इफ्तार पार्ट्यांवर खर्च करण्याऐवजी तो पैसा समाजातील मुलांच्या शिक्षणावर खर्च करा ! – असिफ हुसेन, अध्यक्ष, जमात-ए-इस्लामी, गोवा
वास्को, २६ एप्रिल (वार्ता.) : मुसलमानांनी इफ्तार पार्ट्यांवर अतिरिक्त खर्च करण्याऐवजी तो पैसा समाजातील मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा, असे आवाहन जमात-ए-इस्लामी, गोवाचे अध्यक्ष असिफ हुसेन यांनी केले आहे. झुवारीनगर, वास्को येथे एका कार्यक्रमात असिफ हुसेन बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘आमच्या समाजात इफ्तार पार्टी, लग्न समारंभ आदींवर अतिरिक्त खर्च केला जातो आणि याचा समाजाला कोणताच लाभ होत नाही. वास्तविक शिक्षणावर अधिक खर्च केल्यास मुसलमान समाजाचा उद्धार होऊ शकतो. आमच्या समाजात विचारवंतांची कमतरता आहे. आमच्या घरांमध्ये पुस्तकांची कमतरता आहे. समाजाला विशेषत: शिक्षण क्षेत्रात दिशा देण्याची आवश्यकता आहे. समाजाच्या प्रत्येक घरात वाचनालय झाले पाहिजे. प्रत्येक मुलाला पुस्तकाचे व्यसन जडले पाहिजे. शिक्षणाविना समाजाचे कल्याण होऊ शकत नाही. यासाठी आम्ही घरी जाऊन शिक्षण देण्याची (होम स्कूलिंग) संकल्पना चालू केली आहे.’’