लोहगाव (पुणे) विमानतळ देशामध्ये ९ व्या स्थानावर, तर देशांतर्गत प्रवासी वाहतुकीमध्ये ८ व्या स्थानावर !
पुणे – २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये पुणे विमानतळावरून ९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही संख्या पहाता गेल्या आर्थिक वर्षांमध्ये प्रवास करणार्या संख्येत १८ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे देशामध्ये ९ व्या स्थानावर आहे. देशांतर्गत प्रवासी वाहतुकीमध्ये पुणे विमानतळ ८ व्या स्थानावर आणि पुणे विमानतळावरील प्रवाशांची संख्या पहाता स्वतंत्र विमानतळाची आवश्यकता आहे. सतत प्रवाशांची संख्या वाढत असल्याने सध्याचे विमानतळाचे टर्मिनल (ये-जा करण्याची जागा) अल्प पडत आहेत. नवीन टर्मिनलचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच सेवेसाठी खुले करण्यात येणार आहे.
‘भारतीय विमानतळ प्राधिकरणा’ने देशभरातील सर्व विमानतळांवरील प्रवासी वाहतुकीची आकडेवारी घोषित केली आहे. त्यातून देशांतील सर्वाधिक व्यस्त विमानतळांमध्ये (बिझी एअरपोर्ट) लोहगाव ८ व्या स्थानावर आहे. सध्या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्हींमध्ये प्रवाशांची संख्या अल्प होत आहे. तरीही देशातील पहिल्या १० विमानतळांमध्ये पुण्याचे स्थान कायम आहे.