अमरावती, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यांतील काही ठिकाणी मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड; मतदार ताटकळले !
मतदारांच्या तक्रारींत वाढ !
लोकसभेसाठी मतदानाच्या दुसर्या टप्प्यात विदर्भात ५३.५१ टक्के मतदान !
लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल या दिवशी पार पडले. दुसर्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांत मतदान झाले. वर्धा येथे सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वांत अल्प मतदान झाले. राज्यात ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान झाले.
विदर्भात सरासरी मतदान पुढीलप्रमाणे झाले…
अमरावती – जिल्ह्यातील अचलपूर येथील सिटी हायस्कूलमधील एका मतदान केंद्रावर यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांना पाऊण घंटे ताटकळत उभे रहावे लागले. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर भागातील महापालिकेच्या शाळा क्रमांक १९ मध्येही मतदान यंत्रातील तांत्रिक बिघाडामुळे अर्ध्या घंट्याचा वेळ वाया गेला. अचलपूर येथील या मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदान यंत्रणा चालू झाली होती. दुपारी ११.१५ च्या सुमारास ३६१ जणांचे मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रात बिघाड झाला.
वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क करून यंत्रात बिघाड झाल्याची माहिती देण्यात आली. सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास मतदार यंत्र पालटण्यात आले. त्यानंतर सुरळीत मतदान चालू झाले.
बेगमपुरा येथील नगर परिषदेच्या शाळेतही मतदान यंत्रात बिघाड झाला होता. ‘गेल्या काही वर्षांपासून आम्ही मतदान करत आहोत, तसेच आम्हाला जी मतदार सूची मिळाली, त्यामध्ये नाव आहे म्हणून त्यात दिलेल्या मतदान केंद्रात गेल्यानंतर केंद्रावर ‘तुमचे या मतदार सूचीत नाव नाही’, असे सांगण्यात आले. त्यामुळे ‘आम्ही मतदान कुठे करणार ?’ असा प्रश्न विचारला असता प्रशासनानेही उडवाउडवीची उत्तरे दिली’, अशी तक्रार मतदारांनी केली.
विदर्भ महाविद्यालयातील मतदान केंद्रावर खोली शोधण्यासाठी १ घंट्यांहून अधिक वेळ लागला’, अशा तक्रारी मतदारांनी केल्या आहेत.
बुलढाणा येथे भ्रमणभाषच्या प्रकाशात करावी लागलीमतदानाची सिद्धता !
वीज नसल्याने कर्मचार्यांचे हाल !
बुलढाणा – येथील मतदान केंद्रांवर महावितरणची वीज नसल्याने मतदान कर्मचार्यांना चक्क भ्रमणभाषच्या अपुर्या प्रकाशात मतदानाची पूर्वसिद्धता करावी लागली. यामुळे कर्मचार्यांचे हाल झाले. इकबालनगर भागातील उर्दू माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मतदान केंद्रात हा प्रकार घडला. या ठिकाणी १५६ ते १६३ क्रमांकाची मतदान केंद्रे आहेत. केंद्राला किमान ५ सहस्र मतदार जोडले आहेत.
मतदान साहित्यासह अनुमाने २५ कर्मचारी पोचले, तेव्हा वीजपुरवठा खंडित झाला होता. २६ एप्रिल या दिवशी असलेल्या मतदानाच्या वेळीही विजेचा लपंडाव चालू होता. यामुळे अपुरा प्रकाश आणि उकाडा यांत कर्मचार्यांना काम करावे लागले, तसेच मतदारांचीही असुविधा झाली. या संदर्भात तक्रारी करूनही वीज वितरणचे कर्मचारी आले नाहीत.
मतदान यंत्रात बिघाड
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात कोर्हाळा बाजार येथे असलेल्या एका मतदान केंद्रावरील ई.व्ही.एम्. यंत्रामध्ये बिघाड झाल्याने एक घंटा मतदान प्रक्रिया खोळंबली. मतदार मतदान केंद्रावर ताटकळत उभे होते. याआधी बुलढाणा येथील प्रशासकीय इमारतीमधील ई.व्ही.एम्. यंत्रेही बंद पडली होती.
हिंगोलीत अनेक मतदान केंद्रांवर बिघाड
हिंगोली – येथे मतदान प्रक्रियेदरम्यान काही केंद्रांवर मतदान, व्हीव्हीपॅट यंत्रणांमध्ये बिघाड असल्याचे आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार मतदारसंघांतील ३९ केंद्रांवर बिघाडाच्या संदर्भाने तक्रारी पुढे आल्या. हिंगोलीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, किनवट आणि हदगाव तालुक्यांतील अनुक्रमे टाकळी आणि कोहळा येथील, तसेच वडगावमधील केंद्रावर बिघाडाच्या तक्रारी आल्या. तातडीने १५ मिनिटांत चाचणी घेऊन मतदानाची दुसरी यंत्रे तेथे ठेवण्यात आली. जिल्ह्यात एकूण १६ मतदान यंत्र (सीव्ही) आणि २५ व्हीव्हीपॅट पालटण्यात आली.
काहींच्या म्हणण्यानुसार ‘ऑनलाईन’ सूचीत मतदाराचे नाव आहे; मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर नाही. त्यानंतर शोधाशोध केली असता भलत्याच मतदान केंद्रावर नाव आले होते.
यवतमाळ – येथे ३ नवरदेव विवाहाला मंडपात जाण्यापूर्वी मतदान करण्यासाठी मतदानकेंद्रावर वराच्या पोषाखातच आले. यवतमाळचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले.