सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही स्थिर राहून सेवा करणारे जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. भिकन मराठे (वय ४५ वर्षे) !
कर्करोगासारख्या अत्यंत दुर्धर आजारातही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी अतूट श्रद्धा ठेवून आणि स्थिर राहून साधनारत राहिल्याने जळगाव येथील श्री. भिकन मराठे हे जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले असून त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, ही आनंदवार्ता जळगाव येथील सेवाकेंद्रात एका अनौपचारिक बैठकीत सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी २७ डिसेंबर २०२३ या दिवशी सर्वांना दिली. या वेळी जळगाव येथील मराठे यांच्या समवेत सेवा करणारे साधक अन् आप्तेष्ट उपस्थित होते.
जळगाव येथील धर्मप्रेमी श्री. भिकन मराठे वर्ष २०२० मध्ये सनातनच्या संपर्कात आले. दादांना ७ वर्षांपूर्वी मूत्रपिंडाचा कर्करोग झाला होता. दादा सदैव सकारात्मक आणि उत्साही असतात. सकारात्मकता, सेवेची तळमळ आणि गुरूंवरील श्रद्धा या बळावर ते या दुर्धर व्याधीशी संघर्ष करतही आनंदाने सेवा करत आहेत. त्यांच्याविषयी श्री. प्रशांत जुवेकर यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सेवेची तळमळ
१ अ. सेवेसाठी लागणार्या तांत्रिक गोष्टी शिकून घेणे : ‘दादांचे विशेष शिक्षण झालेले नसून त्यांची आर्थिक स्थितीही बेताची आहे. असे असूनही त्यांनी ‘ऑनलाईन’ नामसत्संगात आणि भावसत्संगात जोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक गोष्टी शिकून घेतल्या. दादा सेवेसाठी सदैव तत्पर असतात.
१ आ. जिज्ञासूंना साधनेत सहभागी करून घेणे : सत्संगाचे चैतन्य आपल्या नातेवाइकांना, तसेच इतरांनाही मिळावे, या हेतूने त्यांनी दुचाकी गाडीवरून ४० कि.मी. दूर अंतरावर जाऊन एका जिज्ञासूला ‘सत्संगाची ‘लिंक’ कशी जोडायची ?’, हे शिकवले.
२. शारीरिक त्रासातही तळमळीने सेवा करणे
या वर्षी भिकनदादांनी गुरुपौर्णिमेच्या कालावधीत अर्पण गोळा करण्याची सेवा अत्यंत तळमळीने केली. त्यांना होणार्या त्रासामुळे अशक्तपणा आणि वेदना होत असल्यामुळे त्यांना दुचाकी गाडी चालवता येत नव्हती; परंतु ते दुसर्या साधकांना समवेत घेऊन अर्पण सेवेला जात होते.
३. दायित्व घेऊन सेवा करणे
दादांनी स्वतःहून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाच्या सेवेचे दायित्व उत्साहाने घेतले आणि आपल्या परिवारातील एकाला ती सेवा करण्यासाठी सिद्धही केले. त्यामुळे आता त्यांचे कर्करोगावरील उपचार चालू असूनही त्यांनी दायित्व घेतलेल्या विभागातील ‘दैनिक सनातन प्रभात’चे वितरण नियमितपणे होत आहे.
४. दुसर्यांदा कर्करोग होऊनही सकारात्मक आणि कृतज्ञताभावात असणे
वर्ष २०२२ मध्ये त्यांना पुन्हा कर्करोग झाला. तेव्हा त्वरित शस्त्रकर्म करणे आवश्यक असल्याने आणि पैशांचे पाठबळ नसल्याने त्यांनी श्री गुरूंना प्रार्थना केली. ते स्वतःही पुष्कळ सकारात्मक होते. त्यांना उपचारासाठी आर्थिक निधी मिळाला. तेव्हा ‘ही श्री गुरूंचीच कृपा आहे’, अशी कृतज्ञता दादा सततच व्यक्त करत असतात.
५. संतांचे आज्ञापालन करणे
दादांच्या अस्वास्थ्यामुळे त्यांचे काम सुटले होते. त्यांना गुटखा विक्रीचे काम मिळत होते; परंतु त्यांनी संतांना विचारल्यावर ते काम साधनेसाठी योग्य नसल्याचे त्यांना कळले आणि त्यांनी कामाची आवश्यकता असूनही संतांवर श्रद्धा ठेवून ते काम नाकारले.
६. साधनेला आरंभ केल्यानंतर जाणवलेले पालट
दादा पूर्वी तंबाखू खात होते; परंतु साधनेमुळे त्यांचे हे व्यसन कायमचे सुटले. ते पूर्वी फार रागीट होते. आता त्यांचा स्वभाव शांत झाला आहे. आता त्यांच्या चेहर्यातही पालट झाला आहे. त्यांचा चेहरा आनंदी दिसतो.
७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
प्रत्येक सेवा ‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच मिळाली आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यांच्या अनुभूती ऐकून माझीही भावजागृती होते. ‘कितीही प्रतिकूल स्थिती असली, तरी ते गुरुदेवांवर सदैव श्रद्धा ठेवून जीवन व्यतीत करत आहेत’, असे मला वाटते.
८. संतांनी श्री. भिकन यांचे केलेले कौतुक !
एकदा ते रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी त्यांची किमोथेरपी चालू असल्यामुळे त्यांना त्रास होत होता; परंतु तरीही ते आनंदी होते. एका संतांनी त्यांची स्थिती पाहून त्यांचे कौतुक करून सांगितले, ‘‘तुमची साधना चांगली चालू आहे.’’
– श्री. प्रशांत जुवेकर, जळगाव.