RSS Supports Reservation: रा.स्व. संघाचा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

भाग्यनगर (तेलंगाणा) – मी येथे आलो, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाच्या विरोधात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. संघ आरक्षणाला विरोध करतो, हे पूर्णपणे खोटे आहे. संघ आरंभीपासूनच राज्यघटनेनुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आला आहे. जोपर्यंत आरक्षणाची आवश्यकता आहे, तोपर्यंत आरक्षण चालूच रहावे, असे संघाचे मत आहे, असे स्पष्टीकरण प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.

आरक्षणाबाबत भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये चालू असलेल्या वादावर सरसंघचालकांनी हे स्पष्टीकरण दिले. सरसंघचालक डॉ. भागवत यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये म्हटले होते की, जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे. समाजात भेदभाव दिसत नसला, तरी असतो.

भाजपचा आरक्षण रहित करण्याचा डाव ! – राहुल गांधी

राहुल गांधी

राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करतांना म्हटले होते की, भाजपला दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी यांचे आरक्षण हिसकावून घेऊन देश चालवण्यातील त्यांचा सहभाग संपवायचा आहे; मात्र राज्यघटना आणि आरक्षण यांच्या रक्षणासाठी काँग्रेस भाजपच्या मार्गात डोंगरासारखी उभी आहे. जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती वंचितांचे आरक्षण हिरावून घेऊ शकत नाही.

राहुल गांधी खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत ! – अमित शहा

गृहमंत्री अमित शहा व राहुल गांधी

राहुल गांधी यांच्या टीकेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर देतांना म्हटले होते की, राहुल गांधी खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. देशात १० वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. दोन्ही वेळा पूर्ण बहुमताने सरकार आले आहे. भाजपला आरक्षण संपवायचे असते, तर ते केव्हाच संपवले असते. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील दलित, मागास, आदिवासी बांधवांना आणि भगिनींना आश्‍वासन दिले आहे की, ‘जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकणार नाही.’ आज मी देशातील जनतेला सांगू इच्छितो की, काँग्रेस पक्षाने नेहमीच अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्या आरक्षणावर आक्रमण केले आहे. कर्नाटकात त्यांचे सरकार आल्यावर  मुसलमानांना ४ टक्के आरक्षण दिले. यासाठी इतर मागासवर्गियांची आरक्षणाची टक्केवारी कमी केली. आंध्रप्रदेशात त्यांचे सरकार आल्यावर तेथेही त्यांनी मुसलमानांना ५ टक्के आरक्षण दिले. जोपर्यंत भाजप राजकारणात आहे, तोपर्यंत अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण अल्प होणार नाही.