आदमापूर (जिल्हा कोल्हापूर) येथील संत बाळूमामा देवस्थानाचे मानद अध्यक्ष आणि अन्य विश्वस्त दोषमुक्त !
कोल्हापूर – आदमापूर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानाचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि इतर विश्वस्त यांना धर्मादाय सहआयुक्त यांच्या न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत निरीक्षक रागिणी खडके या देवस्थानाच्या कार्याध्यक्ष म्हणून काम पहाणार आहेत. यातील सगळी कागदपत्रेही विश्वस्तांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१. प्रवीण पाटील, रवींद्र पाटील, हनुमंत पाटील यांनी देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या विरोधात गैरकारभार केल्याचा आरोप करत तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात आली होती.
२. प्रारंभी २४ एप्रिल २०२३ या दिवशी देवस्थानाच्या विश्वस्त पदावरून मानद विश्वस्त आणि इतरांना तात्पुरते निलंबित करण्यात आले होते आणि देवस्थानावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती.
३. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने ३० एप्रिल २०२४ पूर्वी निकाल लावण्याचे निर्देश दिले होते. यानंतर उभय पक्षकारांचे जबाब, युक्तीवाद पूर्ण झाल्यावर धर्मादाय सहआयुक्त यांनी २६ एप्रिल या दिवशी निकाल देऊन मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि इतर विश्वस्त यांच्या विरोधातील आरोप रहित केले.
अनियमिततेच्या विरोधात ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाद्वारे आवाज उठवण्यात आला होता !
संत बाळूमामा देवस्थानाचे संभाव्य सरकारीकरण रहित करून गैरव्यवहारांच्या प्रकरणांची तात्काळ ‘सीआयडी’ चौकशी करा, या मागणीसाठी प्रारंभी गारगोटी येथे आंदोलन करण्यात आले होते, तसेच २७ फेब्रुवारीला कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चा काढण्यात आला होता. यात ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था’, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांचा पुढाकार होता. |