आपण नेमकेपणाने जाणून घेतली पाहिजे.
वरच्या परिच्छेदात मंत्रपुष्पांजलीचा उल्लेख करण्यात आला आहे. या मंत्रपुष्पांजलीत साम्राज्य, वैराज्य, पारमेष्ठ अशा विविध प्रकारच्या प्रजासत्ताक राज्यपद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. या पृथ्वीचा प्रतिपालक साक्षात् भगवंत आहे. आजही निवडून आलेले लोकप्रतिनिधी मंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी शपथ घेतात. ‘ही शपथ, म्हणजे राष्ट्र-धर्माचे मी पालन करीन’, असे सांगणारी आहे.
१. पूर्वीच्या काळातील राज्याभिषेक आणि राजगुरु परंपरा
‘राष्ट्र-धर्माचे कर्तव्य पार पाडणे’, हे प्रत्येक नागरिकाचे प्रधान कर्तव्य आहे. पूर्वी प्रजासत्ताक राज्याचा अधिपतीचा राज्याभिषेक करण्याची परंपरा आपल्याकडे होती. प्रत्येक राजाने त्याच्या धार्मिक आणि राष्ट्रीय कर्तव्याचे काटेकोरपणे पालन करावे. राजाची राष्ट्रीय कर्तव्ये आणि धार्मिक कर्तव्ये काय आहेत ? याची जाणीव या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी करून दिली जात असे. त्याने जर त्याचे धार्मिक आणि राष्ट्रीय कर्तव्य योग्य प्रकारे बजावले नाही, तर त्याला शासन करण्याचा अधिकार राजगुरूला असे.
आधुनिक काळात ही परंपरा आपण बाजूला सारली. राजगुरु जनमताच्या बळावर अधर्मी, अनाचारी, भ्रष्ट राजसत्ता उलथून पाडत असे आणि त्या राजाच्या जागी शुद्ध चरित्र्याच्या, कर्तव्यदक्ष व्यक्तीची राजा म्हणून नियुक्ती करत असे. याचे उत्तम उदाहरण, म्हणजे आर्य चाणक्याने धनानंदाची राज्यसत्ता नष्ट करून चंद्रगुप्त मौर्या याची राजसत्ता अस्तित्वात आणली.
२. देश, धर्म आणि संस्कृती यांना सुरक्षित राखण्यासाठी मतदान करणे आवश्यक !
आज राजगुरु ही संकल्पना अस्तित्वात नाही. त्यामुळे देशातील सुजाण, सभ्य, सुशिक्षित, सुसंस्कृत मानवी समाजाचे हे दायित्व आहे की, देशातील अशा व्यक्तीची निवड करून त्याच्या हाती राजकीय सूत्रे सुपुर्द करावीत. अशा प्रकारची आधुनिक काळातील निवडणूक पद्धत आपण स्वीकारली आहे. आपले राष्ट्र सुरक्षित रहावे आणि आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य अन् सार्वभौमत्व अबाधित राहून हिंदु संस्कृती आणि धर्म यांना पोषक ठरणारे वातावरण निर्माण करणारा सत्ताधीश निवडायचा आहे. या आधुनिक काळात आपल्यावर हे दायित्व आहे.
आपल्या देशातील आतंकवाद अजूनही समूळ नष्ट झाला, असे म्हणता येत नाही. तो आपल्याला समूळ नष्ट करून आपला देश पूर्णतः सुरक्षित करायाचा आहे, तसेच देशात होणारी घुसखोरी ही देशातील शांतता, सुव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था विकलांग करत आहे. या घुसखोरांना पाठीशी घालणारे आणि त्यांना आपल्या देशात येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारे जे कुणी लोकप्रतिनिधी असतील, तर त्यांना मतदानाच्या द्वारे पररास्त करून देश, धर्म आणि संस्कृती यांना सुरक्षित राखायचे आहे. हे सर्व सुरक्षित असेल, तर आपणही सुरक्षित राहू. ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे मतदान करणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आपण सुयोग्य प्रकारे निभावले नाही, तर आपल्यावर पुनश्च पारतंत्र्यात जाण्याची वेळ येईल. हा धोका टाळण्यासाठीच आपण मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे.
३. सर्वसामान्यांनी मतदानापासून दूर जाण्यासाठी रचण्यात आलेले षड्यंत्र
मतदानावर बहिष्कार घालावा किंवा नकारात्मक मतदान करावे (नन ऑफ द अबाऊव्ह – नोटा), असा एक विचार प्रवाह आपल्या देशात जाणीवपूर्वक निर्माण केला जात आहे. सर्वसामान्य जनतेचा बुद्धीभेद करून त्यांना मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्यापासून दूर करणे, हा एक कुटील डाव असू शकतो. अशा उथळ आणि अराष्ट्रवादी विचारांना या देशातल्या बांधवांनी फसून राष्ट्रीय कर्तव्यापासून दूर जाऊ नये, एवढीच कळकळीची विनंती आहे.
