चीन पाकव्याक्त काश्मीरमध्ये बनवत आहे नवा रस्ता !
भारताच्या सियाचीनपासून काही अंतरावर आहे रस्ता !
लेह (लडाख) – पूर्व लडाखमध्ये गेल्या ४ वर्षांपासून भारत आणि चीन यांच्यातील तणाव सुरक्षेला सतत धोका निर्माण करत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील एका भागात चीन रस्ता बांधत असल्याचे एका वृत्तातून समोर आले आहे. भारताच्या सियाचीनपासून अवघ्या ३० मैल अंतरावर असलेल्या शक्सगाम खोर्यामध्ये हा रस्ता बांधला जात आहे.
सौजन्य NEWS9 Live
१. वर्ष १९६३ मध्ये पाकव्याप्त काश्मीरचा जो भाग चीनला भेट दिला आहे, त्यात शक्सगाम खोर्याचाही समावेश होता. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग आहे. या दृष्टीने पाकिस्तानने चीनला दिलेली ही भेट पूर्णपणे बेकायदेशीर आहे. असे असूनही चीनने येथे त्याची पकड कायम ठेवली आहे.
२. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार युरोपियन स्पेस एजन्सीने उपग्रहांद्वारे काढलेल्या छायाचित्रांमध्ये असे दिसून आले आहे की, चीनच्या शिनजियांग प्रांतातून निघणारा राष्ट्रीय महामार्ग ‘जी २१९’ आता पाकव्याप्त काश्मीरकडे विस्तारत आहे. हा रस्ता भारतीय सीमेच्या सर्वांत उत्तरेकडील सियाचीनच्या उत्तरेस ५० किमी अंतरावर आहे. चीनच्या काराकोरम पर्वतांमध्ये रस्ते बांधले जात आहेत.
३. भारतीय सैन्यानेही या रस्त्याच्या बांधकामाबाबत चिंता व्यक्त केली आहे. कारगिल, सियाचीन आणि पूर्व लडाख यांच्या सुरक्षेचे दायित्व असलेल्या भारतीय सैन्याच्या ‘फायर अँड फ्युरी कॉर्प्स’चे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल राकेश शर्मा यांनी सांगितले की, हा रस्ता पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने भारताने चीनकडे त्याचा राजनैतिक निषेध नोंदवला पाहिजे.
४. पाकिस्तानने वर्ष २०२१ मध्ये मुझफ्फराबादला गिलगिट-बाल्टिस्तान आणि शक्सगाम खारे यांना जोडणारा रस्ता बांधण्याची घोषणा केली होती. यानंतर हा रस्ता शिनजियांगमधील यारकंद भागाला जोडला जाईल. चीनच्या राष्ट्रीय महामार्ग ‘जी २१९’शी जोडण्यासाठी हा रस्ता शक्सगाम खोर्यात बांधला जात आहे.
भारताने यापूर्वीच व्यक्त केला आहे आक्षेप !
चीनने वर्ष २०१७ आणि २०१८ या काळात काराकोरम खिंडीच्या पश्चिमेकडील खालच्या शक्सगाम खोर्यात एक पक्का रस्ता बांधला. खोर्यात सैनिकी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. वर्ष २०२२ मध्ये सीमा चर्चेमध्ये भारतीय सैन्याने या रस्त्याच्या बांधकामाला कडाडून विरोध केला होता.
संपादकीय भूमिकाभारताला खिंडीत पकडण्यासाठी चीन आणि पाक यांची कटकारस्थाने कायमची उधळून लावण्यासाठी भारताला आता प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक ! |