ईश्वरावर दृढ श्रद्धा असणार्या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी !
‘माझी आई श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (वय ७२ वर्षे) हिच्या अंगी भगवंताच्या कृपेने अनेक कलागुण असून ती प्रत्येक कृती साधना म्हणून करते. जीवनात आलेल्या अनेक कठीण प्रसंगातही ती केवळ देवावरील दृढ श्रद्धेच्या बळावरच स्थिर राहू शकली. मला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
२५.४.२०२४ या दिवशी या गुणवैशिष्ट्यांचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/787552.html
६. विविध कलागुण
अ. आई अन्नपूर्णा आहे.
आ. ती उत्तम गायिका आहे. तिला शाळेतील गायनाच्या अनेक कार्यक्रमांत पारितोषिकेही मिळाली आहेत. तिने गायनाचे शिक्षण घेतलेले नाही; पण तिला सुरांचे ज्ञान उपजतच आहे. आता वयामुळे तिच्या गायनाला मर्यादा आल्या आहेत.
इ. ती उत्तम चित्रकार आहे. सुंदर रांगोळ्या काढणे आणि ‘क्लॉथ पेंटींग’ (कपड्यांवर कलाकृती रंगवणे) करणे, हे तिचे छंद होते.
७. शिकण्याची वृत्ती आणि प्रयोगशीलता
अ. आईला नवनवीन गोष्टी शिकायला आणि प्रयोग करून पहायला आवडतात. साधनेत आल्यानंतर कोल्हापूर येथे असतांना ती सौ. मनीषा वाडीकर यांच्या घरी होणार्या सत्संगांना जायची. तेव्हा त्यांनी आईला स्पंदनांचा अभ्यास करण्यास शिकवला. आईचा स्वभावही जिज्ञासू असल्याने तिने अनेक प्रयोग करून स्पंदने ओळखण्याचे शास्त्र शिकून घेतले.
आ. ती रामनाथी आश्रमात होणार्या संगीतांच्या प्रयोगांना जायची. तेथे तिला सात्त्विक गाणी आणि रज-तमात्मक गाणी यांविषयी माहिती झाली. त्यानंतर तिने विविध गाणी (भावगीते आणि भक्तीगीते) ऐकून त्यांचा शरीर आणि मन यांवर होणार्या परिणामांचा अभ्यास केला.
इ. जून २०२१ मध्ये माझ्या मामाने आईला संगीतोपचाराविषयी (‘म्युझिक थेरपी’विषयी) सांगितले. त्याने ‘कल्याण थाटातील काही राग, उदा. केदार, बिहाग, शामकल्याण, भटियार इत्यादी राग ऐकल्यावर मनावरील ताण न्यून होतो’, असे तिला सांगितले. तिच्यातील ‘प्रयोगशीलता’ या गुणामुळे तिने ते राग केवळ ऐकले नाहीत, तर ‘त्यांचा शरीर, मन, षट्चक्रे इत्यादींवर काय परिणाम होतो ?’, याचाही अभ्यास केला. तिने विविध गायकांनी गायलेले राग, विविध वाद्यांद्वारे वादन केलेले राग इत्यादींचाही अभ्यास करून शब्द किंवा नाद यांच्या होणार्या परिणामांचाही अभ्यास केला.
८. तत्परता
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वेळोवेळी आध्यात्मिक स्तरावरील उपाय, विकारांवरील नामजप, ऋतूनुसार दिनचर्या इत्यादी सूचना येतात. ती त्या वाचून तत्परतेने लिहून ठेवते आणि कृतीतही आणते. ती विविध विकार आणि आध्यात्मिक त्रासांवरील उपायही लिहून ठेवते. त्यामुळे कुठलाही शारीरिक त्रास जाणवू लागला, तर ती उपायांची नोंद केलेली वही वाचून त्याप्रमाणे लगेच उपाय करते.
९. खंबीरपणाने परिस्थिती स्वीकारणे
अ. जीवनामध्ये अनेक चढ-उतार येऊनही आई नेहमी स्थिर राहिली आहे. आलेली प्रत्येक परिस्थिती तिने मनापासून आणि खंबीरपणाने स्वीकारली. माझ्या बाबांना वेगवेगळ्या त्रासांसाठी अनेकदा रुग्णालयात उपचारांसाठी भरती करावे लागले. तेव्हा ती न खचता खंबीरपणे त्यांच्यामागे उभी राहिली.
आ. डिसेंबर २०२० मध्ये माझा भाऊ अभिजीत याचे निधन झाले. काही वेळा माझ्या मनात ‘आम्हा तिघा भावंडांमध्ये आईची अभिजितशी अधिक जवळीक असल्याने ती हा धक्का कसा सहन करणार ?’, असा विचार आला; पण केवळ गुरुदेवांच्या कृपेने तिला तो प्रसंग स्वीकारता आला आणि तिने हा प्रसंग ‘ईश्वरेच्छा’ समजून स्वीकारण्याचा प्रयत्न केला.
१०. तत्त्वनिष्ठ
आई सर्वांचे प्रेमभावाने करत असली, तरी ती भावनाशीलतेने किंवा उतावळेपणाने काही करत नाही. ती प्रत्येक गोष्टीचा वस्तूनिष्ठ विचार करते. जे अयोग्य आहे, त्याची ती स्पष्टपणे जाणीव करून देते.
