नंदुरबार येथे लाचखोर प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरुद्ध जमाव संतप्त !
वारे यांना घेऊन जाणार्या वाहनावर जमावाकडून आक्रमणाचा प्रयत्न !
नंदुरबार – लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू असतांना जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना दीड लाख रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले. कारवाईची माहिती मिळताच संतप्त जमावाने नवापूर पोलीस ठाण्यासमोरच लाचखोर वारे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या, तसेच त्यांना घेऊन जाणार्या वाहनावरही आक्रमणाचा प्रयत्न केला. त्यामुळे नवापूर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
(ही आहे पोलिसांची समाजात कीर्ती ! असे पोलीस अधिकारी पोलीसदलाला कलंकच आहेत. अशा पोलिसांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. – संपादक)
प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यावर आतापर्यंत अनेक आरोप झाले आहेत. गुजरात राज्यातील सोनगड पोलीस ठाण्यात नवापूर येथील एका संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याच्या अन्वेषणासाठी गुजरात पोलिसांचे पथक नवापूर पोलीस ठाण्यात आले होते. त्या वेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी मध्यस्थी केल्याने संशयिताला अटक झाली नव्हती. त्या मोबदल्यात वारे यांनी संशयिताच्या मित्राकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. पंचासमक्ष मागणी केलेले ५० सहस्र रुपये स्वीकारतांना वारे यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २४ एप्रिल या दिवशी अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाअसे पोलीस जनतेचे रक्षक नसून भक्षकच आहेत, असे म्हटल्यास त्यात चूक काय ? |