अनेक जन्मांचे पुण्यफळा आले । अनसूयेच्या कुशीत त्रिदेव निजले ।
उद्या चैत्र कृष्ण चतुर्थी (२८.४.२०२४) या दिवशी अत्रिऋषिपत्नी अनसूया यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
‘पातिव्रत्य आणि मातृत्व यांचे सर्वाेच्च स्थान प्राप्त करणार्या अत्रिऋषिपत्नी अन् दत्तात्रेयांची माता अनसूया यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ! माता अनसूयेने धर्माचरणाचे कठोर पालन करून समस्त जगासमोर ‘श्रेष्ठ पत्नी, थोर माता आणि आदर्श हिंदु स्त्री’, यांचे ज्वलंत उदाहरण ठेवले आहे. माता अनसूयेच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने वंदन करून ही काव्यसुमनांजली वहात आहे.
कशी वर्णावी अनसूयेची महती । चहुकडे पसरली तिचीच कीर्ती ।
अत्रिभार्या असे महान सती, ती असे पातिव्रत्याची साक्षात् मूर्ती ।। १ ।।
परम पावन रूपवती, सुकोमल, सुंदर, सुशील अन् सुमती ।
पतीसेवेत गुंतली युवती, शुद्ध झाली तिची चित्तवृत्ती ।। २ ।।
अनसूयेची अनन्य भक्ती, सतीत्वाची अमोघ शक्ती ।
तिला बनवण्या पुत्रवती, अवतरल्या दिव्य विभूती ।। ३ ।।
श्रीपती (विष्णु) अन् उमापती (शिव) संगे आले आदि प्रजापती (ब्रह्मा)।
भिक्षापात्र घेऊन हाती, अत्रिद्वारी आल्या त्रिमूर्ती ।। ४ ।।
का दिव्य सुगंध दरवळतो वातावरणात ।
का दिव्य तेज व्यापते आसमंतात ।। ५ ।।
आज कोण आले माझ्या अंगणात ।
भिक्षु पाहूनी अनसूया पडली पेचात ।। ६ ।।
संपत आली आमची तितिक्षा (संयम), नको करू आमुची उपेक्षा ।
आम्हा हवी एकच भिक्षा, लज्जा सोडूनी घाल भिक्षा ।। ७ ।।
पतिव्रतेची घेण्या परीक्षा, जगावेगळी मागितली भिक्षा ।
पूर्ण करते तुमची इच्छा, क्षणभर करावी अतिथींनी प्रतीक्षा ।। ८ ।।
अनसूया हळहळली मनात, ‘माझे सतीत्व सापडले संकटात’ ।
पतीदेवांच्या आर्त स्मरणात, पाणी तरळले तिच्या नयनांत ।। ९ ।।
धर्म दिसे प्रत्येक कर्मात, धर्म वसे प्रत्येक क्षणात ।
धर्म असे प्रत्येक श्वासात, धर्म वसे कणाकणात ।। १० ।।
पातिव्रत्याचे होईल भंजन, सतीत्व करील संकटमोचन ।
पतीदेवाला गेली शरण आणि केले तीर्थ-प्रोक्षण ।। ११ ।।
घटना घडली मोठी विलक्षण, काळ थांबला काही क्षण ।
बालरूप करूनी धारण, त्रिदेवांनी केले तिच्या सतीत्वाचे रक्षण ।। १२ ।।
क्षणात सारे परिवर्तन झाले, भुकेल्या बाळांनी रुदन केले ।
मातेने बाळांना जवळ घेतले अन् ममतेने दुग्धपान केले ।। १३ ।।
देवाने तिला मातृत्व बहाल केले, देवमातेचे परमोच्च पद दिले ।
अनेक जन्मांचे पुण्य फळा आले, अनसूयेच्या कुशीत त्रिदेव निजले ।। १४ ।।
धन्य तिची पतीभक्ती, धन्य तिची सेवावृत्ती ।
तिला लाभली पूर्ण तृप्ती, तिला लाभला मोक्ष अन् मुक्ती ।। १५ ।।
ब्रह्मापासून चंद्रदेव आणि शिवापासून दुर्वास मुनी निर्मिले ।
श्रीविष्णूपासून श्री दत्तात्रेयांचे मंगलमय रूप सगुणात अवतरले ।। १६ ।।
अशा प्रकारे अनसूया श्री दत्तगुरूंची माता झाली ।
तिच्यामुळे संपूर्ण विश्वात दत्तरूपी त्रिमूर्ती साकारली ।। १७ ।।
तिची बाळे जगद्पती, अशी ती महान परम सती ।
तिच्यापुढे कुणाची गणती, ती होती परम सौभाग्यवती ।। १८ ।।
प्रार्थना
‘हे माता अनसूया, आम्हा सर्वांवर तुझी कृपादृष्टी अखंड असू दे. हिंदु स्त्रियांना तुझ्या उदाहरणातून आदर्श हिंदु नारी बनण्याची प्रेरणा मिळू दे अन् भारतभूमीत तुझा वारसा असाच पुढे चालत राहू दे’, अशी तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे,), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |