संपादकीय : ‘रेडीमेड’ रोग !
भारतात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन वाढ होत आहे, असे विविध सर्वेक्षणातून समोर येत आहे. जगभरातच कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगावर अद्याप रामबाण औषध किंवा उपचारपद्धत सापडलेली नाही. ज्या काही उपचार पद्धती आहेत, त्यानुसार उपचार करून रुग्णांचे प्राण वाचण्याची टक्केवारी अत्यल्पच आहे. कर्करोग होण्याची विविध कारणे आहेत. तंबाखूचे सेवन हे अधिक ठाऊक असलेले कारण आहे; मात्र आज तंबाखू सेवन न करणार्यांना विशेषतः महिलांनाही कर्करोग होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता अन्नपदार्थ बनवतांना वापरल्या जाणार्या मसाल्यांमुळेही कर्करोग होऊ शकतो, असे समोर आले आहे. पॅकबंद मसाले बराच काळ टिकवून ठेवण्यासाठी आस्थापनांकडून ‘इथिलीन ऑक्साईड’ या रसायनाचा वापर केला जातो. अल्प प्रमाणात वापर करण्यासाठी याला अनुमती आहे; मात्र भारतातील ‘एम्.डी.एच्.’ आणि ‘एव्हरेस्ट’ या २ प्रसिद्ध मसाले विक्री करणार्या आस्थापनांच्या ४ प्रकारच्या मसाल्यांमध्ये या रसायनाचा वापर अधिक असल्याचे आढळून आल्याने सिंगापूर अन् हाँगकाँग येथे त्यांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात अद्यापतरी असे करण्यात आले नसले, तरी आता या मसाल्यांची पुन्हा पडताळणी केली जात आहे.
भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या मसाल्यांचा वापर केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, असा कोरोनाच्या काळात निष्कर्ष काढण्यात आला होता; मात्र आता त्याच मसाल्यांच्या माध्यमातून कर्करोग होऊ शकतो, हे आश्चर्यजनक म्हटले जाते. या प्रकारातून एकूणच पॅकबंद पदार्थांच्या गुणवत्तेविषयी प्रश्न निर्माण होत आहे. पॅकबंद पदार्थ अधिक काळ टिकण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते जी मुळातच शरिरासाठी हानीकारक आहे. पॅकबंद पदार्थांची विकृती गेल्या काही दशकांत भारतात निर्माण झाली आहे. यामागे विविध कारणे आहेत. भारतीय संस्कृतीपासून लोक दूर जाऊ लागल्याने ही विकृती निर्माण झाली आहे, हे त्यातील प्रमुख कारण आहे. सर्व काही ‘रेडीमेड’ मिळवण्याच्या नावाखाली आता लोकांना आजारही ‘रेडीमेड’ मिळू लागले आहेत, असे म्हटल्यास आश्चर्य वाटू नये. पूर्वीच्या काळी प्रत्येक पदार्थ घरीच बनवला जात असे. त्यासाठी लागणार्याही वस्तू घरीच बनवण्याचा प्रघात होता. इतकेच काय घरी बनवलेलेच अन्नपदार्थ खाण्याची पद्धत होती. त्यामागेही बरीच कारणे होती. प्रामुख्याने शुद्धता आणि सात्त्विकता ही मुख्य होती. आज हा विचारच मागे पडला असल्याने पुन्हा त्या विचारानुसार वागण्यासाठी समाजव्यवस्थेलाच पालटावे लागणार आहे. त्यासाठी समाजानेच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
समाजव्यवस्थेला संस्कृतीविहीन करणारा पालट अधोगतीला कारणीभूत असल्याने तो रोखण्यासाठी संस्कृती टिकवणे महत्त्वाचे ! |