मराठा आरक्षण विरोधकांना पाडा !
मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
विधानसभेला २८८ उमेदवार देण्याचा संकल्प !
जालना – ‘सर्वांनी आमचे वाटोळे केले; पण लोकशाहीचा हक्क बजावला पाहिजे’, असे विधान करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीसह महायुतीवर टीका केली. ‘लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला विरोध करणार्यांना पाडा. निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार नसले, तरी पाडण्यातही आपला विजय असेल’, असे आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केले आहे. या वेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार देण्याचीही घोषणा केली.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदानकेंद्रावर मनोज जरांगे पाटील यांनी मतदान केले. विशेष म्हणजे प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार चालू आहेत; मात्र रुग्णवाहिकेतून जालना येथे पोचून त्यांनी मतदान केले. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना वरील विधान केले. ‘६ जूनपर्यंत मराठा आरक्षण न दिल्यास मी ८ जूनपासून पुन्हा ‘आमरण उपोषणा’ला बसणार आहे’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.