नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु सुभाष चौधरी यांची नव्याने चौकशी करण्याचे राज्यपालांचे आदेश !
विद्यापिठातील कथित अपव्यवहाराचे प्रकरण
नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे बहुचर्चित कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधात विद्यापिठातील कथित अपव्यवहार प्रकरणी पुन्हा चौकशी चालू करण्यात आली आहे. कुलपती आणि राज्यपाल रमेश बैस यांनी कुलगुरु डॉ. चौधरी यांची नव्याने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
१. विद्यापिठातील कथित अपव्यवहार प्रकरणी कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर अनेक आरोप करत त्यांची तक्रार राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे करण्यात आली होती.
२. परिणामी या तक्रारींची नोंद घेत राज्यपालांनी डॉ. चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती; मात्र त्यानंतर डॉ. चौधरी यांनी या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती.
३. तेव्हा न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय रहित केला आणि आणि डॉ. चौधरी यांना कुलगुरुपदी कायम रहाण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. चौधरी यांनी दुसर्यांदा कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला होता.
४. असे असले तरी विविध सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी केलेल्या आरोपांविषयी डॉ. चौधरी यांच्याविरुद्ध नव्याने चौकशी करण्याचा निर्णय राज्यपाल रमेश बैस यांनी घेतला आहे. त्यांनी उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली आहे.