राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू धंद्यांवर मोठी कारवाई !
पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंद्यांवर मार्च ते एप्रिल महिन्याच्या कालावधीत मोठी कारवाई केली. यामध्ये विभागाने ४४१ गुन्हे नोंद करून ३२५ संशयितांना कह्यात घेतले आहे. यामध्ये ५३ वाहनांसह १ कोटी ५३ लाख ८ सहस्र ८०५ रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ, बारामती आणि पुणे शहर असे लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंदे चालवणार्यांना दणका दिला आहे. यासाठी १४ नियमित आणि ३ विशेष ‘भरारी पथके नियुक्त केली आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड यांसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नाकाबंदी केली असून संशयित वाहनांची पडताळणी चालू आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवानाधारक मद्य विक्रेत्यांवरही कारवाई केली आहे. नियमभंग प्रकरणी ७७ अनुज्ञप्ती धारकांवर कारवाई झाली आहे.