राहुल कळंबटे यांनी काढलेल्या बालिकेच्या त्रिमितीय (थ्रीडी) रांगोळीला मिळाला देशात चौथा क्रमांक
रत्नागिरी – तालुक्यातील मालगुंड येथील रांगोळीकार श्री. राहुल कळंबटे यांनी २ वर्षांपूर्वी काढलेल्या बालिकेच्या त्रिमितीय (थ्रीडी) रांगोळीला देशात चौथा क्रमांक मिळाला आहे. राजस्थान येथील २७ आर्ट पॉइंट या संस्थेच्या वतीने ही राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती.
२ वर्षांपूर्वी शहरातील सहकारनगर येथील राधाकृष्ण रेसिडेन्सीतील रहिवासी स्वरूप मिरजुळकर यांची मुलगी स्वर्णी हिच्या पहिल्या वाढदिनी श्री. राहुल कळंबटे यांनी १० तासांत तिचे थ्रीडी रांगोळीतून हुबेहूब चित्र साकार केले. त्यानंतर या रांगोळीचे फोटो सर्वत्रच प्रसारित झाले होते.
राजस्थान येथील २७ आर्ट पॉइंट संस्थेच्या वतीने ‘नववी नॅशनल ऑनलाईन आर्ट कॉम्पिटिशन २०२४’ स्पर्धा घेण्यात आली. यात देशातील ३५० पेक्षाहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. या स्पर्धेत रियलॅस्टिक पेंटिंग, लँडस्केप पेंटिंग, फोटोग्राफी, प्रिंटमेकिंग, ऍब्सट्रेक पेंटिंग, पोट्रेट, स्कल्पचर, मिक्स मिडिया, डिजिटल पेंटिंग, रांगोळी या सर्व प्रकारांचा समावेश होता. त्यांचे फोटोग्राफ ऑनलाईन मागवण्यात आले होते. राहुल कळंबटे यांनी स्वर्णी हिच्या थ्रीडी रांगोळीचा फोटो स्पर्धेसाठी पाठवला. या थ्रीडी रांगोळीने या स्पर्धेत बाजी मारत कळंबटे यांना देशात चौथा क्रमांक मिळवून दिला.
रांगोळीत ३ जागतिक विक्रम करणारे राहुल कळंबटे
श्री. राहुल कळंबटे यांनी अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत कलेचे शिक्षण घेतले. वर्ष २०१० मध्ये कलाशिक्षक म्हणून नगर परिषद शाळेत ६ महिने कंत्राटी काम मिळाले. शाळेत असतांनाच त्यांनी संस्कार भारती रांगोळी काढण्यास प्रारंभ केला. रत्नागिरीतील कलाकार प्रशांत राजीवले आणि राजू भाताडे या समवयस्क रांगोळी कलाकारांनी त्यांना संधी दिली. त्यांच्यासमवेत राहून राहुल कळंबटे रांगोळी काढायला लागले. श्री. कळंबटे यांनी रांगोळीत ३ जागतिक विक्रमही केलेले आहेत.