सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून स्वतःच्या तिन्ही मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणार्या आणि स्वतःही पूर्णवेळ साधना करणार्या श्रीमती संध्या बधाले (वय ५० वर्षे) !
चैत्र कृष्ण तृतीया (२७.४.२०२४) या दिवशी श्रीमती संध्या बधाले यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मोठी मुलगी सोनाली बधाले हिला आईविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
श्रीमती संध्या बधाले यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. आईने मुलांना व्यावहारिक शिक्षण घेण्याचा आग्रह न करता मुलांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवणे : ‘माझी आई श्रीमती संध्या बधाले हिने मी आणि माझे २ लहान भाऊ श्री. अमोल आणि श्री. अतुल यांच्या भविष्याची चिंता करून आम्हाला व्यावहारिक शिक्षण घेण्यासाठी आग्रह केला नाही. माझ्या आईची प्रथमपासूनच देवावर पुष्कळ श्रद्धा आहे. सनातन संस्थेने सांगितलेली साधना समजल्यावर तिला साधनेचे महत्त्व मनोमन पटले. तिने लगेचच साधनेला आरंभ केलाच; पण तिने आमच्यावरही साधनेचे संस्कार केले.
२. मुलांवर साधनेचे संस्कार करून मुलांसह स्वतःही पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी आश्रमात येणे : आईने सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला आणि आम्हा भावंडांवरही तिने साधनेचे संस्कार केले. तिने आम्हाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पाठवले. नंतर तीही रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आली. केवळ आईमुळेच आम्ही सर्व कुटुंबीय गुरुदेवांच्या छत्रछायेखाली पूर्णवेळ साधना करत आहोत. ‘कोण काय म्हणेल ?’, यापेक्षा ‘माझी मुले देवाजवळ (गुरुदेवांजवळ) आहेत; म्हणून मला त्यांची काळजी नाही’, असे ती म्हणते.
३. तीव्र आध्यात्मिक त्रासातही अनुभवलेली आईची साधनेची चिकाटी आणि त्यामुळे झालेली गुरुकृपा !
३ अ. आईला होणारा तीव्र आध्यात्मिक त्रास : आम्ही घरी राहून साधना करत असतांना आईला आध्यात्मिक त्रास असल्याची तिला किंवा आम्हा कुणालाच जाणीव नव्हती; पण ती रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू लागल्यावर तिला तीव्र त्रास होऊ लागले. त्रासाचे स्वरूप इतके तीव्र असायचे की, तिला ‘ती काय करत आहे ?’, हेही समजत नसे. तिला साध्या कृती करायलाही कठीण वाटत होते. तिचा आत्मविश्वास न्यून झाला होता. वर्ष २०१७ ते वर्ष २०२३ पर्यंत तिला होणार्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता पुष्कळ तीव्र होती.
३ आ. तीव्र त्रास होत असूनही साधनेत कधीही सवलत न घेणे
३ आ १. शारीरिक त्रासामुळे रात्री झोप लागत नसेल, तेव्हा त्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे : आईला अनेक शारीरिक त्रासही आहेत. त्यामुळे तिला रात्री झोप लागत नाही. तिला रात्री झोप लागत नाही, तेव्हा ती आध्यात्मिक उपाय करते, उदा. त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, नामजप करणे, प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकणे, इत्यादी. तिला कितीही त्रास होत असला, तरी ती आध्यात्मिक नामजपादी उपाय करण्याचे कधीच सोडत नाही. तिच्या मनात कधी नकारात्मक विचार आल्यावर ती ते कागदावर लिहून त्याला देवाच्या नामजपाचे मंडल घालून ते अग्नी समर्पण करते.
३ आ २. सेवेला वेळेतच जाणे : त्रासामुळे तिची रात्री झोप पूर्ण झाली नाही, तरीही ती सकाळी लवकर उठून सेवेला जाते. मी तिला म्हणत असे, ‘‘तुझी झोप पूर्ण झाल्यानंतर तू सेवेसाठी जा’’; पण ती तिच्या नेहेमीच्या ठरलेल्या वेळेत उठून सकाळी वेळेत सेवेला जाते. याविषयी तिला विचारल्यावर ती म्हणते, ‘‘आश्रमात वेळेवर गेल्यावर नामजपादी उपाय पूर्ण होतात आणि सेवाही होते.’’ तिने ‘त्रास होतो’, यासाठी कधीही सवलत घेतली नाही.
३ इ. अनुभवलेली गुरुकृपा ! : पूर्वी घरी असतांना ‘आईला आध्यात्मिक त्रास होत आहे’, याची जाणीव तिला किंवा आम्हालाही होत नव्हती; पण ती पूर्णवेळ साधना करायला रामनाथी आश्रमात आल्यावर ‘तिला आध्यात्मिक त्रास होत आहे’, असे लक्षात आले; पण तिने मनापासून केलेल्या साधनेच्या प्रयत्नांमुळे तिचा आध्यात्मिक त्रास लवकर न्यून झाला. मला वाटले, ‘आम्ही घरी रहात होतो, तेव्हा तिची कर्तव्ये पार पडण्यासाठी देवाने तिला आवश्यक शक्ती देऊन त्रास जाणवू दिला नाही; पण ती पूर्णवेळ साधना करू लागल्यावर तिचे त्रास न्यून झाले. तिचे आध्यात्मिक त्रास न्यून करून देवाने साधनेत प्रगती करण्याचा तिचा मार्ग मोकळा केला.’
