बालपणापासूनच एकलव्याप्रमाणे साधनारत असलेल्या आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे)!
श्रीमती मीरा सामंत यांच्यातील जिज्ञासा आणि साधनेची तळमळ या गुणांमुळे त्यांनी साधनेचे कोणतेही मार्गदर्शन नसतांनाही बालपणापासून स्वयंस्फूर्तीने साधना केली. त्या वेळी त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. त्यांना अनेक संतांचा सत्संग लाभला आणि त्यांनी त्या सत्संगाचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घेतला. या लेखातून उलगडलेल्या त्यांच्या साधनाप्रवासातून त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये उलगडली गेली आहेत. त्यांची ‘देवाप्रती भाव, साधनेची तीव्र तळमळ, त्यागी वृत्ती’ इत्यादी गुणवैशिष्ट्ये दर्शवणारे प्रसंग या लेखात दिले आहेत. २४.४.२०२४ या दिवशी श्रीमती मीरा सामंत यांच्या साधना प्रवासातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.
(भाग ३)
या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/787040.html
१ अं. व्रतवैकल्ये निष्ठेने करणे : ‘व्रते करण्याकडे आईचा कल होता. तिने जीवनात अनेक व्रते केली. ‘व्रत कसे करावे ?’, याविषयी ती देवळात जाऊन तेथील पुजार्यांना विचारत असे. ती यथाशक्ती त्यांनी सांगितल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत असे. मग तिला त्याविषयीच्या अनुभूतीही येत. काही वर्षांनंतर सनातनमध्ये आल्यावर जेव्हा मी व्रतांसंबंधीचा ग्रंथ वाचून त्या सत्संगासाठी ध्वनी-चित्रचकत्या बनवायला घेतल्या, त्या वेळी ‘त्यांतील बराचशा कृती मी प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
१ अं १ अ. आलेल्या अनुभूती
१ अं १ अ १. घर लहान असल्याने ‘सोळा सोमवार व्रताचे उद्यापन कुठे करावे ?’, असा प्रश्न निर्माण होणे आणि घरमालकिणीने उद्यापनासाठी तिची एक खोली उपलब्ध करून देणे : ‘आईने केलेल्या व्रतांपैकी एक व्रत म्हणजे सोळा सोमवारचे व्रत ! या व्रताचे उद्यापन कसे करावे ?’, हे तिने मंदिरातील पुजार्यांना विचारले. त्यांनी सांगितल्यानुसार १६ ब्राह्मण दांपत्ये आणि सवाष्णी यांना प्रसाद वाढणे इत्यादी बरेच मोठे कार्य होते. त्या वेळी कोल्हापूरमध्ये आमचे दोन खोल्यांचे अगदी छोटे, शेणाने सारवलेले, असे जुन्या पद्धतीचे घर होते. त्यामुळे ‘तेथे हे सर्व करणे शक्य नाही’, हे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने विचार केला, ‘आपण सर्वच जण गोव्याला माहेरी जाऊन हे उद्यापन करूया; कारण माहेरी मोठी ऐसपैस जागा, आवश्यक ती सर्व भांडीकुंडी इत्यादी सर्वकाही आहे. त्यामुळे तेथे हे उद्यापन करणे सोपे होईल.’ तिने तसे मनाशी ठरवल्यानंतर त्या दिवशी रात्री तिला स्वप्न पडले, ‘तिच्या उशाजवळ कुणीतरी मोठा माणूस बसलेला आहे आणि त्याने तिला सांगितले की, तू व्रताचे उद्यापन येथेच (कोल्हापूरलाच) करायला हवे.’ तेव्हा तिने कोल्हापूरमध्येच उद्यापन करायचे ठरवले आणि मग मार्ग काढण्यासाठी ती चौकशी करू लागली. तेव्हा आमच्या घरमालकिणीने आपल्या रहाण्यातली एक खोली रिकामी करून तेथे कार्यक्रम करण्यास अनुमती दिली. एवढेच नव्हे, तर सर्व कार्यक्रमावर योग्य देखरेखही ठेवली.
१ अं १ अ २. उद्यापनाची पूजा अंबाबाईच्या देवळाच्या प्रांगणातील महादेवाच्या मंदिरात करण्याची इच्छा पूर्ण होणे : आईला उद्यापनाची पूजा अंबाबाईच्या देवळाच्या प्रांगणातील महादेवाच्या मंदिरात करायची होती; परंतु चौकशी केल्यावर समजले की, तेथे आधीच अन्य कुणीतरी पूजा करण्याचे आरक्षण केले होते. तिने ते स्वीकारले; परंतु पूजेच्या दिवशी त्या व्यक्तीचे रहित झाले आणि आईला मंदिरात पूजा करण्याची संधी मिळाली.
१ अं १ अ ३. जेव्हा आई पूजा केल्यानंतर उठली, तेव्हा शिवपिंडीवर पूजेच्या वेळी वाहिलेली बेलाची सहस्र पाने एकदम खाली पडली ! हा मोठा शुभसंकेत असल्याचे पुजार्यांनी सांगितले.
(क्रमशः)
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (श्रीमती मीरा सामंत यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (फेब्रुवारी २०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखाचा भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/787925.html