दुबईमध्ये आलेला पूर : निसर्गाची आणखी एक चेतावणी !
१५ आणि १६ एप्रिलला मध्य पूर्वेतील संयुक्त अरब अमिरात या देशातील अबूधाबी, शारजाह आणि दुबई या शहरांत अतीप्रचंड पाऊस पडून पूरसदृश स्थिती झाल्याचे आपण सर्वांनी टीव्हीवर पाहिले. ‘जगातील श्रीमंत शहरांतील एक शहर आणि जगभरातील करोडपतींचे आवडते शहर, जगातील क्रमांक दोनचे व्यस्त विमानतळ असलेले शहर’ म्हणून दुबईची ओळख आहे. ‘बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वांत उंच इमारतीसह, मोठ्या महामार्गांचे जाळे, चालकविरहीत वाहतुकीचे जाळे, स्मार्ट पोलीस ठाणे, जगभरातील मोठ्या आस्थापनांची कार्यालये, जगातील सोन्याचा सर्वांत मोठा बाजार आणि इतर विविध प्रवासी आकर्षणांसह एक अद्ययावत् तंत्रज्ञानाने सुसज्ज अन् मानवी जीवनाला सुखकर बनवणारे सुनियोजित असे शहर’ म्हणूनही दुबई जगप्रसिद्ध आहे.
असे असले, तरी या कथित सुनियोजित शहराला काही दिवसांपूर्वी पावसाने इतके झोडपले की, तिथे पूर आला आणि या शहराने २४ घंट्यात निसर्गापुढे हात टेकले. जे रस्ते महागड्या गाड्या चालवण्यासाठी प्रसिद्ध होते, जे विमानतळ त्याच्या व्यस्ततेसाठी प्रसिद्ध होते, जे बाजार खरेदी-विक्रीसाठी जगप्रसिद्ध होते, तिथे पाणी भरून वहात असल्याचे आणि संपूर्ण शहराचे नियोजन कोलमडलेले आपण पाहिले. या पुरामागचे प्राथमिक कारण हे दुबई वापरत असलेले ‘क्लाऊड सीडिंग तंत्र’ (ढगात विविध रसायने सोडून कृत्रिम पाऊस पाडणे) आणि याच कालावधीत ओमानवरून दुबईच्या दिशेने जाणारे एक वादळ यांचा एकमेकांवर काय परिणाम होईल, यांचा अभ्यास न करणे, हे दिले जात आहे; पण मुळात अशा कृत्रिम पावसाची आवश्यकता दुबईला का लागते ? हे समजून घेण्यासाठी या शहराचा विकास कसा आणि कुठल्या परिस्थितीमध्ये झाला, हे थोडक्यात पहावे लागेल.
१. दुबई बंदराचा विकास आणि त्याचे वाढलेले महत्त्व
दुबई हे पर्शियन आखातातील पूर्वेकडील अरेबियन द्वीपकल्पातील बंदर आहे, तसेच हा भाग अरेबियन वाळवंटाचा असून प्रारंभीला दुबई बंदर हे फक्त उत्तरेकडून, म्हणजे इराक आणि इराण येथून येणार्या अन् दक्षिणेकडून म्हणजे ओमानकडून येणार्या जहाजांना थांबा म्हणून वापरले जात होते. याखेरीज मोत्यांची शेती आणि मासेमारी एवढेच उद्योग इथे चालायचे; पण वाढत्या व्यापाराने पर्शियन आखात अन् अरबी समुद्र यांमधील वाहतुकीसाठी दुबई बंदराचे महत्त्व वाढू लागले. हे महत्त्व लक्षात आलेली आणि त्यावर आधुनिक दुबईची मुहूर्तमेढ ठेवणारी व्यक्ती, म्हणजे शेख रशीद बिन सईद अल मख्तुम. या व्यक्तीने चतुराईने दुबईला ‘मुक्त व्यापार शहर’ (फ्री ट्रेड सिटी) घोषित करून जगभरातील व्यापार्यांना आकर्षित करायला प्रारंभ केला. याचा अर्थ या बंदरात व्यापारी त्यांच्या मालाची खरेदी-विक्री दुबई बंदराला कुठलाही कर न देता करू शकत होते.
या सोयीमुळे दुबई बंदराचे नाव जगभर व्हायला प्रारंभ झाला. तोपर्यंत दुबई बंदरातून फक्त मोत्यांची निर्यात होत होती; पण या नव्या सवलतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दुबईसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या. दुबईमधील पायाभूत सुविधांचा विकास होऊ लागला. पुढे १९६० च्या दशकात दुबईमध्ये तेलाचे साठे सापडले आणि दुबईला एक नवी अर्थिक शक्ती मिळाली. शेख रशीद यांनी या शक्तीचा लाभ दुबईच्या विकासासाठी केला. रस्ते, शाळा, बँक, रुग्णालये यांखेरीज आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना सोयीसाठी जे जे करता येईल ते सर्व दुबईमध्ये केले गेले.
२. नौकावहनाचे केंद्रस्थान, मुक्त व्यापार प्रभाग आणि कृत्रिम प्रेक्षणीय स्थळे यांद्वारे दुबईचा वाढता आर्थिक विकास
पश्चिमेला रखरखीत वाळवंट जिथे शेती आणि इतर उत्पादनाची शक्यता अल्प अन् पूर्वेला समुद्र जिथे तेलाचे साठे सापडले जे कधीतरी संपणार होते. या मर्यादा लक्षात घेऊन शेख रशीद यांनी त्यांचे लक्ष दुबईला जगभरच्या व्यापार्यांना आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एक ‘शिपिंग हब’ (नौकावहनाचे केंद्रस्थान) बनवण्याचे ठरवले. यासाठी दुबईच्या खाडीचा जलवाहतुकीसाठी विकास करण्यात आला आणि दुबई बंदराचे रूपांतर ‘आंतरराष्ट्रीय शिपिंग हब’मध्ये करण्यात आले. यामुळे हे बंदर युरोप, मध्य पूर्व आणि आशिया यांमधील ‘व्यापाराचे मुख्य केंद्र’ बनले. आज जगातील १०० पेक्षा अधिक देशातील विविध कंपन्यांची ८ सहस्रांहून अधिक कार्यालये दुबईमध्ये आहेत. यात भर म्हणून दुबईला ‘फ्री ट्रेड झोन’ (मुक्त व्यापार प्रभाग) म्हणून घोषित केले गेले. यामुळे आयातदार आणि निर्यातदार यांच्यासाठी दुबई हे महत्त्वाचे बंदर बनले. यानंतर दुबईने तिचे लक्ष पर्यटन उद्योगावर केंद्रित केले. याखेरीज वित्तीय सेवा आणि संवाद साधने (कम्युनिकेशन इंडस्ट्री) यांकडे लक्ष दिले गेले. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असे जागतिक दर्जाचे विमानतळ दुबईमध्ये बांधले गेले. यानंतर दुबईमध्ये अनेक पंचतारांकित हॉटेल्स चालू झाली. या सगळ्यामुळे १९९० च्या दशकात दुबईला फार महत्त्व प्राप्त झाले.
पुढे वर्ष २००० नंतर ‘शॉपिंग मॉल्स’ (खरेदीसाठी मोठी व्यापारी केंद्रे), ‘अंडर वॉटर झू’ (पाण्याखालील प्राणीसंग्रहालय), ‘आर्टिफिशियल आयलँड’ (कृत्रिम बेट), ‘लक्झरियस् हॉटेल्स’ (सोयीसुविधांनी युक्त पंचतारांकित हॉटेल्स), ‘आर्टिफिशियल रिझव्हॉयर्स’ (कृत्रिम जलाशय), ‘मॅन मेड फ्लॉवर गार्डन्स’ (मानवकृत फुलांचे बगीचे) उभारली गेली. बुर्ज खलिफाच्या उभारणीनंतर दुबई हे जगाच्या नकाशातील आकर्षणाचे स्थान झाले. दुबईमध्ये फिरायला, व्यापाराला जाणे, तिथे घर विकत घेणे, हे प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले. यानंतर दुबईने स्वतःचा मोर्चा वैद्यकीय यंत्रसामुग्री, वाहन उद्योग, इंजिनीयरींग सेवा यांकडे वळवला आणि या क्षेत्रातही दुबईची प्रगती चालू आहे. दुबईविषयी असे म्हटले जाते, ‘माणूस स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर काय काय करू शकतो ? हे पहायचे असेल, तर दुबईकडे पहा.’
