भोकरदन (जिल्हा जालना) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश असूनही १ मास नळाला पाणी नाही !
जालना – जिल्ह्यातील भोकरदन शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यातच जलवाहिनी घालतांना केबल तुटल्यामुळे भोकरदन शहराचा पाणीपुरवठा २ दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. भोकरदन येथे ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश असतांनाही १ महिन्यापासून नळांना पाणी नाही.
विद्युत् पुरवठा खंडित झाल्याने सेलुदहून भोकरदनकडे आलेले टँकर उभे होते. हा विद्युत् पुरवठा सुरळीत झाला किंवा नाही याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली नाही. मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठ्याचे अभियंता हे एका बैठकीसाठी जालना येथे गेल्याचे समजते. भोकरदन शहरासाठी शासनाने ३५ टँकर मान्य करून दिले आहेत. प्रत्येक टँकरने प्रतिदिन २ खेपा करणे अपेक्षित आहे; मात्र २३ एप्रिल या दिवशी ५ टँकरने ३३ खेपा केल्या आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.