उतावीळ काँग्रेस
‘काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास तुमची संपत्ती लुबाडून अधिक लेकरे असलेल्या लोकांत वाटप करील’, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेत केला. जसे की, ‘मोदी सत्तेत आले की, लोकशाही संपणार; राज्यघटना पालटणार वगैरे’, आरोप मोदींवर करण्यात येतात. सर्वच पक्ष नेहमीच अतिशयोक्ती पूर्ण आरोप करत असतात. अशा आरोपांचे खंडण केले नाही, तर त्याचा परिणाम सामान्य लोकांवर होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे काँग्रेसने मोदी यांच्या आरोपाचे ठामपणे खंडण करणे आवश्यक होते; पण झाले भलतेच. अधिक लेकरे असणारे लोक, म्हणजे विशिष्ट धर्माचे लोक असा अर्थ लावण्यात आला. त्याला कारण म्हणजे काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान काळात केलेले वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी उद्धृत केल्याचा संदर्भ होय. डॉ. मनमोहन सिंग यांनी ‘देशाच्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यांक लोकांचा त्यातही मुसलमानांचा आहे’, असे वक्तव्य केले होते’, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे मोदी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष जितका विरोध करील, तितक्या वेळा मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेतला जाईल.
‘काँग्रेसचे घोषणापत्र आणि तिच्या नेत्यांची वक्तव्ये यांचा एकत्र विचार झाला पाहिजे’, असा सापळा नरेंद्र मोदी यांनी रचला. काँग्रेस पक्ष धावत येऊन सापळ्यात अलगद अडकला. ‘काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही’, असे स्पष्टीकरण काँग्रेस नेत्यांनी दिले. ‘मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान काळात केलेल्या वक्तव्याशी काँग्रेस पक्षाचा संबंध नाही’, असे स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाने अद्याप तरी दिलेले नाही.
वर्ष १९४७ मध्ये महंमद अली जिना यांनी धर्माचे नाव पुढे करून भारत देशाचे तुकडे पाडले. पाकिस्तान आणि बांगलादेश ‘इस्लामी राष्ट्रे’ बनली. ही पार्श्वभूमी ध्यानात घेता मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान पदावरून केलेले वक्तव्य एकांगी आणि एका धर्माच्या लोकांचे लांगूलचालन करणारे ठरते.
त्यामुळे देशाचे नेतृत्व कुणाकडे जाणार ? यासाठी चालू असलेल्या या निवडणुकीत प्रतिस्पर्धी पक्षाच्या उणिवा आणि घोडचुका मांडणे रास्त ठरते.
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘सत्य समाजाच्या मागे फरपटत येणार नाही; पण एक ना एक दिवस समाजाला सत्याची कास धरावीच लागेल.’
– श्री. सिद्धराम पाटील, सोलापूर. (२५.४.२०२४)
(साभार : फेसबुक)