हिंदु जनजागृती समितीचे नीलेश टवलारे, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य अनुप जयस्वाल यांचा ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा’ पुरस्कार देऊन सन्मान !
पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान उरुळीकांचन (पुणे) यांच्या वतीने पुणे येथे पुरस्कार प्रदान !
पुणे, २८ एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे अमरावती येथील श्री. नीलेश टवलारे यांना ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा’ पुरस्कार देण्यात आला. यांसह महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय सदस्य श्री. अनुप जयस्वाल यांनाही हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान उरुळीकांचन’ या संघटनेच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा’ पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विविध क्षेत्रांत विशेष कार्य करणार्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिंदुुरत्न डॉ. रवींद्र भोळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी व्यासपिठावर स्वामी दिव्यानंद गिरी, सर्वोत्कर्ष ट्रस्टचे राजेश दातार, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
केंद्रशासनाच्या नीती आयोगद्वारा संचलित ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान उरुळीकांचन (पुणे)’ या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी देशभरातील विविध मान्यवरांना उल्लेखनीय कार्य केल्याविषयी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद भोळे यांना नुकतेच देहली येथे ‘हिंदुरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर श्री. नीलेश टवलारे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी हा पुरस्कार अर्पण करतो. पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान त्यागाची भावना घेऊन समाजासाठी कार्य करत आहे. आपल्या सर्वांचे अभिनंदन. श्री. रवींद्र भोळे यांचे हे कार्य असेच चालू राहो, अशा त्यांना शुभेच्छा !