साधकांना काळानुसार विविध नामजप सांगत हळूहळू त्यांना ‘निर्विचार’ हा निर्गुणाकडे नेणारा नामजप करायला सांगून मोक्षाकडे घेऊन जाणारे मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘१४.५.२०२१ या दिवशी ‘निर्विचार’ हा नामजप करण्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूचना आल्यावर त्यानुसार मी नामजप करण्याचा प्रयत्न केला. ७.७.२०२१ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या १०१ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांनी नामजपाविषयी सुचवलेले विचार आणि मी ‘निर्विचार’ नामजप करतांना मला आलेल्या अनुभूती त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.
१. समष्टी प्रकृती असल्यामुळे स्वतःला ध्यान लावणे किंवा एकाग्रतेने पुष्कळ वेळ बसून नामजप करणे कठीण जाणे
साधनेच्या आरंभी परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ‘कुलदेवता’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त।’ हे नामजप करायला सांगितले. मला ‘एका ठिकाणी ध्यान लावून बसणे, एकाग्रतेने पुष्कळ वेळ नामजप करणे, एकांतात रहाणे’ जमत नाही. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘तुमची समष्टी प्रकृती आहे’, असे सांगून माझ्याकडून समष्टी साधना करून घेतली. त्यामुळे माझ्याकडून समष्टी सेवा होते किंवा मला सेवा म्हणून समष्टीसाठी नामजप करायला जमतो.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार’ साधनेचे प्रयत्न केल्यावर काही प्रमाणात विचारांवर नियंत्रण ठेवता येणे
मी संसारात राहून साधना करत असे. त्यामुळे सतत काही ना काही प्रसंग घडून माझ्या मनाचा संघर्ष होत असे. त्यामुळे माझ्या मनात नेहमी विचारांचे काहूर माजलेले असायचे. त्यामुळे नकारात्मक विचारांचा माझ्या मनावर प्रभाव असायचा. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार’ अष्टांग साधनेचे (टीप) प्रयत्न केल्यावर माझ्या मनातील नकारात्मक विचार उणावून मनाला शांती आणि आनंद मिळण्यास आरंभ झाला; मात्र माझ्या अंतर्मनात येणारे विचार पूर्णतः थांबवणे मला शक्य झाले नाही.
(टीप – १. स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन, २. अहं निर्मूलन, ३. नामजप, ४. सत्संग, ५ सत्सेवा, ६. भावजागृतीसाठी प्रयत्न, ७. सत्साठी त्याग, ८. प्रीती (सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणे)
३. श्रीकृष्णस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अत्यंत सोपी साधना सांगून मनातील विचारांविरुद्ध लढण्यास शिकवून अर्जुनासारख्या सहस्रो साधकांचा उद्धार करणे
भगवद्गीतेत अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला,
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम्। तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक ३४
अर्थ : (अर्जुन म्हणतो,) हे श्रीकृष्णा, हे मन मोठे चंचल, क्षोभवणारे आणि मोठे दृढ अन् बलवान आहे. त्यामुळे ‘त्याला वश करणे’, हे मी वार्याला अडवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो.
म्हणजे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, ‘‘वार्याला थांबवणे शक्य नाही, तसेच माझ्या मनातील विचारांना थांबवणे अशक्य आहे.’’ त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाचे रणभूमीवर प्रबोधन करून त्याच्या मनातील सर्व विकल्प आणि विचार घालवून त्याला युद्ध करण्यास सिद्ध केले. तसे परात्पर गुरु डॉक्टरांनी अर्जुनासारख्या एक नव्हे, तर सहस्रो साधकांना त्यांच्या मनातील विचारांविरुद्ध लढण्यास सिद्ध केले आहे आणि या लढाईत ते साधकांना जिंकूनही देत आहेत.
४. प.पू. भक्तराज महाराज यांनी नामजप सतत करून विचारांवर मात करायला शिकवणे
‘प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण’ या ग्रंथात (प्रकरण ४, सूत्र क्र. ४ इ १.) म्हटले आहे, ‘‘सर्व विचार हे अविचारच आहेत. ‘विचार करायचा नाही’, हा विचार हाच खरा विचार !’’ त्यांनी त्या सुवचनाचा भावार्थ पुढीलप्रमाणे सांगितला आहे, ‘सर्व विचार हे मन, चित्त किंवा बुद्धी यांतूनच निर्माण होतात आणि ते सर्व प्रकृतीतील असल्याने अविचारच आहेत; म्हणूनच ‘विचार करायचा नाही’ यालाच ‘खरा विचार’ म्हटले आहे. मनोलय, चित्तलय आणि बुद्धीलय झाल्याने आत्मतत्त्वाची अनुभूती येते.’ अशी अनुभूती येण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांनी नामजप सतत करायला सांगितला आहे.
५. प.पू. भक्तराज महाराज यांच्या सुवचनानुसार विचारांवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे; पण ते न जमणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करून स्वयंसूचना घेतल्यावर ‘निर्विचार’ जप करता येणे
प.पू. भक्तराज महाराज यांच्या सुवचनानुसार मी विचार न करण्याचा काही वर्षे प्रयत्न केला; पण माझे स्वभावदोष, आपत्काळातील दुःखद घटना, अनिष्ट शक्तींचा प्रभाव, इत्यादींमुळे मला विचारांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे कठीण झाले. त्यांवर मात करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे प्रभावी अस्त्र दिले आहे. त्यानुसार मी स्वयंसूचना घेत आहे, ‘जेव्हा माझ्या मनात अनावश्यक आणि निरर्थक विचार येतील, तेव्हा मला त्याची जाणीव होईल आणि ‘सर्व विचार हे अविचारच आहेत’, हे प.पू. भक्तराज महाराजांचे सुवचन आठवून मी परम पूज्यांनी सांगितलेला ‘निर्विचार’ हा नामजप करीन.’ परम पूज्यांच्या संकल्पाने हळूहळू मला ‘निर्विचार’ नामजप करण्यात यश मिळत आहे.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे ‘निर्विचार’ नामजप करायचा प्रयत्न केल्यावर शारीरिक आणि मानसिक स्तरावर लाभ होणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभी साधकांना कुलदेवतेचे नामस्मरण करायला सांगितले. त्यानंतर मागील ३० वर्षांत त्यांनी साधकांची स्थिती आणि काळ यांनुसार वेगवेगळे नामजप सांगून ते साधकांकडून करून घेतले. काही साधकांना समष्टीसाठी नामजप करायला सांगून तेही सेवा म्हणून त्यांच्याकडून करून घेतले. आता त्यांनी साधकांना ‘निर्विचार’ नामजप करायला सांगितला आहे. मी हा नामजप केल्यावर माझे विचार अल्प होऊन माझी अंतर्मुखता वाढली आणि मनाला स्थिरता येऊन सकारात्मकताही वाढत आहे. यामुळे उतारवयातही माझा उत्साह वाढला असून प्रकृती सुधारली आहे आणि माझी देहबुद्धी अल्प होण्यास साहाय्य होत आहे.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘निर्विचार’ नामजप करणे, म्हणजे त्यांच्या निर्गुण रूपाशी अनुसंधान साधून निर्गुण स्थितीला जाणे
आरंभापासून मी नामजप करतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे आलंबन करून त्यांच्याप्रती भाव ठेवून नामजप करण्याचा प्रयत्न करतो. आता ‘निर्विचार’ नामजप करतांनाही तसेच होते. परात्पर गुरु डॉक्टर निर्गुणावस्थेत असल्यामुळे ‘निर्विचार’ नामजप करतांना मला ‘त्यांच्या निर्गुणावस्थेतील चैतन्याच्या अनुसंधानात रहाता येते. ते ‘सच्चिदानंद परब्रह्म’ असल्याने मला आनंदी आणि शांत वाटत आहे.
माझ्यासारख्या अगणित साधकांना ‘कुलदेवता ते निर्विचार’ या नामजपाच्या शृंखलेची संजीवनी देणार्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |