US Human Rights Report : देशात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा अमेरिकेचा अहवाल भारताने फेटाळला

हिंदूंवरील नव्हे, तर मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावरील कथित आक्रमणांचा उल्लेख

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने मानवाधिकारांच्या संदर्भात प्रसारित केलेला ८० पानी अहवाल भारताने फेटाळला आहे. या अहवालात मणीपूरमधील हिंसाचाराचा उल्लेख करून तेथे मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांना पत्रकार परिषदेत या अहवालाविषयी विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, आम्ही या अहवालाला महत्त्व देत नाही आणि तुम्हीही तेच केले पाहिजे. या अहवालावरून असे दिसून येते की, अमेरिकेची भारताबद्दलची समजूत योग्य नाही.


काय आहे अहवालात ?

१. ‘यूएस् स्टेट डिपार्टमेंट’ प्रतिवर्षी अनेक देशांमध्ये मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या संदर्भात अहवाल प्रसिद्ध करते. या अहवालात चीन, ब्राझिल, बेलारूस, म्यानमार आणि भारत यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात भारताविषयी म्हटले आहे की, मणीपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय हिंसाचार पसरल्यानंतर तेथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. ३ मे ते १५ नोव्हेंबर २०२३ या काळात किमान १७५ लोक मारले गेले आणि ६० सहस्रांहून हन अधिक लोक विस्थापित झाले.

२. यात पुढे म्हटले आहे की, भारताचे भाजप सरकार भारतातील मुसलमानांशी भेदभाव करत आहे. भारतातही अल्पसंख्यांकांवर आक्रमणे वाढली आहेत. मोदी सरकार पत्रकारांना गप्प करण्याचा आणि कारागृहात पाठवण्याचा प्रयत्न करते. जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे उल्लंघन होत आहे. लोकांना शांततापूर्ण आंदोलन करू दिले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपट प्रदर्शित केल्यानंतर बीबीसीच्या कार्यालयांवर धाड टाकण्यात आली. तसेच गुंड अतिक अहमद याच्या पोलिसांच्या कह्यात असतांना हत्या करण्यात आली. (ही सर्व उदाहरणे पहाता अमेरिकेला हिंदूंवरील आक्रमणांविषयी कोणतीही कणव नाही. हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर होणारी आक्रमणे, कन्हैयालाल यांची मुसलमानांनी शिरच्छेद करून केलेली हत्या, कर्नाटकात गेल्या काही वर्षांत हिंदुत्वनिष्ठांच्या झालेल्या हत्या, काश्मीरमधून पलायन करण्यास भाग पाडण्यात आलेले हिंदू, बंगालमधील असुरक्षित हिंदू आदींचा यात कुठेही उल्लेख नसणे, यातून या अहवालाची विश्‍वासार्हता किती आहे, हे स्पष्ट होते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अमेरिकेचे भारतविरोधी अहवाल रद्दीत विकण्यासारखे असतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे भारताच्या संदर्भात दुटप्पी धोरण असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिका भारताचा कधीही खरा मित्र होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या !