११. निर्भयता
परात्पर गुरुदेव किंवा सनातन संस्था यांवर कुणी काही आरोप केले किंवा त्यांविषयी काही अयोग्य बोलले, तर ती अत्यंत निर्भयतेने त्या सर्र्वांचे खंडण करते. तेव्हा ती समोरच्या व्यक्तीला, मग ती कुणीही असो ‘माझ्या गुरूंविषयी आणि त्यांच्या संस्थेविषयी मी काही चुकीचे ऐकून घेणार नाही’, असे ठणकावून सांगते.
१२. इतरांचा विचार करणे
आई स्वतःचा विचार करण्यापूर्वी इतरांचा विचार करते. ती रुग्णाईत असतांना मी तिच्या समवेत थांबते. तेव्हा ती ‘माझी सेवा थांबू नये’, याचा विचार करते. जेवायला बसतांनाही ती मला माझी सेवा पूर्ण करून येण्यास सांगते. तिला बरे नसतांनाही ती ‘मला साहाय्य कसे करता येईल ?’, याचाच विचार करते.
१३. सात्त्विक
अ. पू. आशा दर्भेआजींप्रमाणेच (आईची आई, सनातनच्या ७१ व्या संत, वय ९२ वर्षे यांच्याप्रमाणे) आईही पुष्कळ सात्त्विक आहे. तिने केलेल्या सेवेतही सात्त्विकता असते. आई वाती आणि फुलवाती वळते. त्यांकडे पाहून पुष्कळ सात्त्विक वाटते.
आ. काही वेळा तिच्याकडे कागद कापण्याची (पेपर कटींगची) सेवा असते. ती ते कागद एकसारखे कापून एकावर एक व्यवस्थित ठेवून बांधते. त्यांकडे बघतांना पुष्कळ सात्त्विक वाटते. त्यातून तिची प्रत्येक सेवा परिपूर्ण आणि सात्त्विक करण्याची तळमळ जाणवते.
१४. धार्मिक वृत्ती
आई अतिशय धार्मिक आहे. लहानपणापासून तिला तिच्या आईकडून (पू. आशा दर्भेआजींकडून) देवपूजा, स्तोत्रपठण, सण-व्रते मनोभावे करण्याचा वारसा मिळाला. तिने नित्याची देवपूजा, सर्व कुलाचार इत्यादी सर्व अत्यंत श्रद्धापूर्वक केले. स्वयंपाक आणि अन्य कामे करतांनाही ती स्तोत्र किंवा मंत्र इत्यादी म्हणतच करायची. आताही ती काहीही करत असतांना तिचा नामजप चालू असतो. तिच्यामुळेच आम्हा भावंडांवर संस्कार झाले.
१५. देवावरील दृढ श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून संकटांना सामोरे जाणे
मी अगदी लहान असल्यापासून प्रतिदिन ती मला श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात आणि श्री श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांच्या मठात दत्तगुरूंच्या आरतीला घेऊन जायची. ती नवरात्रात प्रतिदिन पहाटे मला श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनाला घेऊन जायची. तिची देवावर अपार श्रद्धा आहे. आमच्या कुटुंबावर अनेक संकटे आली; पण केवळ आईच्या देवावरील अढळ श्रद्धेमुळेच देवाने कुटुंबाचे रक्षण केले आहे.
१६. परात्पर गुरुदेव डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सनातनच्या तीनही गुरूंवर आईची अपार श्रद्धा असणे
आईची परात्पर गुरुदेवांवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) अत्यंत श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे तिची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यावरही पुष्कळ श्रद्धा आहे. प्रतिदिन सकाळी उठल्यावर या तीनही गुरूंना सूक्ष्मातून नमस्कार करूनच तिच्या दिवसाचा आरंभ होतो. आईला अजून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही; पण तरीही तिला त्यांच्या आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भातील अनेक अनुभूती येत असतात. ती सूक्ष्मातून गुरुदेवांच्या किंवा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीत जाते. तेव्हा तिची पुष्कळ भावजागृती होते.
१७. आईमध्ये जाणवलेले पालट
अ. अलीकडे आईची त्वचा मऊ झाली आहे. तिचे केसही पूर्वीपेक्षा मऊ झाले आहेत.
आ. ती रुग्णाईत असतांनाही तिच्या तोंडवळ्यावर तेज दिसते.
इ. पूर्वी आईचा स्वभाव पुष्कळ रागीट होता; पण अलीकडे ‘आईमधील प्रेमभाव पुष्कळ वाढला आहे’, असे जाणवते. तिचा स्वभाव शांत झाला आहे.
ई. अनेकदा तिची अकस्मात् भावजागृती होते.
१८. अनुभूती
अ. काही दिवसांपासून तिच्या पलंगाजवळ गेल्यावर मला चाफ्याच्या फुलांचा सुगंध येतो.
आ. एकदा मला पाठदुखीचा त्रास होत असतांना मी तिच्या पलंगावर झोपले होते. तेव्हा काही वेळातच मला चैतन्य मिळून माझे दुखणे उणावल्याचे मला जाणवले. एकदा माझी पाठ दुखते; म्हणून तिने काही वेळ माझ्या पाठीवरून हळूवार हात फिरवला. त्यानंतरही मला हलके वाटून माझे दुखणे उणावले.
‘हे श्रीमन्नारायणा, आपल्या कृपेमुळेच मला एवढी सात्त्विक, धार्मिक आणि गुणसंपन्न आई मिळाली. ‘आपणच आईची ही सर्व गुणवैशिष्ट्ये माझ्याकडून लिहून घेतलीत’, यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. मला आईच्या गुणांतून शिकता येऊन ते गुण आत्मसात करता येऊ दे’, अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे.’
– अश्विनी अनंत कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.९.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |