जुनी सांगवी (पुणे) येथील नदीपात्रामध्ये स्वच्छता मोहीम !
आतापर्यंत ६ ते ७ टन कचरा काढला !
जुनी सांगवी (जिल्हा पुणे) – शहराच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूला मुळा आणि पवना नदी वहाते. या नदीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो. तरीही गेल्या काही वर्षांमध्ये नागरिकांकडून नदीपात्रात कचरा टाकला जातो. त्यातून नदी प्रदूषित होत आहे. तेव्हा स्वच्छता कर्मचारी सिमाभिंतीवरून नदीपात्रात टाकलेला कचरा मानवी साखळी काढून स्वच्छता करत असून त्यांनी ६ ते ७ टन कचरा नदीपात्राबाहेर काढला आहे. ही स्वच्छता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्तरित्या करण्यात येत आहे. (कचरा टाकणार्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! – संपादक)
जुनी सांगवी येथील पवना नदीकाठावरील श्री गणपति विसर्जन घाट परिसर ते चंद्रमणीनगर या भागात सर्रास नदी संरक्षक भिंतीवरून नदीपात्रात कचरा फेकण्यात येतो. सांगवी-दापोडी परिसरातील नदीकाठावर उभारण्यात आलेली व्यावसायिक पत्राशेड, भंगार मालाची दुकाने, रहिवासी भागातील कचर्यामुळे नदी प्रदूषणामध्ये भर पडत आहे. जुनी सांगवीच्या साहाय्यक आरोग्य निरीक्षक वैशाली रणपिसे म्हणाल्या की, बर्याच ठिकाणी नागरिक अजूनही कचरा उघड्यावर, नदीपात्रात टाकतात. स्वच्छता कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून नागरिकांना वेळोवेळी प्रबोधन करून कचरा गाडीत टाकण्याचे आवाहन करतात. नागरिकांनी नदी परिसराची स्वच्छता राखावी. कचरा गाडीतच टाकावा. (केवळ वारंवार आवाहन करून न थांबता कचरा टाकणार्यांवर त्वरित कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)
नदीपात्रात राडारोडा टाकला म्हणून गुन्हा नोंद !प्रवाहित मुळा नदीपात्रात बांधकाम राडारोडा, दगड, कचरा टाकून नदी प्रदूषण केले. पर्यावरण विभागाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे हरिभाऊ साठे, ज्ञानोबा साठे, अमोल साठे, लक्ष्मण साठे आणि सुभाष कामठे या ५ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यांनी पिंपळे निलख येथील सी.एन्.जी. पेट्रोल पंपामागील नदीपात्रात राडारोडा टाकला आहे. या प्रकरणी स्वप्नील पाटील यांनी तक्रार केली होती. (केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक) |
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे वारंवार नदीपात्रामध्ये स्वच्छता करावी लागणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काढणे आवश्यक आहे ! नद्या आपल्या वाटण्यासाठी आणि त्या राष्ट्रीय संपत्ती आहेत, ही भावना लोकांच्या मनात रुजवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक ! |