रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सामवेदी कार्तिक जोशी यांच्याकडून ‘सामगान’
हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे कार्य वैदिक, पुरोहित आणि ब्राह्मण यांच्यासह सनातन संस्थाही करत आहे ! – सामवेदी कार्तिक जोशी
रामनाथी (फोंडा), २७ एप्रिल (वार्ता.) : सनातन संस्था ही एकमात्र अशी संस्था आहे, जिच्याविषयी माझ्या मनात श्रद्धा, प्रेम, आनंद आणि अभिमान आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे कार्य वैदिक, पुरोहित आणि ब्राह्मण यांच्यासह सनातन संस्थाही करत आहे, असे कौतुकोद्गार अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सामवेदी कार्तिक जोशी यांनी काढले. सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘सामगान’ (सामवेदातील साममंत्रांचे गायन) केले. सामवेदातील ‘श्रीगणेशसूक्ता’तील काही सूक्त, ‘पुरुषसूक्त’, ‘श्रीसूक्त’ आणि ‘लक्ष्मीसूक्त’ यांचे सामगान सामवेदी कार्तिक जोशी यांनी केले. या प्रसंगी सनातनचे साधक श्री. उमेश नाईक यांनी श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना सामवेदी कार्तिक जोशी पुढे म्हणाले,
‘‘ सनातनचे वैशिष्ट्य म्हणजे ही संस्था ‘विविध कृतींचे आपल्यावर काय सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतात ? हे ती कारणमीमांसेसह सांगते. यामुळे आपण करत असलेल्या कृतींविषयी आपल्यामध्ये विश्वास आणि भाव निर्माण होण्यास साहाय्य होते. सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त माझी पण सेवा अर्पण व्हावी, या उद्देशाने मी हे ‘सामगान’ केले.’’
सामवेदी कार्तिक जोशी यांचा परिचयसामवेदी कार्तिक जोशी यांनी सामवेदाचे ‘मूलांत अध्ययन’ केले आहे, तसेच पौरोहित्य आणि संस्कृत याचे त्यांनी प्राथमिक अध्ययन केले आहे. मंत्रोच्चार केल्यावर काय परिणाम होतात ? याविषयी संशोधन करण्याची त्यांची तीव्र तळमळ आहे. त्यांनी अंबाजोगाई येथे ५ जून २०२३ या दिवशी ‘श्री सहयोग उज्जीवन प्रतिष्ठान’ ही संस्था चालू केली असून त्याद्वारे गुरुकुल पद्धतीने सामवेद, पौरोहित्य आणि संस्कृत शिकवले जात आहे. |