खासगी बसचालकांची तिकीट दरात वाढ !
आर्.टी.ओ.चे दुर्लक्ष !
पुणे – उन्हाळ्याच्या सुट्या चालू झाल्याने विमान आस्थापनाप्रमाणेच खासगी बसचालकांनीसुद्धा त्यांच्या तिकीट दरात दुपटीने वाढ केली आहे. रेल्वे गाड्यांनासुद्धा प्रचंड प्रतीक्षा सूची आहे. खासगी बसचालकांनी वाढवलेल्या दराचा फटका सामान्य प्रवाशांना बसणार आहे. राज्य परिवहन विभागाने खासगी बसचालकांना एस्.टी.च्या तिकीट दराच्या तुलनेत ५० टक्के अधिक दर आकारण्यास संमती दिली आहे. ५० टक्क्यांहून अधिक दराची आकारणी होत असल्यास आर्.टी.ओ. (प्रादेशिक परिवहन विभाग) प्रशासनाला खासगी बसचालकांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत; मात्र याला न जुमानता पुण्यातील खासगी बसचालकांनी वाढीव दर आकारणी केली आहे. मुंबई, पुणे येथून गावी जाणार्या प्रवाशांची संख्या अधिक आहे; मात्र त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या अल्प आहे. ‘नियमापेक्षा अधिक दराची आकारणी करू नये’, असे आवाहन पुणे येथील माल आणि प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केले आहे. ‘प्रवाशांना अधिक रकमेची आकारणी केली जात असल्याचे आढळल्यास प्रवाशांनी तक्रार करावी’, असे पुणे येथील प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका :प्रतिवर्षी सुट्यांमध्ये, तसेच सणांच्या कालावधीत ही समस्या उद्भवते. यावर ठोस उपाययोजना करायला हवी. नियमांचे उल्लंघन करणार्या खासगी बसचालकांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |