Nuclear Weapons In Space : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अंतराळात अण्वस्त्रांच्या तैनातीच्या विरोधातील प्रस्तावावर रशियाने वापरला नकाराधिकार !

अमेरिकेची रशियावर टीका

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बाह्य अवकाश कराराचा ठराव नकाराधिकाराचा (‘व्हेटो’चा) वार करत रोखला. यामुळे अमेरिका संतप्त झाली आहे. रशिया उपग्रह वाहून नेणारी अण्वस्त्रे विकसित करत असल्याचा आणि त्यामुळेच रशियाने या प्रस्तावावर नकाराधिकार वापरल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. या करारांतर्गत अण्वस्त्रांसह अवकाशात धोकादायक शस्त्रे तैनात करण्यावर बंदी घालण्यात येणार होती; मात्र रशियाच्या नकाराधिकारामुळे अमेरिकेचा हा हेतू पूर्ण होऊ शकला नाही.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांनी एका निवेदनात म्हटले की, आम्ही आधी लक्षात घेतल्याप्रमाणे रशिया उपग्रह वाहून नेणारी अण्वस्त्रेे विकसित करत आहे. आम्ही ऐकले आहे की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जाहीरपणे सांगितले की, रशियाची अंतराळात अण्वस्त्रे तैनात करण्याची कोणतीही योजना नाही. तसे असेल, तर रशियाने या प्रस्तावाच्या विरोधात ‘व्हेटो’ का वापरला ? अमेरिका आणि जपान यांनी संयुक्तपणे आणलेल्या या ठरावानुसार अंतराळात अण्वस्त्रे तैनात करणे मूलभूत दायित्वांच्या विरोधात आहे. सदस्य देशांनी पृथ्वीच्या कक्षेत तैनात करता येतील, अशी अण्वस्त्रे बनवू नयेत, अशी मागणीही या ठरावात करण्यात आली आहे.

अंतराळात अण्वस्त्रे तैनात करण्याचे धोके !

जॅक सुलिव्हन पुढे म्हणाले की, पृथ्वीच्या कक्षेत अण्वस्त्रांच्या तैनातीमुळे दळणवळण, वैज्ञानिक, हवामानशास्त्र, कृषी, व्यावसायिक आणि राष्ट्रीय सुरक्षा सेवा विस्कळीत होण्याचा धोका आहे. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनीही रशियाच्या या निर्णयावर टीका केली असून रशियाने दायित्व झटकले असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, रशियाने अशा प्रकारचे प्रस्ताव हाणून पाडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांपासून रशिया धोकादायक शस्त्रास्त्रांच्या सूत्रावर दायित्वशून्यतेने वागत आहे.