सलमान खान याच्या इमारतीवर गोळीबार केलेली पिस्तुले बिश्नोईच्या गावातीलच !
मुंबई – अभिनेते सलमान खान यांच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करणार्या आरोपींना २ पिस्तुले आणि ३८ काडतुसे पुरवणार्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने २५ एप्रिल या दिवशी पंजाब येथून अटक केली. सोनू सुभाष चंदर (वय ३७ वर्षे) आणि अनुज थापन (वय ३२ वर्षे) अशी या आरोपींची नावे आहेत. गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली २ पिस्तुले आणि १७ काडतुसे पोलिसांनी पाणबुड्यांच्या साहाय्याने सूरतनजीक तापी नदीतून शोधून काढली. गोळीबार करणार्या दोघांना १५ मार्च या दिवशी पनवेल येथे पिस्तुले देण्यात आली होती. आरोपींची चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सलमानला धमकी देणार्या बिश्नोईच्या गावातूनच ही शस्त्रे आल्याचे समजले.
वांद्रे येथे सलमानचे वास्तव्य असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर दुचाकीवरून आलेल्या विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांनी १४ एप्रिल या दिवशी गोळीबार केला होता. यापूर्वी अटक केलेले विकी गुप्ता आणि सागर पाल यांना २५ एप्रिल या दिवशी न्यायालयात नेण्यात आले. गोळीबार केल्यानंतर या दोघांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ३ वेळा कपडे पालटले, तसेच ३ भ्रमणभाषचा वापर केला.
सध्या कारागृहात असलेल्याा लॉरेन्स बिश्नोईने सलमानला काळवीट शिकार प्रकरणी आव्हान दिले होते. नुकतेच त्याच्या टोळीतील गुंडांनी सलमानच्या इमारतीवर गोळीबार केला |