४. संस्कृतीच्या रक्षणार्थ सावध असणे महत्त्वाचे !
इंग्लंडचे दिवंगत पंतप्रधान चर्चिल सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शन करतांना काय म्हणाले होते, त्याकडे मी आपल्या सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. ‘‘Culture and literature are all very well but a culture without strength soon ceases to be a living culture.’’ चर्चिल यांच्या या विधानाचा आशय ‘संस्कृती आणि साहित्य उत्तम आहे; पण संस्कृतीला बळ नसेल, तर अस्तित्वात असलेल्या संस्कृतीचा अंत समीप आला आहे.’ याचा अर्थ प्रत्येक समाजाने स्वतःच्या संस्कृतीच्या रक्षणार्थ सावध असले पाहिजे. ‘मनोरंजनाच्या कार्यक्रमात व्यस्त राहून सर्वकाही आलबेल आहे, असा विचार करून उदासीन वृत्ती धारण करून मतदानाच्या कर्तव्यापासून पराङ्मुख होणे’, हा आत्मघात आहे. हा बोध चर्चिल यांच्या या विधानावरून आपण घेतला पाहिजे.
५. साम्यवादी नेता स्टॅलिन याचे पूर्वपरंपरा आणि पूर्वज यांच्या स्मरणाविषयीचे उद्गार
साम्यवाद्यांचा (कम्युनिस्टांचा) नेता स्टॅलिन यांनी काढलेले उद्गार आपण लक्षात ठेवले पाहिजेत; कारण रशियात साम्यवादी क्रांती झाली आणि या क्रांतीने जुन्या परंपरेवर आक्रमणे केली. ती परंपरा त्याज्य ठरवली. त्यानंतर जेव्हा हिटलरच्या उदयानंतर युद्धाचे वातावरण निर्माण झाले, तेव्हा ही परिस्थिती झपाट्याने पालटत गेली. रशिया आणि जर्मन युद्धाला तोंड फुटले. त्या वेळी आपल्या देश बांधवांसमोर भाषण करतांना स्टॅलिन म्हणाला, ‘आपल्या महान पूर्वजांची दैदीप्यमान स्मृती या युद्धात तुम्हाला स्फूर्तीदायक ठरो.’ ज्या वेळी राष्ट्रावर पारतंत्र्यात जाण्याची वेळ आली, त्या वेळी स्टॅलिनला सुद्धा त्याची प्राचीन परंपरा, संस्कृती आणि पूर्वज यांची आठवण झाली. याचा अर्थ आपण आपली पूर्वपरंपरा आणि पूर्वज यांचे स्मरण पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, तर आपल्यावर नष्ट होण्याची बरबाद होण्याची वेळ येते. हेच स्टॅलिनचे उद्गार आपल्याला सांगतात.
६. संस्कृती आणि धर्म यांच्या अस्तित्वासाठी देशात कणखर अन् बलवान राजसत्ता हवी !
फ्रान्स या देशाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तात्त्विक विचारांच्या बैठकीवर क्रांती घडवून आणली. असे असले, तरी परिस्थिती पालटल्यावर आज फ्रान्स देशाने घेतलेल्या निर्णयाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. संस्कृती आणि धर्म यांच्या अस्तित्वातसाठी देशात कणखर अन् बलवान राजसत्ता असली पाहिजे. चर्चिल, स्टॅलिन आणि विद्यमान फ्रान्सचे सरकार यांनी परिस्थिती पालटताच स्वतःची संस्कृती आणि धर्म यांना प्राधान्य दिले. त्यांच्या रक्षणासाठी आपली पूर्वीची विचारसरणी बाजूला सारून संस्कृती आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रतिकार करण्यास सिद्ध झाले.
७. राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांना एकनिष्ठ असणार्याला मतदान करा !
आज आपल्या देशाची परिस्थिती पहाता हिंदु धर्म, संस्कृती आणि राष्ट्राचे सार्वभौमत्व, हे सारेच धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मतदानाच्या महत्त्वपूर्ण अधिकाराकडे पाठ फिरवणे, म्हणजे पारतंत्र्य आणि अराजकता यांना आमंत्रण देण्यासारखे आहे. आपल्या हातून हे पाप घडू नये; म्हणून राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांना एकनिष्ठ असणार्याला हिंदु समाजाने मतदानाचा अधिकार चोख बजावून स्वतःचे राष्ट्रीय कर्तव्य सुयोग्यपणे पार पाडावे. ही एकच अट आपण पाळून मतदान केले पाहिजे, असे विनम्र आवाहन या लेखाद्वारे करत आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परूळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२४.४.२०२४)