३. विकासाच्या अतीमानवी हस्तक्षेपामुळे वाळवंटीकरणाचा वेग पुष्कळ
ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू बघूया. या एवढ्या मोठ्या विकासासाठी दुबईकडे नैसर्गिक स्रोत मर्यादित आहेत. वाळवंटामुळे वापरण्यायोग्य भूमी अतिशय अल्प प्रमाणात आहे. स्वत:ची वाढती लोकसंख्या आणि प्रतिवर्षी भेट देणारे लाखो पर्यटक यांना सामावून घेणे, हे दिवसेंदिवस दुबईला कठीण होत चालले आहे. या सर्व चंगळवादाला पोसण्यासाठी मानवी श्रम महत्त्वाचे आहेत आणि हे श्रमजीवी मुख्य शहर सोडून इतर उपनगरांच्या भागात दुबईमध्ये पैशाच्या आशेने विविध देशांतून आलेले कामगार आहेत.
आणखी एक म्हणजे वाळवंटीकरणाचा. ही पर्यावरणाच्या र्हासाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. यात सुपीक भूमीचे रूपांतर वाळवंटात होते. एका अभ्यासानुसार वर्ष २००० ते वर्ष २०२० मध्ये दुबईच्या सुपीक भूमीपैकी ६० टक्के भूमीचे वाळवंटीकरण झाले आहे. जरी ही प्रक्रिया नैसर्गिक असली, तरी नैसर्गिक स्रोत जसे की, पाणी, माती यांचे शोषण अधिक प्रमाणात झाले की, भूमीचे रूपांतर वाळवंटात होण्याचे प्रमाण अधिक आढळते. दुबईमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाच्या अतीमानवी हस्तक्षेपामुळे हा वाळवंटीकरणाचा वेग पुष्कळ आहे. सुपीक भूमीची कमतरता ही अन्नधान्यासाठी इतर देशांवरील अवलंबित्व वाढवते. यावर उपाय म्हणून दुबईमध्ये ‘व्हर्टिकल फार्मिंग’चे (उभ्या शेतीचे) प्रयोग चालू आहेत.
४. दुबईमध्ये विकासामुळे पर्यावरणाची होत असलेली अतोनात हानी
विकासाची अवाढव्य कामे दुबईला जगातील सर्वांत वाईट ‘एन्व्हायर्नमेंट फूटप्रिंटस् (एखाद्याच्या नैसर्गिक स्रोतांच्या वापराच्या कृतीमुळे पर्यावरणावर होणारे मोजायचे परिमाण) देणारे शहर’ म्हणून ओळख देते. हे टाळण्यासाठी तिथल्या शेख यांनी वर्ष २०१० मध्ये १० लाख नवीन वृक्ष लावून वाळवंट न्यून करून सुपीक भूमी वाढवण्याचे ध्येय घेतले; पण तेथील वातावरणामुळे ही झाडे जगली नाहीत. याखेरीज दुबईच्या समुद्रामध्ये मातीचा भराव घालून मानव निर्मित बेटे उभारण्याचे आणि ती विकून पैसे कमवण्यासाठी ३ प्रकल्प आणले गेले. या प्रकल्पांचा प्रस्तावित व्यय १० अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढा होता. ३ पैकी २ प्रकल्प जवळजवळ फसले आहेत. ही बेटे उभारतांना लाखो घनमीटर माती आणि दगड समुद्राच्या पाण्यात घातले गेले. या कामाच्या वेळी तेथील वातावरणाची, समुद्रातील जीवसृष्टीची भरपूर हानी झाली आहे; पण एवढी निसर्गाची हानी करूनही स्थिर आणि कायमची बेटे उभारणे शक्य झालेले नाही.
