आपले अनेक प्रश्न, अडचणी आपण श्रद्धेच्या बळावर सोडवू शकतो ! – श्री परब्रह्म ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज (वाई )
दयाळ, ता. खेड येथे श्री आंबवणकरीनदेवी मंदिराचा कळशारोहण कार्यक्रम
खेड, २८ एप्रिल (वार्ता.) – आज मंदिरांकडे व्यवस्थापनाच्या दृष्टीने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. आपण मुलांना चांगल्या शाळेत पाठवतो; परंतु त्यांना सनातन वैदिक हिंदु धर्मातील प्राथमिक गोष्टीही सांगत नाही. यामुळे नागरिकांमधील श्रद्धा, त्याग आणि कर्तव्याच्या भावनेची उणीव निर्माण होत आहे. प्रत्येक मंदिरात सप्ताहातून किमान १ समष्टी आरती होणे आवश्यक आहे. त्यामुळे सामूहिक श्रद्धेला बळकटी मिळू शकते. व्यष्टी साधनेसमवेत समष्टी म्हणजे सामूहिक उपासनेसाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. मंदिरे ही ऊर्जा स्थाने आहेत. आपले अनेक प्रश्न अडी-अडचणी आपण श्रद्धेच्या बळावर सोडवू शकतो, असे मार्गदर्शन या वेळी वाई येथील श्री परब्रह्म ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज यांनी केले.
तालुक्यातील दयाळ येथे २६ एप्रिल या दिवशी श्री आंबवणकरीनदेवी मंदिराचा कळशारोहण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात वाई येथील श्री परब्रह्म ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज मार्गदर्शनाच्या वेळी बोलत होते. या वेळी पंचक्रोशीतील असंख्य भाविक आणि देवीभक्त उपस्थित होते.