Loksabha Elections 2024 : नौदलाच्या कॅप्टनने राज्यघटनेच्या विरोधात बोलणे दुर्दैवी ! – राकेश अग्रवाल, माजी नौदल अधिकारी
काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी राज्यघटनाविरोधी विधान केल्याचे प्रकरण
वास्को : नौदलात कॅप्टन म्हणून निवृत्त झालेले तथा काँग्रेसचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी राज्यघटनेच्या विरोधात बोलणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे. नौदलात भरती होतांना भारताच्या राज्यघटनेवर हात ठेवून आणि तिरंग्यावर हात ठेवून आपण सेवेतून रूजू होत असतो आणि अशा राज्यघटनेच्या विरोधात बोलणे, हे देशासाठी घातक आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नौदलाचे माजी अधिकारी राकेश अग्रवाल यांनी वास्को परिसरात भाजपच्या प्रचाराच्या वेळी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. या वेळी भाजपचे आमदार दाजी साळकर आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. नौदलाचे माजी अधिकारी राकेश अग्रवाल पुढे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या कारकीर्दीत सेना दलाला काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात अडवून ठेवलेले सर्व अधिकार मिळाले आहेत.’’