५. कृत्रिम पावसासाठी रसायनांच्या वापरामुळे पर्यावरणावर परिणाम आणि पूर येण्यामागील कारण
दुबईतील ८५ टक्के जनता ही बाहेरून स्थलांतरित झालेली आहे. अधिक पैसा आणि कर बचत यांच्या लोभाने हे लोक इथे रहात आहेत. एवढ्या सगळ्या जनतेला आणि प्रतिवर्षी येणार्या पर्यटकांना लागणार्या पाण्याची गरज तिथल्या नैसर्गिक पावसाने भागणे शक्य नाही. दुबईमधील वार्षिक पर्जन्यमान १६० मिलीमीटर आहे; म्हणून तिथे साधारण वर्ष २००२ पासून कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्र वापरण्यात येते. यामध्ये ज्या ढगांमध्ये किमान ४० टक्के बाष्प आहे, अशा ढगांमध्ये विमानाच्या साहाय्याने सिल्व्हर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड, ड्रायआईस अशी रसायने भरली जातात आणि मग त्यातील बाष्प वाढवून वाढीव पाऊस पाडला जातो. काही शास्त्रज्ञांच्या मते या रसायनांचा वातावरणावर मानव आणि पशूपक्षी यांचा जीवनावर वाईट परिणाम होतो. वातावरणात कार्बन डायऑक्साईड वाढणे, ओझोन वायूचा थर न्यून होणे असेही दुष्परिणाम या रसायनांचे आहेत. मुळात पावसाचे प्रमाण पुष्कळच अल्प असल्याने पावसाचे पाणी निचरा करण्याची पुरेशी योजना दुबईत बनवलेली नाही आणि तीच आता या कृत्रिम पाऊस अन् वादळ यांमुळे आलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आलेल्या पुराचे एक महत्त्वाचे कारण आहे .
६. वेळीच जागे होण्याची आवश्यकता !
आतापर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी, ‘कॉर्पोरेट’मधील नोकरदार यांना सगळीकडे एक आदर्श ‘केस स्टडी’ (अध्ययनासाठी) म्हणून ‘दुबईची प्रगती कशी झाली ?’, याचे धडे दिले जायचे; पण आता या पुराच्या प्रसंगातून आपण काही शिकणार आहोत कि नाही ? हे महत्वाचे आहे. विकास, प्रगती, पैसा, भरभराट यांच्या आपल्या व्याख्या काय आहेत ? आणि स्वतःचे पोट कधी भरणार आहे ? आपण कुठे थांबणार आहोत कि नाही ? यावर दुबईतच नाही, तर समस्त मानवजातीने विचार करायची आवश्यकता आहे. सरासरी मानवी आयुष्य ७५ वर्षे धरले, तर ही ७५ वर्षे आपण मालक असल्यासारखे या पृथ्वीवर वावरतो. आपल्या नंतरच्या पुढच्या पिढ्यांनाही आपल्यासारखेच जगायचे आहे. त्यांनासुद्धा नैसर्गिक स्रोत लागणार आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला ही पृथ्वी चांगल्या स्थितीत ठेवायची आहे. निसर्ग, पंचमहाभूते या कुणी व्यक्ती नाहीत की, त्या आपल्याला येऊन समजावतील. आपण आताच गांभीर्याने विचार करून निसर्गाला ओरबाडणे थांबवायचे आहे. नाही तर ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे (जागतिक तापमान वाढीमुळे) प्रतिवर्षीचा उन्हाळा हा मागील वर्षापेक्षा तीव्र आणि उपलब्ध पाणीसाठा हा मागील वर्षीपेक्षा न्यूनच होणार आहे. अजून वेळ गेलेली नाही. निसर्ग आपल्याला वेळोवेळी चेतावणी देत आहे. आतातरी सावध होऊन कृती केली, तर आपल्यासह पृथ्वीला वाचवू शकतो.
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– श्री. अनिकेत विलास शेटे, प्रमाणिक आर्थिक नियोजनकार, चिंचवड, जिल्हा पुणे. (२२.४.२०२४)