४. शिकण्याची वृत्ती : आई आश्रमात होणार्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी (टीप) असलेल्या आढाव्याला बसते. तिथे ‘तिला शिकायला मिळालेली सूत्रे ती रात्री खोलीत आल्यावर मला मोकळेपणे सांगते. एखाद्या प्रसंगात तिला तिची चूक लक्षात आली नाही, तर ती ‘यात माझा स्वभावदोष कुठला ?’ किंवा ‘दृष्टीकोन कसा हवा ?’, याविषयी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा गाडगीळकाकूंशी बोलून घेऊन त्या सांगतील, तसे प्रयत्न करते. ‘योग्य कृती केल्याने मला ईश्वराचे चैतन्य मिळेल’, असा तिचा विचार असतो.
(टीप – स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका सारणीत (वहीत केलेल्या तक्यात) लिहिणे, त्या कुठल्या स्वभावदोषांमुळे झाल्या, ते लिहून त्यापुढे योग्य दृष्टीकोनाच्या सूचना लिहिणे आणि त्या सूचना दिवसातून १० – १२ वेळा मनाला देणे)
५. अपेक्षा नसणे
अ. आईला शारीरिक त्रास होत असतांनाही तिला जेवढे शक्य होते, तेवढे करण्याचा ती प्रयत्न करते. तिची माझ्याकडून किंवा माझ्या भावांकडून अपेक्षा नसते. तिला वेदना फारच असाहाय्य झाल्या किंवा काहीच करायला जमत नसेल, तरच ती माझे साहाय्य घेते.
आ. तिला तिच्या दोन्ही सूनांकडूनही कुठलीही अपेक्षा नसते किंवा तिच्या मनात ‘मी सासू आहे आणि त्या सूना आहेत’, असाही विचार नसतो.
६. भाव
६ अ. दोन्ही भावांच्या विवाहांच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे आगमन झाल्यावर आईची भावजागृती होणे : आईच्या मनात सनातनचे सद्गुरु आणि संत यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. माझ्या दोन्ही भावांच्या विवाहाच्या वेळी गुरुदेवांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आल्यावर तिची पुष्कळ भावजागृती झाली. ‘पूर्ण विवाहामध्ये हाच क्षण सर्वांत महत्त्वाचा असून त्यांच्या माध्यमातून श्री गुरु आपल्याला भेटायला आले आहेत’, असा तिचा भाव होता.
६ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
१. माझ्या दोन्ही भावांच्या लग्नाच्या वेळी ‘सर्व काही गुरुदेवच करणार आहेत’, असाच तिचा भाव होता.
२. ‘गुरुदेवांच्या शिकवणीमुळे मला माझ्या दोन्ही सुनांशी (सौ. वैष्णवी आणि सौ. आनंदी यांच्याशी) सहजतेने बोलता-वागता येते. एरवी मला हे जमले नसते’, असे ती म्हणते.
७. जाणवलेला पालट
७ अ. मनमोकळेपणा : आईला पूर्वी मोकळेपणाने बोलायला जमत नव्हते. आई काही मास ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा गाडगीळकाकू यांच्या खोलीत रहात होती. गाडगीळकाकूंमुळे आई मनमोकळे बोलायला शिकली. गाडगीळकाकू तिला सांगतील, तसे करण्याचा ती प्रयत्न करायची. ‘माझे गुरुच त्यांच्या माध्यमातून मला सांगत आहेत. मी तसे प्रयत्न करायला हवेत’, असा तिचा भाव होता.
७ आ. भावजागृतीचे प्रयत्न वाढणे : श्रीमती मनीषा गाडगीळकाकू यांनी आईला प.पू. गुरुदेव आणि प.पू. फडकेआजी (सनातनच्या पहिल्या संत आणि गाडगीळकाकूंच्या आई) यांच्या आठवणी सांगितल्या. तेव्हापासून आई भावजागृतीचे प्रयत्न करत आहे.
७ इ. प्रसंगातून शिकणे : आता एखादा प्रसंग घडल्यावर आई त्या प्रसंगात अडकून रहात नाही. ती त्या प्रसंगातून शिकून लगेच बाहेर पडते.
७ ई. मायेची आसक्ती न्यून होऊन साधनेचे प्रयत्न वाढणे : माझ्या दोन्ही भावांच्या विवाहाच्या वेळी आईने त्यामध्ये फार लक्ष घातले नाही किंवा ‘मलाच विचारून सर्व करायला हवे’, असाही तिचा विचार नव्हता. अतुलच्या विवाहाच्या वेळी तिने ‘स्वतःतील स्वभावदोष आणि आध्यात्मिक त्रास न्यून व्हावा’, यासाठी तळमळीने साधनेचे प्रयत्न केले, तर अमोलच्या विवाहाच्या वेळी तिने भाव वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले.
७ उ. कृतज्ञताभाव वाढणे : ‘माझ्या दोन्ही मुलांचे विवाह रामनाथी आश्रमात आणि श्री गुरूंच्या कृपेमुळे झाले’, याची तिला सतत जाणीव असते. ‘प.पू. गुरुमाऊली माझ्यासाठी किती करत आहे ?’, या जाणीवेने तिचा कृतज्ञताभाव आणि सकारात्मकता वाढली आहे.
७ ऊ. आनंदी रहाणे : पूर्वी आईला आमची काळजी वाटत असे; परंतु ‘प.पू. गुरुमाऊली सर्वकाही चांगलेच करणार आहेत’, असा भाव ठेवून आता ती निश्चिंत आणि आनंदी रहाते.’
– सोनाली बधाले (श्रीमती संध्या बधाले यांची मोठी मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.४.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |