नवा पाकिस्तान : राजकारण, आतंकवाद आणि युद्ध
१. सध्याचा पाकिस्तान आणि पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांचे बोल खरे होण्याची शक्यता
पाकिस्तान सध्या अंतर्गत अस्थिर राजकीय खेळीने खिळखिळा होण्याच्या मार्गावरून बराच पुढे गेला आहे. नुकतेच पंतप्रधान म्हणून निवडून आलेले शाहबाज शरीफ आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील सत्तेसाठी झालेली पळापळ सर्व जगाने जवळून बघितली आहे. ही अस्थिर करणारी सर्व परिस्थिती त्या देशामध्ये घडत आहे जिथे जवळपास १७० आण्विक अस्त्रे अनियंत्रित सत्तेच्या तराजूत तोलली जात आहेत. पाकिस्तान हा तोच देश आहे, ज्याचे सर्वेसर्वा झुल्फिकार अली भुट्टो एकेकाळी म्हटले होते, ‘आम्ही गवत खाऊ, भुकेले राहू; पण आण्विक अस्त्र बनवूच.’ आज जरी प्रत्यक्षात गवत खाण्याची वेळ पाक जनतेवर आलेली नसली, तरी येत्या काही दिवसांत या प्रकारची परिस्थिती निर्माण व्हायला अधिक वेळ लागणार नाही. आज पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरतेमुळे महागाईचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे महागाईची माळ शाहबाज शरीफ आणि इम्रान खान यांनी एकमेकांच्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच देशासमोरील आर्थिक संकटावर प्रकाश टाकून जनतेला महागाईच्या ज्वालांमधून बाहेर काढण्याऐवजी आरोप-प्रत्यारोपांमध्ये जनतेला गुंतवून ठेवले आहे. त्यामुळे मागच्या १६ मासांत पाकिस्तानमध्ये विक्रमी महागाई वाढली आणि अन्न अन् इंधन यांच्या किंमती विक्रमी उच्चांकावर जाऊनसुद्धा आजी-माजी पंतप्रधान ठोस उपाययोजना करण्यात अपयश स्वीकारलेले दिसून येते.
यासह वर्ष २०२३-२०२४ च्या आर्थिक वर्षामध्ये डबघाईला आलेल्या राजकीय अस्थिरतेचा सरळ परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊन पाकिस्तानमधील महागाई २८.३ टक्क्यांवर जाऊन पोचली आणि चलनवाढीचा दर ३७.९७ टक्के इतक्या विक्रमी उच्चांकावर येऊन पोचला आहे. अन्नासाठी दाही दिशा भटकणार्या आफ्रिकन देशात जी परिस्थिती सध्या आहे, तशीच परिस्थिती धर्मांध पाकिस्तानात निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील अन्नाचा साठा वेगाने संपत आहे. मागच्या ५० वर्षांत नव्हती, अशी आर्थिक चणचण सध्या पाकिस्तान अनुभवत आहे. यामध्ये तर अशी वेळ आली होती की, ३ हप्ते आयात करता येईल, एवढाच पैसा सरकारी तिजोरीमध्ये शिल्लक होता. काही दिवसापूर्वी तर केंद्रीय नियोजन मंत्री एहसान इक्बाल यांनी अशी घोषणा केली, ‘पाकिस्तानी जनतेने चहाचा एक-एक कप कमी करावा; कारण जो चहा आपण पितो, तो उधार आणला जात आहे’, म्हणजे ‘उधारी के पैसो पे बंधे बने नवाब’, अशी वेळ येणे, याचाच अर्थ ‘पाकिस्तानी जनता गवत खाण्यापासून लांब नाही’, ही झुल्फिकार अली भुट्टो यांची भविष्यवाणी खरी ठरणार आहे.
पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या कूटनीतीने भारताविरोधात ४ आघाड्यांवर पुकारलेले युद्ध
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रसिद्ध वक्तव्य, म्हणजे ‘तुम्ही तुमचे मित्र पालटू शकता; पण तुम्ही तुमचे शेजारी पालटू शकत नाही.’ या उक्तीनुसार आपल्या अवतीभवती घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा चांगला आणि वाईट परिणाम सभोवतालच्या देशांवर होत असतो. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे भारताच्या शेजारील राष्ट्र होय. भारताच्या शेजारी असलेला पाकिस्तान आणि चीन या २ उग्रवादी राष्ट्रांमुळे भारताला स्वतःची पश्चिम आणि पूर्व सीमा सूक्ष्म देखरेखीखाली ठेवावी लागते; कारण या दोन्ही देशांमुळे भारताचा संरक्षण व्यय तर वाढलाच आहे; पण त्यासह आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर भारताला मुत्सद्देगिरीसाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. असे असले, तरीही तत्कालीन शासनकर्त्यांनी राजनैतिक शिष्टाई न बाळगल्याने भारताला बर्याचदा आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर माघारही घ्यावी लागलेली होती, हे आपण इतिहासात सर्वांनी बघितलेच आहे. भूतपूर्व राजदूत त्रिलोकनाथ कौल यांनी ‘ए डिप्लोमॅट्स डायरी १९४७-१९९९ (चीन, भारत आणि अमेरिका)’ या पुस्तकात लिहिले आहे, ‘अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा असा प्रयत्न होता की, वर्ष १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रमात चीनने पाकिस्तानला लष्करी सहकार्य करून भारताच्या विरोधात या रणसंग्रामात उतरावे.’ निक्सन यांची अशीही इच्छा होती की, ‘चीनच्या प्रवेशाने रशियाने भारतासमवेतच्या मैत्री कराराच्या निमित्ताने चीनच्या विरोधात उभे ठाकावे, म्हणजे एकाच वेळी चीन आणि रशिया हे साम्यवादी देश अन् अलिप्ततावादाचा पुरस्कर्ता भारताचा खेळ संपवता येईल.’ ही रणभूमीवरची कूटनीती निक्सन आणि हेन्री किस्सिंजर (अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव) यांच्या डोक्यात पुष्कळ दिवसांपासून शिजत होती; पण निमित्त नसल्याने ही योजना मागे पडत गेली.
आता आपण हे समजून घेऊ की, हे सर्व कशासाठी ? तर सर्वांत मोठा खेळ, म्हणजे भारताला ४ आघाड्यांवर लढायला बाध्य करावे.
अ. पहिली आघाडी भारत आणि पूर्व पाकिस्तान यांच्या (सध्याचा बांगलादेश) सीमाक्षेत्रात राहील, जिथे भारताला निर्वासित संकट आणि मुक्तीसंग्रामासाठी शक्ती व्यय करावी लागेल.
आ. दुसरी आघाडी पाकिस्तान अनधिकृत व्याप्त जम्मू-काश्मीर क्षेत्रात जिथे अमेरिकेने दिलेल्या शस्त्रांच्या जोरावर भारत आणि पाकिस्तानात युद्ध जुंपेल.
इ. तिसरी आघाडी चीन आणि पाकिस्तान यांना साहाय्य करण्यासाठी अकसाई-चीन आणि तिबेटच्या सीमेवर छोटी-मोठी युद्धसदृश्य चकमक चालू करील.
ई. चौथी म्हणजे सर्वांत मोठी लक्ष विचलित करणारी आघाडी ज्याचा उल्लेख जॅक अँडरसन यांनी दैनिक ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधील लेखात केला होता, तो म्हणजे ‘अमेरिकन नेव्ही’च्या ७ व्या ‘फ्लिट’चे ‘टास्क फोर्स-७४’ बंगालच्या उपसागरात पाठवून भारताला स्वतःच्या नौदलाचे संपूर्ण लक्ष ‘टास्क फोर्स-७४’कडे वळवावे लागेल. यामुळे भारताने पूर्व पाकिस्तानची केलेली नाकाबंदी मोकळी करता येईल आणि भारताला त्याच्याच हद्दीत नतमस्तक करता येईल.
वर्ष १९७१ च्या काळात पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या कूटनीती धोरणाने भारताला ज्याप्रमाणे ‘फोर फ्रंट ऑफ वॉर’ (४ आघाड्यांवरील युद्ध)च्या दाराशी आणून ठेवले होते, तशीच पुनरावृत्ती आज इतिहासाने पाकिस्तानविषयी केली आहे. आजच्या घडीला पाकिस्तान अंतर्गत आणि ३ विविध आघाड्यांवर युद्धसदृश्य परिस्थितीत अडकला आहे. दुसर्यांसाठी खोदलेल्या खड्डयात पाकिस्तान आज स्वतः पडलेला आहे. याचे विपरीत परिणाम येणार्या काळात पाक जनता आणि तेथील राज्यकर्ते यांना भोगावे लागतील, यात शंका नाही.
लेखक : श्री. विलास एन्. कुमावत, साहाय्यक प्राध्यापक, संरक्षण शास्त्र विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.
२. पाकिस्तान आणि संघर्ष
जगातील कोणताही देश स्वबळावर किंवा पाठीमागून मिळालेल्या साहाय्याच्या आधारे विकसित बनण्याचा प्रयत्न करत असतो. असेच २ देश दक्षिण आशियाच्या पटलावर वर्ष १९४७ मध्ये निर्माण झाले. पहिला पाकिस्तान आणि दुसरा भारत. पाकिस्तानला त्याच्या भू-सामरिक स्थितीचा लाभ करून जगात वेगळे स्थान निर्माण करायचे होते, तर अमेरिका, इंग्लंड आणि काही युरोपियन देशांना आशियात इमानदार (प्रामाणिक) गुलाम हवा होता, जो अफगाणिस्तान, रशिया, चीन अन् भारत यांच्यावर लक्ष ठेवून पितृदेशांना ‘रिपोर्टींग’ (बातम्या) करील. म्हणून पाकिस्तानने ‘पाश्चिमात्य राष्ट्रांचा गुलाम देश’ बनून पितृदेशांच्या गुलामीत राहून बक्कळ पैसे आणि लष्करी साहित्य मिळवू लागला अन् याचा पूर्ण उपयोग देशाच्या उत्थानासाठी न करता काश्मीर प्रश्नावरून भारताच्या विरोधात करायला प्रारंभ केला.
पाकिस्तानने भारताच्या विरोधात इतकी कटकारस्थाने करूनही देहलीच्या शासनकर्त्यांनी नेहमीच मवाळ धोरण स्वीकारले होते; पण येणारा भविष्यकाळ पाकिस्तानसाठी मोठा संघर्षाचा ठरणार होता; कारण देहलीच्या राजकारणाची सूत्रे भाजपच्या नरेंद्र मोदींच्या हाती आली होती आणि तेव्हापासून भारताच्या मवाळ परराष्ट्र धोरणाने जहाल स्वरूप धारण केले. भारताच्या या ताठर भूमिकेने पाकिस्तानची भू-राजनीती हळूहळू प्रभावित होऊ लागली आणि आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर पाकिस्तानला एकाकी पाडण्यात भारत यशस्वी होऊ लागला. ज्या पाश्चिमात्य राष्ट्रांच्या पाठिंब्याने गेली ५० वर्षे पाकिस्तान दक्षिण आशियाच्या क्षितिजावर आतंकवादाचे काळे ढग बनवत होता, आज त्याच पाकची अवस्था स्वतः प्रशिक्षित केलेल्या आतंकवादाने दुबळी झाली आहे. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेमुळे पाकिस्तान मोठया प्रमाणात त्रस्त झाला आहे; कारण ‘टीटीपी’, ‘फाटा’ (‘फेड्रली ॲडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरियाज’ – संघराज्य प्रशासित आदिवासी क्षेत्र) परिसरातून पाकमधील छोट्या मोठ्या आतंकवादी संघटनांना वित्त, तसेच लष्करी साहित्य पुरवून पाक लष्कराला आव्हान द्यायला प्रोत्साहित करते. यामध्ये ‘लष्कर-ए-झांगवी’, ‘जैश-ए-महंमद’ आणि ‘हिजबुल-उल-मुजाहिदीन’ यांनीही हीच परिस्थिती निर्माण केली आहे. त्यानंतर ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने तर पाकिस्तान सरकार, लष्कर आणि ग्वादर बंदरातील चिनी गुंतवणूकदार यांना सळो कि पळो करून सोडले आहे.
३. पाकची तिहेरी लढत
‘बिझनेस स्टँडर्ड’च्या वृत्तानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमा भागात दोन्ही देशांचे अनुमाने ५० सहस्र ते ६० सहस्र सैनिक ‘स्टँड बाय’ (उभे आहे) स्थितीत आहेत, म्हणजे पाकिस्तानची एक चुकीची कृती त्याला युद्धाच्या दरीत ढकलू शकते. दुसरी लढत उत्तर वझिरिस्तानमधील एका लष्करी चौकीवर झालेल्या आक्रमणात ७ सैनिक ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य आणि अफगाण सीमेवरील अफगाण तालिबान अन् ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ यांच्यात चालू आहे. तिसरी आणि महत्त्वाची लढत ही पाक अन् इराण यांच्यात आहे. हा वाद जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला; कारण इराणच्या सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील ‘जैश अल-अदल (आर्मी ऑफ जस्टिस)’ या आतंकवादी गटाच्या कथित तळांवर आक्रमणे करून इराणने थेट कारवाई केली. यावर पाकिस्तानने २ दिवसांनंतर ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ आणि ‘बलुचिस्तान लिब्रेशन फ्रंट’च्या सुरक्षित आश्रयस्थानांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील अनेक संशयित लक्ष्यांवर हवाई आक्रमण प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही देशातील वाद सध्या टोकाला जाऊन पोचला आहे. पाकच्या राष्ट्रीय सुरक्षेची सध्याची अंतर्गत आणि बाह्य स्थिती मोठ्या प्रमाणात आव्हानात्मक बनत चालली आहे. त्यामुळे भारताने पुष्कळ काळजीपूर्वक स्वतःची पावले टाकावीत; कारण आगीत होरपळणार्या पाकिस्तानची झळ भारताला लागू नये, यासाठी आपण अजून विशेष प्रयत्न करणे, हाच उपाय राहील.